उद्धवगीता भाग- २


उद्धवगीता भाग-
लीना मेहेंदळे
उद्धव गीतेवरील पहिल्या लेखात आपण पाहिले की श्रीकृष्णाने उद्धवाला समदृष्टिची शिकवण दिली. सर्वांमधे माझाच आत्मा वसत आहे, ही आनंददायी दृष्टि ज्याला मिळाली तो समदृष्टि. असा मनुष्य रागद्वेष, सुख दुःख तसेच देहाच्या व्यापारात सत्व-रज-तम या त्रिगुणांच्या द्वारे उत्पन्न होणाऱ्या कर्मफलांच्या इच्छेपासून मुक्त रहातो.
ज्ञान आणि विज्ञानामधील फरक उद्धवगीतेत स्पष्ट केलेला आहे. शास्त्रग्रंथांद्वारे जाणून घेता येते ते ज्ञान पण अनुभूतिशिवाय त्याला विशेषत्व येत नाही. अनुभूतितून मिळवलेले ते विज्ञान. यामुळेच मनुष्याची व्याख्या ब्रह्मावलोकधिषणः पुरूषः अशी करत श्रीकृष्ण सांगतो की माझ्याच रचलेल्या संपूर्ण सृष्टिपैकी मानव जन्मधारी मला सर्वात प्रिय आहेत कारण तीक्ष्णबुद्धि व योगाच्या सहाय्याने एकाग्रचित्त होणारा मनुष्यच बुद्धिच्या पलीकडील परमात्म्याला जाणून घेऊन परमपदाला प्राप्त करू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अवधूत दत्तात्रेय. असे सांगत श्रीकृष्णाने उद्धवाला अवधूत आख्यान सांगितले परंतु ते एरवीही प्रसिद्ध असल्याने या लेखांत मी मांडलेले नाही.
ज्या प्रमाणे स्वप्नात मनुष्य सर्वकांही खरेच मानतो पण स्वप्नातून जागृतीत आल्यावर स्वप्न हे मिथ्या असल्याचे समजते तसेच जागृत अवस्थेतील व्यवहारही इंद्रियगत व त्रिगुणात्मक आणि म्हणूनच मिथ्य़ा आहेत ही यथार्थता समदृष्टिने कळून येते.
उद्धवाने श्रीकृष्णाला सांख्यतत्वज्ञान समाजावून सांगण्याची विनंति केली. सांख्यशास्त्र सांगणारे कणाद व कपिल हे दोन ऋषि होऊन गेले. त्या शास्त्राचे थोडक्यात विेवेचन श्रीकृष्णाने सांगितले. सत् चित् आनंद अशा परब्रह्मातून माया अथवा शिवस्वरूपातून शक्तिचे प्राकट्य झाले. तिलाच प्रकृति किंवा प्रधान असेही नाव आहे. या प्रकृतिनेच प्रथम महत् हे तत्व निर्माण केले ज्याला बुद्धि असे म्हणतात. महतामधून अहंकार, चित्त आणि मन निर्माण झाले. शिवाय प्रकृतीने पाच महाभूते म्हणजे आकाश, वायु, तेज, जल, व पृथ्वी व त्यांच्या तन्मात्रा अर्थात् त्यांच्या प्रकट होण्याची साधने –शब्द, स्पर्श रूप, रस, व गंध निर्माण केले. या तन्मात्राद्वारे सृष्टिज्ञान ग्रहण करू शकतील अशी पाच ज्ञानेंद्रिये म्हणजे कान, त्वचा, डोळे, जीभ व नाक हे ही प्रत्येक प्राण्याला दिले. आणि ज्ञानग्रहणाच्या टप्प्यानंतर त्याला कर्म करता यावे म्हणून पाच कर्मेंद्रिये देखील निर्माण केली.
अशा तऱ्हेने प्राणीमात्रांकडील पांच कर्मेंद्रिये, पांच ज्ञानेंद्रिये, पंचमहाभूते व त्यांचेकडून ज्ञानग्रहणाचे साधनस्वरूप पांच तन्मात्रा या शिवाय मन, अहंकार, चित्त व बुद्धि अशी एकूण चोवीस तत्वे आहेत. यांची निर्मिती प्रकृतिने केली असली तरी या मधील जीव हा ब्रह्माचे चैतन्य घेऊन आलेला आहे. त्यालाच देही, म्हणजे देहात रहाणारा असेही नांव आहे. देहात राहूनच तो प्रकृतिचा उपभोग घेऊ शकतो किंवा देहात राहूनच बुद्धिच्या द्वारे तो बुद्धिपलीकडील परब्रह्माला जाणू शकतो.
देहात रहाणारा जीव प्रकृतिच्या प्रेरणेमुळे कर्म करीत रहातो. त्याचे कर्मफल तयार होते. तेच जीव भोगाच्या रूपाने भोगतो. तसे करीत असताना त्याबरोबर रागद्वेषाच्या भावना चिकटल्या तर त्यातून पुन्हा कर्म, कर्मफल आणि कर्मभोग उत्पन्न होतात. या ज्या भावना चिकटतात त्यांचे प्रेरक मन आणि अहंकार असतात. मात्र त्यांत गुंतून न पडता परब्रह्माकडे पोचण्यासाठी चित्त व बुद्धि हे सहाय्यभूत ठरतात. यापैकी पंचमहाभूत, मन, बुद्धि व अहंकार यांना अष्टधा प्रकृति असे म्हटले जाते.
तीक्ष्णबुद्धिच्या सहाय्याने ज्ञान व विज्ञानाचे विवेचन करीत परब्रह्म जाणून घेणे हा सांख्यमार्ग आहे. यापेक्षा वेगळे योगशास्त्र कांय सांगते -- तर ईश्वरप्रणिधान म्हणजे ईश्वराची अनन्य भक्ति, सतत चिंतन याशिवाय परब्रह्मप्राप्ति होत नाही. पातञ्जल योगसूत्रांत चित्तशुद्धि तसेच चित्तवृत्तिनिरोधाचे जे उपाय सांगितले आहेत ते फक्त पूर्वतयारीसाठी आहेत. त्यापुढे ईश्वरभक्तीने व ईश्वरसमर्पणाने मुक्तिचा मार्ग सुकर होतो.
उद्धवगीतेतही मुक्तीसाठी ज्ञानमार्ग, कर्ममार्ग व भक्तिमार्ग आहेत असे सांगताना ज्ञानमार्गाने प्राप्त होऊ शकणाऱ्या काही सिद्धींचे वर्णन श्रीकृष्णाने उद्धवाला केले. यामधे अणिमा, लघिमा व महिमा या शरीराला अनुक्रमे अणुरूप, भारहीन, व विशाल करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात (उदाहरण -हनुमानाने सुरसा राक्षसीविरुद्ध या सिद्धी वापरल्या). प्राप्ति, प्राकाम्य व कामावसियिता या सिद्धींमुळे कामना केलेली गोष्ट मिळते. ईशिता व वशिता या इतरांना वश करून घेण्यासाठी आहेत. ऊर्मि या सिद्धिने भूक- तहान, शोक मोह व जन्म मृत्यु या सहा गोष्टींवर विजय मिळवता येतो. आपले शरीर बदलून इतर प्राण्याचे शरीर धारण करू शकणे ही सिद्धी महाभारतातील कर्दम ऋषींना प्राप्त होती. दूरचे ऐकणे, दूरचे पहाणे किंवा क्षणात दूर पोचणे ( मनोजव सिद्धि), परकाया प्रवेश, देवक्रीडादर्शन, इच्छामृत्यू व त्रिकालज्ञता या सिद्धीदेखील ज्ञानमार्गाने प्राप्त होतात. असे सिद्धपुरुष असतील त्या परिसरातील सर्व प्राणीमात्र हिंसेचा त्याग करून रहातात (उदाहरण – चांगदेव वाघाला वाहन व सापाला चाबुक करून घेऊ शकले व ज्ञानदेवाला भेटण्यास आले).
यानंतर श्रीकृष्णाने उद्धवाला एक रोचक कथानक सांगितले. सनातन, सनत्कुमार, सनक आणि सनंदन असे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र एकदा चर्चेला बसले असता सर्वांनी निर्गुण परब्रह्माचे गुणवर्णन कसे होईल हा विषय घेतला व सनंदन यांना विषय मांडण्यास विनंती केली. त्यावर सनंदनाने एक पुरातन कथा ऐकविली. श्रुतींमधे सर्वत्र सगुण देवतांची स्तुति व उपासना विधी आहेत. तेंव्हा एकदा प्रत्यक्ष श्रुतींनीच निर्गुणाचे वर्णन करण्याचे ठरविले. त्या प्रयत्नांत श्रुतींनीच एक स्त्रोत रचलेले आहे. तर हे उद्धवा, त्या स्तोत्रातून तू निर्गुण परमात्म्याला जाणून घेण्याचा प्रयत्न कर. (हे स्तोत्र भागवतपुराण या ग्रंथाच्या अकराव्या अध्यायाचा एक भाग आहे)
अशा तऱ्हेने मुक्तीसाठी ज्ञान-कर्म व भक्तिमार्ग असले तरी कलियुगासाठी भक्तिमार्गच श्रेष्ठ असे श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितले. तेंव्हा उद्धवाने म्हटले की हे श्रीकृष्णा, तू जरी म्हणत असलास की ज्ञान, कर्म- भक्ति यांपैकी भक्तीमार्ग- सोपा आहे, तरी मला असे वाटते की कलियुगात मनुष्याला या भक्तिप्रत नेणे देखील अवघड असेल कारण मन आणि अहंकार हे बाह्य प्रकृतिकडे धावतात. त्यांचा ओढाच प्राणिमात्रांवर अधिक प्रभावी ठरतो. तर मग माणसाला भक्तिकडे कसे वळवावे
यावर श्रीकृष्णाने चित्तात भक्ति उत्पन्न होण्यासाठी क्रियायोग सांगितला. क्रियायोगात मुख्यतः शुद्धिकडे व प्रसन्नतेकडे लक्ष वेधले आहे. क्रियायोगात अगोदर संकल्प करावा. तो कांही काळाचा, कांही दिवसाचा किंवा दीर्घकाळाचा असू शकतो. संकल्पानंतर प्रथमतः शुद्धि हवी. त्यांत देहशुद्धिसाठी शौच, स्नान, स्वच्छ वस्त्रे, त्यानंतर वाचिक शुद्धिसाठी मौन अथवा नामजप अथवा शुभ आणि प्रसन्न शब्दांचे उच्चारण हा विधी आहे. त्याच बरोबर मानसिक शुद्धिसाठी मनात दुष्ट विचार न येऊ देणे, मृदूभाषिता हे गुण हवेत. मनाच्या एकाग्रतेसाठी एखाद्या देवतेची सगुण मूर्ति घ्यावी - मग ती चित्रमय, वालुकामय अथवा धातूमय असेल. तिच्या ठिकाणी वसत असलेल्या देवतेला देखील षोडशोपचार पूजा द्यावी. मनामधे ईश्वरप्रणिधानाची व भक्तिची जाणीव कायम ठेवण्यासाठी हे सर्व मार्ग आहेत. हा क्रियायोग अल्पकाळ जरी केला तरी तो मनात, स्मृतित कायम रहातो व पुढील काळात भावप्राकट्य करीत असतो. समजा लहानपणी आपण सातत्याने एखाद्या प्रजातीचे फूल देवावर वाहिलेल पहात असलो, तर खूप काळानंतर पुन्हा ते फूल दिसले की स्मृतिमधून ती ईश्वरप्रणिधानाची भावना पुनः प्रकट होते. याची खूण म्हणजे कधी कधी अशा भावप्रकटनामुळे आपल्या शरीरावर रोमांच उभे राहतात किंवा अकारणच अश्रू भरून येतात. म्हणूनच अर्जूनगीतेतही कृष्णाने म्हटले होते की अत्यल्प ईश्वरभक्ति केली तरी ती वाया जात नाही. स्मृति आणि संस्कारांमधे ती टिकून रहाते. मात्र आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की वाईट वागण्याची स्मृति देखील पुढे मागे वाईट परिणाम देऊन जाणार आहे.
एका प्रकारे असे म्हणता येईल की भक्तिमार्गाची सुरवात करून देण्यासाठी व तसे संस्कार घडविण्यासाठी क्रियायोग उपयोगी ठरतो. त्याला कर्मकाण्ड म्हणून त्याची उपेक्षा करणे योग्य नाही. जोपर्यत एखादा साधक अनन्यभक्तिमय अवस्थेला पोचत नाही तो पर्यंत क्रियायोग हे एक सहाय्यक उपकरण असते. क्वचित कोणी कोणी क्रियायोग अथवा कर्मकाण्डाची मदत न घेताच अनन्यभक्तिला पावू शकतात. त्यांना क्रियायोगाची गरज उरत नाही. पण अशा व्यक्ती क्वचित असतात. बहुधा त्यांच्याकडेही त्यांच्या पूर्वजन्मीचे संस्कार टिकून राहिल्याने असे घडत असावे. असो.
असा अनन्यभक्त असेल तर आपोआपच त्याला समदृष्टि म्हणजे आपलाच आत्मा सृष्टित सर्वत्र भरलेला आहे ही दृष्टि प्राप्त होते व अशा भक्ताला उच्चकोटीचा भागवत म्हणावे. जो माणूस इतरांना दुखवू नये या भावनेने वागतो मात्र आपण आणि इतर ही आपपर भावना बाळगतो तो मध्यम कोटीचा भागवत. याउलट एरवी देवावर श्रद्धा ठेवणारा परंतु प्रसंगी इतरांशी दुर्व्यवहारही करू शकतो तो निम्नकोटिचा भागवत. तरी हे उद्धवा, तू समदृष्टि बाळगायला शिकलास की तुला उच्चकोटीचे भागवतपद प्राप्त होऊन तुझ्या माध्यमातून लोकांना भक्तिमार्ग कळेल.
या एकूण श्रवणानंतर उद्धव बदरिकाश्रमात काही काळ राहिला व नंतर तो देशभ्रमण करीत सर्वांना भक्तिमार्ग दाखवू लागला. याप्रमाणे आपल्या देशातील संतपरंपरा ही थेट भगवत् आदेशातून व उद्धवाच्या काळापासून अस्तित्वात आली असे दिसून येते. अर्जुनगीतेचा परिपाक अर्जुनाचा मोह नष्ट होऊन तो पुनः युद्धास उद्युक्त झाला हा आहे तर उद्धवगीतेतून भक्तिमार्गाचा आरंभ झाला असे म्हणता येईल. यामुळेच की काय संपूर्ण भारतात व विशेषेकरून उत्तर भारतात उद्धवासंबंधी कित्येक लोककथा प्रचलित आहेत ज्यामधे भक्ति, सगुण-निर्गुण, विरहव्याकुळता, गूढ तत्वज्ञान आदिंचा समावेश आहे. सूरदासांचे प्रसिद्ध पद ऊधो, जोग सिखावन आये हे त्याचाच नमुना म्हणता येईल.
---------------------------------------------------------



Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

एक शहर मेले त्याची गोष्ट

उद्धव गीता भाग १ -- भांडारकर व्याख्यान दि. १२ जून २०१९