बिहार मध्ये स्त्री क्षमतेचा झेंडा रोवणाऱ्या महाराष्टाची कन्या - लीना मेहेंदळे

बिहार मध्ये स्त्री क्षमतेचा झेंडा रोवणाऱ्या महाराष्टाची कन्या - लीना
मेहेंदळे
Kiran Sonarkiransonar1978@gmail.com

लीना मेहंदळे

अतिरिक्त मुख्य सचिव- महाराष्ट्र राज्य.

भारतीय प्रशासकीय सेवा, १९७४

शैक्षणिक प्रवास -
बी. एस्स्सी (भौतिक शास्त्र) बिहार विद्यापीठ दरभंगा-१९६८
एम एस्स्सी (भौतिक शास्त्र) पटना विद्यापीठ-१९७०
एम एस्स्सी (प्रकल्प नियोजन ) ब्रॅडफोर्ड विद्यापीठ, युके १९८८
एम बी ए (एच आर) गुरु जांबेश्वर विद्यापीठ, हिस्सार २००७
एल एल बी - मुंबई विदयापीठ २०१०
नाशिक मुक्त विद्यापीठाचा कुलगुरु कार्यभार सांभाळला -- १९९५

प्रशासकीय सेवेतील ठळक वाटचाल
सहाय्यक जिल्हाधिकारी- पुणे १९७६
उपसचिव - शिक्षण , महाराष्ट्र शासन १९७८
अतिरिक्त जिल्हाधीकारी - अरबन लँड सीलिंग १९७९
सीइओ ( औरंगाबाद, व सांगली ) १८८१
जिल्हाधीकारी - सांगली १९८४
व्यवस्थपकीय संचालक- डब्ल्यू एम डी सी १९८५
संचालक – यशदा १९९०
संचालक - नॅशनल इन्स्टूट ऑफ नॅचरोपॅथी , भारत सरकार १९९१
विभागीय आयुक्त - नाशिक १९९४
जमाबंदी आयुक्त १९९६
व्यवस्थपकीय संचालक- शेती महामंडळ १९९७
सह सचिव - राष्ट्रीय महिला आयोग १९९८
सह सचिव – पेट्रोलियम २००२
प्रधान सचिव- सामान्य प्रशासन २००६
प्रधान सचिव- पशुसंवर्द्धन २००८
अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन २००९
सदस्य केंद्रीय प्रशासकीय ट्रिब्यूल बंगळूरु व मुंबई २०१०-२०१३
माहिती आयोग गोवा राज्य येथे  मुख्य माहिती आयुक्त २०१३-२०१५


महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात जन्म झाल्यानंतर त्यांचा
शैक्षणिक प्रवास सुरु झाला बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातून .. बंगाल आणि
नेपाळच्या सीमेवर असलेला मागास आणि महाराष्ट्राच्या तुलनेत अप्रगत
जिल्हा. स्त्री शिक्षणासाठी नकारात्मक वातावरण असताना कठोर मेहनत,
व्यासंगीपणा आणि अभ्यासूवृत्तीच्या जोरावर यूपीएससी परीक्षेत यश
मिळवून बिहारमध्ये स्त्री शिक्षणाचा डंका वाजविला होता महाराष्ट्रातील
लीना मेहेंदळे यांनी.

आज त्यांच्याकडे देशपरदेशातील पाच विद्यापीठातील पाच वेगवेगळ्या
विषयातील पदव्या आणि तब्बल १३ भाषेचे ज्ञान आहे. व्यवसाय शिक्षण,
देवदासी पुनर्वसन, महिला सक्षमीकरण आणि ऊर्जा संरक्षणच्या माध्यमातून
त्यांनी भारतीय प्रशासनामध्ये उठावदार कामगिरी केली आहे. शिक्षण असो
की, प्रशासनातील सेवा यामध्ये तन-मनाने ‘लीन’ होऊन अभ्यासूवृत्तीने
काम करणाऱ्या लीना मेहंदळे यांची ही कहाणी ....

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे त्यांचा जन्म झाला.
वडील डॉ . बी . एस . अग्निहोत्री संस्कृत आणि तत्वज्ञान विषयाचे
प्राध्यापक होते तर आई शालेय शिक्षका होती. लीनाताईंच्या पाठीवर एक
बहीण आणि भाऊ झाले त्याचदरम्यान डॉ. बी. एस. अग्निहोत्री यांना
मध्यप्रदेशच्या जबलपूर कॉलेजमध्ये नोकरी मिळाली त्यामुळे डॉ.
अग्निहोत्री आपल्या परिवारासह मध्यप्रदेशात दखल झाले. खान्देशची
बोलीभाषा अहिराणी- मराठी होती. शिक्षणही सुरु झाले जबलपूरच्या मराठी
शाळेतून. परंतु जबलपूरमध्ये पाचवी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर वडिलांची
बदली दरभंगा या जिल्ह्याच्या ठिकाणी झाली. दरभंगामध्ये डॉ.अग्निहोत्री
यांचे एकमेव मराठी कुटुंब होते. मात्र वडिलांचा जनसंपर्क दांडगा होता.

घरात मराठीमोळे वातावरण असताना बिहारमध्ये अचानक जावे लागले
परंतु लीनाताईंचे आईवडील शिक्षक्षणाविषयी अतिशय जागरूक होते .
मुलगा - मुलगी असा बिहारमधील भेद मान्य न करता त्यांनी सर्वांना
समान शिक्षण दिले. लहानपाणीच त्यांनी स्तोत्र पाठ आणि योगासने
करून घेत. अभ्यासाच्या वेळी ते स्वतः घेऊन बसत. बीजगणिताचा प्रांत
त्यांनी आईकडे सोपविला होता. नित्यनेमाने शाळेतील मुख्याध्यापकांना
भेटण्यास शाळेमध्ये येत आणि मुख्याध्यपकांशी चर्चा करत. आठवीला
असतानां त्यांनी लीना ताईंसाठी एक लेडीज सायकल घेऊन दिली .
साठच्या दशकात बिहारमध्ये मुलींची शाळा असणे हीच मोठी गोष्ट होती
मग सायकल जाणारी मुलगी हे तर मोठे अप्रूप होते . “ ये देख , छोरी
सायकिल चलावे छे !“ असं म्हणत बायका - मुले माणसे थबकून बघत
असत.

बिहार काडरचे आयएएस श्री अडिगे यांचे डॉ अग्निहोत्रींच्या घरी
येणे-जाणे होते. लीनाताई लहानपणापासूनच हुशार होत्या म्हणूनच ते
आग्रहाने सांगत असत की या मुलीला युपीएससी परीक्षा देण्यास सांगा.
देशसेवेसाठी सर्वात मोठी संधी तिच्यासाठी आहे. लीनाताईं महात्मा गांधी,
भगतसिंग, सुभाषचंद्र बोस , चंद्रशेखर आझाद यांच्या आदर्शाने भारावलेल्या
होत्या त्यामुळेच देशसेवा किंवा देशासाठी नेतृत्व करणे हे त्यांचे स्वप्न
होते.

बीएस्सी शिक्षण झाल्यानंतर एमएस्सीसाठी पटना विद्यापीठात
आल्या पुढे पीएचडीसाठी प्रवेश घेतल्यानंतर युपीएससीची तयारी सुरु केली.
त्यावेळी स्पर्धा परीक्षेच्या काळातील पद्धत वेगळी होते. प्रिलिम आणि
मेन्स ऐवजी लोअर पेपर्स आणि हायर पेपर्स अशी विभागणी असून संपूर्ण
परीक्षा एकाच वेळी व्हायची. लोअर पेपर्समधील पात्रता फेरी पार
केल्यानंतरच हायर पेपरची तपासणी केली जात असे. लोअर पेपरमध्ये जनरल
नॉलेज, निबंध आणि इंग्रजी कॉम्पोझिनसह इतर तीन विषय असत. लोअरसाठी
एकूण सहा पेपर्स तर हायरसाठी दोन पेपर्स होते.

पटना महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी एकत्र येऊन रोज
सायंकाळी ४ ते ७ मोफत मार्गदर्शनपर वर्ग सुरु केले होते. तंत्रशुद्ध
पद्धतीने युपीएससी परीक्षेला कसे समोरे जायचे त्याविषयी चांगले
मार्गदर्शन मिळाले. मात्र युपीएससी पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही.
मार्गदर्शन वर्गाला येणाऱ्या मुलांमधील एकाही मुलाला साधी पात्रता फेरी
पार करीता आली नाही. मात्र निराश न होता लीना ताईनी पुन्हा परीक्षेची
तयारी सुरु केली . त्याचवेळी घरच्या परिस्थितीमुळे (वडील रिटायर
झाल्यामुळे) लीनाताईंनी मगध महिला कॉलेजमध्ये लेक्चरर आणि त्याच
हॉस्टेल मध्ये अस्सिस्टण्ट रेक्टर अशा दोन नोकऱ्या स्वीकारल्या. मुलींना
मार्गदर्शन, पीएचडी सोबत यूपीएससीचा अभ्यास केला आणि दुसऱ्या
प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होऊन पात्रता फेरी गाठली. आयएएस होण्यासाठी
फक्त एक पाऊल बाकी होते. ३०० मार्काची मुलाखत ही मोठी परीक्षा होती.

श्री अडिगेंनी सल्ला दिला की, “मुलाखतीच्या तयारी साठी दिल्लीला
एखादी कोचिंग सेंटर गाठून तिथे नियमित ट्रेनींग घे“. दिल्लीतील राव
स्टडी सर्कल मध्ये ३ महिने आणि १५ दिवसांचा कोर्से उपलब्ध होता.
कॉलेजची नोकरी, पीएचडीची प्रोग्रेस आणि दिल्लीतील तीन महिन्याचा खर्च
परवडणारा नव्हता म्हणून १५ दिवसांसाठी प्रवेश घेतला. संपूर्ण देशातून
तीन-चार हजार मुले कॉलिफाय होतात. त्यातून फक्त एक हजार मुलांची
निवड होणार होती . त्यामुळे एक प्रकारचा दबाव निर्माण झाला होता.
वर्तमानपत्र आणि सामान्यज्ञान याचे भरपूर वाचन केले आणि लीनाताई
मुलाखतीला सामोऱ्या गेल्या.

निकालाची वाट पाहत असताना दरभंगा येथे लीनाताई आणि श्री .
प्रकाश यांची पहिली भेट झाली. श्री. प्रकाश यांनी सांगलीच्या वालचंद
कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केले होते आणि फिलिप्स कंपनीच्या कलकत्ता
ब्रँचला रुजू झाले होते. मे १७७४ मध्ये महिन्यात त्यांचे लग्न झाले आणि
जून महिन्यात लीनाताईंचा युपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल आला.
अग्निहोत्री आणि मेहेंदळे कुटुबांत आनंदाची लाट पसरली. जिथे मुलांना
शिक्षणासाठी झगडावे लागत होते तिथेच एका मुलीने युपीएससीत उज्वल
यश मिळवत धरणगांव आणि दरभंगा यांचे नाव भारतामध्ये पोचविले होते.
युपीएससी परीक्षा पास होताच जुलै पासुन मसुरी येथे आयएएसच्या
प्रशिक्षणासाठी त्या मसूरीला गेल्या. पुढे त्यांची महाराष्ट्र केडरसाठी निवड
झाली.

पुणे येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पहिली पोस्टिंग मिळाली.
त्यानंतर शिक्षण, अर्बन लँड सीलिंग, औरंगाबाद आणि सांगली जिल्हा
परिषदेच्या मुख्य अधिकारी म्हणून काम केले. सात -आठ वर्षाचा
प्रशासकीय कामाचा अनुभव घेतल्यानंतर सांगली येथे जिल्हाधिकारी म्हणून
नेमणूक झाली. लीना मेहंदळे यांनी सांगलीत देवदासींच्या आर्थिक
पुनर्वसनासाठी मोठे काम केले. देवदासी महिलांना आर्थिक सक्षम
करण्यासाठी कौशल्य शिक्षणाचे प्रशिक्षण दिले. त्यांनी केलेल्या कामाला
बाजारपेठ मिळवून देण्यासाठी डब्ल्यू एम डी सीचे संचालकपद कामी आले.
त्यामुळे जत येथील रेणुका मंदिरात देवदासी सोडण्याची प्रथा कायमपणे
संपली व त्या महिलांना जगण्याचा आत्मविश्वास मिळाला.

राष्ट्रीय महिला आयोगामध्ये काम करत असताना
त्यांनी महिला सक्षमीकरणाचे अनेक उपक्रम केले. महिलांना व्यक्तिगत
सक्षमीकरण आणि सामाजिक सक्षमीकरण या दोन वेगळ्या घटकांचे महत्व
पटवून दिले. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, कमावलेलं पैसे स्वतः खर्च
करण्याचे स्वातंत्र्य, स्वतःची महत्वकांक्षा आणि यश या मुद्यायांना स्पर्श
करीत समाजाच्या विकासाला हातभार लावता येईल यासाठी सामाजिक
सक्षमीकरण करण्यासाठी महिलांना प्रेरित केले.

सांगली जिल्हाधिकारी असताना पाणी वाटपातील अनेक त्रुटी
त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला. सांगलीतील आठ तालुक्यांपैकी चार
तालुक्यामध्ये भीषण दुष्काळ पडत होती यावेळी व्यवस्थापन कौशल्य
पणाला लावीत दुष्काळग्रस्त चार तालुक्यातील पाणी व रोजगार हमीचे मोठे
नियोजन. नाशिकला महसूल आयुक्त असताना उत्तर महाराष्ट्रासाठी पाणी
समस्यांवर काम केले. नाशिक मध्ये पाणी चांगल्या प्रमाणात होते तर
जळगाव - धुळ्यात पाण्याची भीषण टंचाई होती. सांगली आणि उत्तर
महाराष्ट्रातील दोन्ही ठिकाणीचा विषय एकाच असला तरी पाणी वाटपाच्या
पद्धती आणि दोष वेगळे होते म्हणून येथे नव्या पद्धतीचे प्रयोग केले.
महसूल विभागामध्ये असलेल्या २००० पेक्षा जास्त केसेस निकाली लावल्या.
यासाठी कोर्टाप्रमाणे दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून त्यावर आपला निकाल
द्यावा लागतो.

नवनिर्मितीचा ध्यास घेत लीनाताईंनी गतिशील कारभार करीत महसूल
प्रशासन, न्यायिक कामकाज, कौशल्य विकास, ग्रामीण विकास,
महिलासंबंधी प्रश्न हाताळले. त्याचसोबत त्यांनी हिंदी, मराठी, इंग्लिश,
भाषेत लिखाण केले. बंगाली, संस्कृत, गुजराती, पंजाबी, नेपाळी, मैथिली,
ओरिया, असामी, बोजपुरी आणि अहिराणी भाषेचे त्यांना वाखण्याजोगे ज्ञान
आहे. काळाच्या सोबत चालत त्यांनी पारंपरिक कागद-पेनच्या
लिखाणासोबत इंटरनेटवर लिखाण सुरु केले आहे. आज त्यांच्या ब्लॉगवर
तसेच यूट्यूब, ट्विटर व फेसबुकवर त्यांचे विविध भाषांतील ललित लेख,
काव्य, श्लोक उपलब्ध आहेत. त्यांचा प्रवास आणि कार्य आजच्या सर्वच
महिलांना प्रेरणा देते तर लिखाण नवतरुणांना अतिशय प्रेरक आहे.
त्यांच्या कार्याला सलाम !
----------------------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट