बालपण प्रभावित करणारी माझी बुद्धिमान आई



बालपण प्रभावित करणारी माझी बुद्धिमान आई

माझी आई- कशी होती ? याबद्दल जगांत कोणीच पूर्णपणे सांगू शकणार नाही कारण तिच्याबद्दल विचार करायला बसल की लक्षांत येत की आपण आपल्या आईला कधीच नीट समजून घेतल नाही. ती आयुष्यांत इतक्या सहजपणे असते आणि वावरते की आपल्याला तिला वेगळी व्यक्ति म्हणून ओळखताच येत नाही. माझी आई सौ. लीला बलराम अग्निहोत्री (बालपणातील लीला दत्तात्रेय नामजोशी) अशीच सहजपणे व प्रसन्नपणे आमच्या आयुष्यात वावरली.

आईच थोडक्यांत वर्णन करायच तर सुंदर, बुद्धिमान,आरोग्यसंपन्न, गुरूत्यागीकष्टाळू,
सत्यवचनी, समंजस,  कृतज्ञता जोपासणारी, धीर देणारी, संस्कार घडवणारी अशी ती होतीमला जीवनात भेटलेल्या बुद्धिमान व्यक्तिंमधे माझ्या आईचा क्रम खूप वरचा लागतो. तिच्या बुद्धिमत्तेचे वेगवेगळे पैलू मला पहायला मिळाले, जाणीवेत उतरले आणि काही तर संस्कारातही उतरले हे माझ भाग्यच. ती दूरदर्शी होती, अभ्यासात व शिकवण्यातही पटाइत होती. तिच्याकडे  दांडगी स्मरणशक्ती होती,  उतम व्यवस्थापन कौशल्य होत, हजरजबाबीपणा होता, तर्कशुद्ध विचार होते, आणि देवाने एवढी हुषारी दिली आहे -तिचा वापर लोककल्याणासाठी करा असा संस्कार देण्याची महत्ताही होती. 


तिची जी मुर्ति सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते ती आमच्या धरणगांवच्या गांवी आडातून पाणी ओढून कपडे धूत धूत माझ्याकडून पाढे म्हणून घेणारी. आणि मी देखील तिला लहान कपडे पिळून देत आणि दांडीवर वाळत घालायला मदत करत करतच पाढे आणि तोंडी गणित शिकलेली. तिथेच सकाळची वर्तमानपत्र लोकसत्ता आणि गांवकरी पसरून त्यावर अक्षर वाचायला शिकलेली. पण तिथे तिने मला कधी कोणत्याच घरकामात अडकवल नाही जा खेळ अशी तिची कायम परवानगी असायची. तिच्या पुढील आयुष्यांत नातवंड ठेऊन घेण्याची वेळ तिच्यावर खूपदा आली आणि प्रत्येक वेळी आई-बाबांकडे परतणारी ही मुलं एवढं काही शिकून आलेली असायची की आम्ही भावंड कौतुक व आश्चर्यात बुडून जात असू.

धरणगांवच घर खुप मोठ आणि गजबजलेल. आजोबा आणि त्यांचे धाकटे बंधू अशी चिकटलेली दोन घरे, सामाईक विहिर आणि मोरी. घरांत शिकायला राहिलेली बरीच आतेभावंड आणि काका काकूंसोबत चूलत भावंड. या सगळ्यांत जास्त शिकलेली म्हणजे मॅट्रिक झालेली आई. तिचाच मान जास्त. माझ्या जन्मानंतर तिने आजोबांना सांगितले -- पुढे शिकायचय नागपूरच्या SNDT विद्यापिठात मुलींनी बाहेरून तयारी करून परीक्षा द्यायला परवानगी आहे व परीक्षेच्या १ महीना आधी नागपुरातच होस्टेल मधे रहाण्याची सोय करतात. आजोबांनी विचारले पण तुझी मुलगी कुठे राहील? ती म्हणाली ठेवीन दीड महीना तुमच्याजवळ. राहील ती. अशा प्रकारे माझे पाढे, तोंडी गणित आणि वर्तमानपत्र वाचन या मधे आजोबांचाही निम्मा वाटा आहे. पुढे त्यांनी मला खूप वेगळ्या त-हेने गणित आणि बीजगणित शिकवले. धाकटया बहिणीच्या जन्मानंतर आम्ही दोघी आईच्या परीक्षाकाळांत आजोबांजवळ असू. वडील नोकरीच्या शोधात बाहेरगांवी असत. अशा प्रकारे भावाच्या जन्मापर्यंत तिने बीएचे शिक्षण पूर्ण करून ग्रॅज्युएट ही मानाची डिग्री मिळवून घेतली. धाकटया आत्या व माझी सगळी चुलत आते भावंड अभ्यासात तिची मदत घेत.

आई कोकणस्थ होती. देवरूखच्या नामजोशी कुटुंबातील. मॅट्रिकनंतर मुंबईला मोठया बहिणीकडे येऊन राहिलेलीघरांत सात भावंडे व परिस्थिती बेताची. तालुका कोर्टात वडील वकील म्हणून नावाजले असले तरी पैशाची सुबत्ता नव्हती. त्यातून कोकणस्थ म्हणजे पै न पै जपून वापरणार. कपडे, शाळेची पुस्तके याबाबत सदा ओढताण. त्यांत आई खूप स्वाभिमानी आणि धैर्यवान होती, अस मामा, मावशी सांगत असत. चूक नसताना आणि गरीबीवरून रागावलात तर खपवून घेणार नाही अस शाळेत बाईंना दणकावून सांगायची, तर कपडे फाटले आहेत, नवीन घेऊन देत नसाल तर उद्यापासून शाळेत जाणार नाही असे वडिलांनाही सांगायची. शाळेच्या वाटेवर एका झाडावर भुतं रहातात अशी वदंती होती, त्या झाडाखालून अंधारातही धाकटया भावाबहिणींना किंवा इतर मुलांना धीर देत बिनदिक्कत घेऊन यायची

तिच्या तर्कशुद्ध विचारांची चुणूक दाखवणारा तिच्या बालपणीचा एक किस्सा आम्ही ऐकलेला आहे. तिचा मोठा भाऊ घरकामात फारशी मदत करत नसे, धाकटा मामा मात्र आजीला खूप मदत करायचा. एक दिवस त्याच्या हातून एक बशी फुटली. आजोबा खूप चिडले, मारायला निघाले. मोठा भाऊ बघ, कधीही नुकसान करत नाही असे म्हणालेतेंव्हा आईने त्यांचा हात अडवला. मोठा भाऊ घरातल कामच करत नाही म्हणून चुकतही नाही म्हणून नुकसानही करत नाही. हा जो काम करतो ते तुम्हाला कस दिसत नाही? काम करताना एखादी चूक होऊ शकते. अस तिच तत्वज्ञान ऐकूण आजोबा थांबले व पुढे कित्येक बाबतीत तिचा सल्लाही घेऊ लागले.

मुंबईच्या मावशीकडे आईपाठोपाठ धाकटा मामा व मावश्या पण आल्या. ताई मावशीचीही परिस्थिती तेंव्हा बेताचीच. ती काम करून घ्यायची प्रसंगी बोलायची पण तरीही तिने पडल्या दिवसांत सांभाळ केला आहे, उपाशी ठेवलेले नाही याचे स्मरण ठेवा असे आई नेहमी इतरांना सांगत असे. पुढे सर्वांनाच भरभराटीचे दिवस आले आणि आई व मोठा मामा सोडून सर्व मुंबईकरच झाले. तेंव्हा त्यांच्यात आपापसात तेढ मिटवून मेळ ठेवण्यात आईचा मोठा वाटा होता. हे सगळ मी जवळून अनुभवलेल आहे. तिच्या तर्कबुद्धीला प्रेम व समजूतदारपणाची झालर होती.

धरणगांवला आजोबांच्या कुटुंबात बाई म्हणून आई एकटीच होती कारण आजी वडिलांच्या लहानपणीच वारली होती. त्या काळात रिवाज होता  तरी आई बाहेर बसत नसे. तस तिने सुरूवातीलाच आजोबांना सांगितले होते व त्यांनीही संमति दिली होती, हे मला विशेष वाटत. काकू, चुलत बहिणी, आत्या अशा सर्वजणी "बाहेर" बसत. मी वयांत आल्यावर मला पण आईप्रमाणेच मोकळीक मिळाली. तेंव्हा मंदिरात जायच म्हटल की मन साशंक व्हायच. एकदा वडिलांना विचारलते म्हणाले श्वास घेतेस ना? तो प्राणवायू आपल्याला शुध्द ठेवत असतो त्याला एकच गोष्ट अपवित्र करते -- आपल्या मनातील दुष्ट विचार. ते येऊ दिले नाहीत तर मंदिरात जाऊ शकतेस आणि ते विचार मनांत असतील तर एरवी देखील मंदिरात जायचे नाही, बस्स. हे जगावेगळे तत्वज्ञान मला सातत्याने उपयोगी पडले. आता इतके वर्षानंतर मनांत विचार येतो -- नित्यनियमाने स्नान- पूजा- जप- ध्यान करणारे माझे वडील - मग हे तत्वज्ञान आईच्या सोबतीमुळे तयार झाले कां ?

धरणगांवच्या त्या लहान वयात पाहिलेला आईच्या समजूतदारपणा व दूरदर्शीपणाचा एक अनुभव आहे माझी धाकटी आत्या सासरच्या छळाला कंटाळून मुलीसोबत माहेरी आली. ही तिने येण्याची चौथी वेळ. आता परत गेली तर जिवंत रहाणार नाही अशी परिस्थिती. तिला माहेरीच ठेऊन घेण्याचा आजोबांचा निर्णय झाला तेंव्हा आईने निक्षून सांगितले तुम्ही यांना जन्मभर पुरणार नाही यांना नर्सिंगचा कोर्स करू दे तेवढी चार वर्षे यांच्या मुलीला मी सांभाळीन. किती योग्य निर्णय होता! इतरांना पुढचे दिवस चांगले जावोत म्हणून स्वतः थोडा काळ कष्ट सोसायचे अशी तिची वृत्ति होती. ती स्वतःच्या मुलांमधेही यावी यासाठी ती प्रयत्नशील असे.

ही घटना घडली तेंव्हा मी सात वर्षांची, धाकटी बहीण पाचाची, आतेबहीण चार वर्षांची आणि धाकटा भाऊ दोन वर्षाचा होता. आते नर्सिंगच्या कोर्सला गेली आणि इकडे वडिलांना जबलपुरला कॉलेजात प्रोफेसरची नोकरी मिळाली. आजोबा, आई, दादा आणि आम्हीं चार मुल जबलपुरला आलो. भाडयाचं घर, शहरातील महागाई आणि माझ शाळेच वय झालेल. त्यांत आजोबांना क्षयाची भावना झाली. म्हणजे पुनः पैशांची ओढाताण होणारच होती. घरमालक वृध्द व एकटेच होते. आईने त्यांच्या स्वयंपाकाची जबाबदारी घेतली ती सुध्दा त्यांची "पक्की रसोई " ची अट मान्य करून. म्हणजे तिचे काम अजून वाढणारच होते. इकडे मला तर वाचनाची एवढी प्रचंड गोडी लागली की हातातल पुस्तक पूर्ण वाचून संपेपर्यंत मला दुसर काही सुचतही नसे. पण जबलपुरच्या त्या अडीच- तीन वर्षांच्या काळांतही आईने मला कधी घरकामाला लावल्याच आठवत नाही. सगळ तिच करायची. एवढ करून तिने एम ए चे शिक्षण पूर्ण केले.

एक प्रसंग चांगला आठवतो. तिला सिनेमा आवडत असे पण परवडत नसे. एकदा तिने जायचे ठरवले. शाळेच्या कार्यक्रमासाठी मला नवा फ्रॉक आणायला हवा होता. तिने स्वतःचा सिनेमा कॅन्सल केला व माझा नवा फ्रॉक विकत आणला. हे आई दादांचे बोलणे मी रात्री ऐकले तेंव्हा कळल की आईला त्यागमूर्ति म्हणतात ते कां !

ते दशक संपता संपता तीन गोष्टी एकत्र घडल्या. वडिलांना खूप लांब दरभंगा (बिहार) येथे चांगली सरकारी नोकरी मिळाली. तेंव्हाच इकडे आजोबा वारले. आत्याचाही नर्सिंग कोर्स पूर्ण होऊन तिला नोकरी मिळाली होती. म्हणून ती आमच्या आतेबहिणीला घेऊन गेली. असा आमचा परिवार सातावरून पाच वर आला व आम्ही दरभंगा नामक अपरिचित शहरात दाखल झालो. घरांत नवे बाळ येण्याचीही चाहूल लागली होती म्हणून नात्यातल्या एक काकीही जबलपुरहून आमच्या बरोबर दरभंग्याला आल्या.

कालांतराने सर्वात धाकटी बहीण जन्मली, पण पुढे आठच महिन्यात ती वारली. काकी कधीच परत गेल्या होत्या. माझी समज वाढत गेली तसे आईचे एकेक गुण जाणवू लागले. तिने हिंदी भाषा आत्मसात केली. आमच्या रहात्या मोहल्ल्यांत सर्वाधिक शिक्षित म्हणून तिला मान होता तसेच, ती अडीअडचणीला मदतीला धावून येते हे ही सर्वांना जाणवले होते. मराठी भाषा परकी होऊ नये म्हणून पोस्टाने रोजचे वर्तमानपत्र, मुलांसाठी चांदोबा आणि स्वतःसाठी किर्लोस्कर व स्त्री मासिके तिने लावली. वडील पूर्ण पगार तिच्याकडे देत व खरेदी करून आल्यावरही तिला पूर्ण हिशोब देत. ती रोज रात्री डायरीत जमाखर्च लिहायची. घरांत सुट्टया नाण्यांचा डबा ठेवला होता. अधून मधून आम्हाला ते मोजायला बसवायची. त्यामुळे पैसे उचलण्याचा मोह न होता ते हाताळण्याची आम्हाला सवय लागली. शाळेच्या बाहेर विकले जाणारे सामोसे, सोनपापडी इत्यादि जिन्नस मुलांनी खाऊ नये म्हणून घरी नित्यनियमाने फराळाचे पदार्थ व दर रविवारी सामोसे किंवा बटाटेवडे असा बेत करायची. तिचा स्वयंपाक उत्कृष्ट चवीचा असे. तो गुण माझ्या बहिणीने उचलला. तिने स्वतः सर्व पदार्थ वारंवार करून पाकसिध्दि प्राप्त केली आहे. मी मात्र "हाँ, पध्दत बघितलेली आहे, वेळ पडेल तेंव्हा जमले की" या वृत्तीची होते. तसे घरकामाच्या बाबतीत आम्ही सर्व भावंडे थोडीफार समजूतदार होतोच, पण आईने कधीही कुणाला हे कर म्हणून सांगितले नाही. जे आम्ही केले नसले ते करून टाकून मोकळी होत असे.

तिचे अक्षर खूपच सुंदर होते. पानेच्या पाने एकाच आकाराचे, सुंदर वळणाचे, खाडाखोड न करता अगदी छपाई केल्यासारखे दिसावे असे तिचे लिहिणे होते. आमच्या शाळेच्या पालक कमिटीवर ती सदस्य होती. आमची मुलींची शाळा होती व मुलींना घरून आणायला एक बस होती. ती बंद झाली किंवा ड्रायव्हर आजारी झाला की शाळेला सुट्टी दिली जाई. मुलींनी पायी शाळेत जाण्याची पध्दत नव्हती. आईने आग्रहपूर्वक ती बस विकायला लावली व मुलींना शाळेत पायी येऊ द्या हे मान्य करून घेतले. सायन्स शिकवणारे शिक्षक लावा व मुलींना तो पर्याय निवडू दे हे ही आग्रहपूर्वक मान्य करून घेतले. आम्ही खेळात मागे राहू नये म्हणून घरात बॅडमिंटनच्या रॅकेट्स, बुध्दिबळ, कॅरम, पत्ते, असे सर्व खेळ आणवले व स्वतःही आमच्याबरोबर खेळत असे. यासाठी नेमकी कुठे काटकसर करावी व मुलांना काटकसरीची झळ कशी लागू नये हे तिला बरोबर कळत असे. एमबीए वगैरे न करताच ती व्यवस्थापन कुशल होती.

दरभंग्याला आल्यावर सुरवातीला तिने एका शाळेत शिक्षिकेची नोकरी धरली. मी नववीत गेल्यावर अॅडव्हान्स गणित व सायंन्स हे विषय निवडले होते. त्या काळी बिहारच्या शिक्षणात खूप विषयांपैकी चार विषय निवडण्याचा पर्याय होता. त्यात भौतिकी, रसायन, गणित, वनरचतिशास्त्र, जीवशास्त्र, ड्राइंग, संगीत, फर्स्टएड, कुकरी, डोमेस्टिक सायन्स, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, असे खूप पर्याय होते. मात्र दोन पेपर इंग्लिश, दोन हिंदी आणि समाज अध्ययन हे कम्पलसरी होते. शिवाय एक्स्ट्रा नावाने एक भाषेचा विषय घेता येत असे, ज्यातील मार्कांपैकी तीस वजा करून बाकी मार्क तुमच्या टोटल मधे मिळवत. यामधे संस्कृत, मैथिली, नेपाळी, बंगाली व पार्शियन या भाषांचा पर्याय होता. मी संस्कृत निवडून त्यांत नेहमी नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळवले त्यामुळे माझी टक्केवारी सातने वाढून मी कायम पहिला नंबर काढत असे. मात्र नववीत भौतिकी रसायन प्राथमिक गणित- अडव्हान्स गणित असे विषय निवडल्यावर माझी दमछाक होऊ लागली. कारण त्या लेव्हलचे भौतिकी व रसायनशास्त्र शिकवणारे शिक्षक शाळेत नव्हते. मग आईने नोकरी सोडली व स्वतः पुस्तकावरून अभ्यास करून मला शिकवू लागली. खास करून अॅडव्हान्स गणिताचा कोर्स हा आपल्याकडील आताच्या आप्लाइड मेकॅनिक्सच्या कोर्ससारखा होता. तो तर आईला अधिकच दुर्बोध. तरीही ती जिद्दीने माझ्याजवळ बसायची व मला वाचून वाचून समजेल असे बघायची. थोडी मदत शाळेचे मुख्याध्यापक करत. हळूहळू मला ते येऊ लागले व मॅट्रिकमधे मी सर्व सायन्स विषयांत भरघोस मार्क मिळवून दरभंगा जिल्ह्यांत मुलींमधे पहिला नंबर काढला. जवळ जवळ तेंव्हाच मी आय्एएस ला बसायचे असे लोकांनी पक्के करून टाकलेपण या अभ्यासात व यशांत तिचा खूप मोठा वाटा होता.


त्या काळी सर्वत्र वीज नव्हती. आमच्या रहात्या भागांतही नव्हती. माझे बीएस्सी पर्यंत सर्व शिक्षण कंदीलाच्या उजेडातच झाले. मी दिवसभर उनाडक्या करीत असे आणि रात्री मला डोळ्यासमोर खूप अभ्यास दिसायचा. मग आई पण माझ्यासोबत थांबायची. १९६२-६३ च्या सुमारास बॅटरीवर चालणारे ट्रान्सिस्टर्स निघाले तसे आईने पण घेतला. रात्री ती विविध भारतीवर 'बेला के फुल' ऐकत माझा अभ्यास संपेपर्यंत बसायची. "रात्र झाली की हिला अभ्यास, कामं सुचतात. दिवसभर हीची बुध्दी कुठे जाते?" असं आई मला नेहमी म्हणायची. पण मला तिच्या बोलण्यांत कौतुकाचा भास व्हायचा. धाकटी बहिण मात्र सगळा अभ्यास, सगळी काम वेळच्या वेळी पूर्ण करायची. भाऊही तसाच गुणी. तरी पण हीच का म्हणून तुझी आणि दादांची लाडकी असा प्रश्न ते दोघे विचारीत. मलाही प्रश्न पडायचा पण मी घरातील सर्वात मोठी मुलगी असल्याने हे सुख मला मिळते, अस मला वाटे. अगदी अलीकडे आईने माझ्याबद्दल लिहून ठेवलेल वाचल--हिने कधी हट्ट केला नाही, कांही मागितल नाही म्हणून ती लाडकी होती. मला भरून आलं. आईने खेळायला अडवल नाही, पुस्तक तास् न तास वाचू द्यायची. घरकाम सांगायची नाही आणि अभ्यास कर म्हणूनही कधी ओरडली नाही. मग मी हट्ट करणार तरी कशाचा ?

आईला गॉसिप हा प्रकार अजिबात आवडत नसे. मोहल्ल्यांत तिच्या ओळखी व गप्पा खूप असायच्या पण कुणाची निंदा नालस्ती नसे. घराबाहेरही फारस जाण नसायच. तरीही बाजारात कोणत्या दुकानात कोणती वस्तू चांगली मिळते ते तिला नेमकं माहीत असायच. माझ्या दृष्टीने जगातील सर्वात कंटाळवाणे काम शॉपिंग. मला शाळेत, कॉलेजात जाऊनही दुकानं माहीत नसायची आणि हिला घरबसल्या कशी कळतात? पण तिची नजर आणि स्मरणशक्ती दांडगी होती. रिक्षात बसून जातांना कुणाचे घर, कुठले दुकान, कुठले वळण, तिथे कोण म्हातारी बांबूच्या टोपल्या विकते पासून कोणाच्या दुकानात नव्या साड्यांचा स्टॉक आला आहे हे सगळ ती क्षणांत टिपून घ्यायची. घरातही काही सापडत नाही म्हणून तिला विचाराव तर बसल्या जागेवरूनच अग ते अमुक ठिकाणी आहे, मला इथून दिसतय बघ, अशी  तिची सवय होती. तीच गोष्ट १५-२० वर्षांनंतर भेटलेल्या व्यक्तींची. बघताक्षणी तिला आठवे- नावं, गांव, कुटुंबातील माणस. मागे तुमच्या आई आजारी होत्या ना हो -- वगैरे. या प्रकारातील माझी स्मृति शून्य. मोठेपणी नातेवाईक मला विचारत तुमच्या आईला या सर्व गोष्टी, सर्व चेहरे आठवतात, तर तुम्ही कशा अश्या? तेंव्हा माझा खूप वैताग व्हायचा.

दरभंग्याला गेल्यावर वडिलांनी मला लेडीज सायकल घेतली व स्वतः शिकवली. बिहार सारख्या राज्यात जिथे बस नसेल तर शाळा बंद ठेवत तिथे एक मुलगी सायकलवर शाळेत जाते म्हटल्यावर काय विचारता? अरे देख देख छोरी साइकिल चलावै छे हे वाक्य खूपदा ऐकू येई. अशा धाडसीपणासाठी दादांना आईची पूर्ण साथ असायची. मात्र माझ्या बहिणीने जेंव्हा म्हटले मी नाही सायकलवर जाणार, तेंव्हा आई तिच्या बाजूने उभी राहिली. सगळी पोरं एकाच स्वभावाची कशी असतील असा तर्कशुध्द संवाद करून तिने दादांची समजूत काढलीमाझ्या शाळेच्या अभ्यासाला माझ्या बरोबर बसायची तसेच बहिणीच्या संपूर्ण डॉक्टरकीच्या शिक्षणांत तिच्यासोबत बसून आई तिला प्रोत्साहन देत असे.

आईचे ड्राईंग खूप छान होतेलग्वाच्या पंक्तीत पन्नास ताटांभोवती तिने पाच मिनिटांत फ्री-हॅण्ड रांगोळी काढली तर त्यातील एकही रांगोळी दुसरीसारखी नसायचीआमच्या दोघीं बहिणींना प्रॅक्टिकलच्या वहीतील ड्राईंग काढून देत असेपण भाऊ कॉलेजला गेला तसे एकदा ती म्हणाली -- आता मी म्हातारी झाले रेमग त्याने स्वतःच ते काम केलेपण आईला म्हणाला -- मला दरवेळी म्हातारी झालेरे म्हणशील तर चालणार नाही हांतसेच झालेत्याचा मुलगा इंजिनियरिंगसाठी चार वर्षे आई-दादांकडे राहिला व त्यांनीही कौतुकाने त्याला सांभाळले.

मी मुलींच्या शाळेतून मुलामुलींच्या एकत्र अशा कॉलेज मधे गेलेमहाराष्ट्रात वाढलेल्या आई दादांना हे कांही नवे नव्हतेपण मला होतेमग मुलांशी ओळखीगप्पाकधी चहाला जाणकधी थोडया उशीरा घरी येण अस सुरू झाल आणि मला जाणवल की जरी आपल्याला पाच रूपये पॉकेटमनी दर महिन्यालामिळत असला तरी त्याचा हिशोब आईला द्यावा लागतोमग मी एक दिवस डिक्लेअर केल -- माझ्या पॉकेटमनीचा हिशोब देणार नाही आणि माझ्या नांवाने आलेली पत्र कुणी फोडायची नाहीतमी एकदम मोठ्या वादळाच्या तयारीत होतेपण आई म्हणालीहां बरोबर आहेथोड स्वातंत्र्य तुला द्यायलाच हवमी आ वासून बघतच राहिलेतेवढ्यांत ती पुढे म्हणाली -- आणि तूही आमचा विश्वास टिकवायला हवातेवढ एक वाक्य पुरल मला जन्मभर कणखरपणा दाखवलाअसच माझा धाकटा भाऊ कॉलेजात जाऊ लागला आणि नेमकी सिगरेट ओढणारी दोन मुल त्याची दोस्त झालीआम्ही दोघी बहिणींनी त्याला सांगितल या मुलांशी दोस्ती सोडतो आईला म्हणाला आईमीच त्यांच्या संगतीत सिगरेट शिकेन अस असतं कां ते पण माझ्या संगतीत सिगरेट सोडू शकतात ना आई म्हणाली हां बरोबर तेवढा विश्वास ठेवलाच पाहिजे तुझ्यावरझालेतो पण त्या विश्वासाच्या बंधनात अडकवला गेलाआता आमची मुल म्हणतात -- आजी किती थोर होती ना तिच्या शिकवणीमुळे आमच्याही आई बापांनी आमच्यावर विश्वास टाकला.

अशी माझ्या बालपणातच बुद्धिमत्तेने भारून टाकणारी आईमाझ्या पुढील आयुष्यातील तिच्या आठवणींचा एक मोठाच ग्रंथ होईल. आम्ही मोठे झालो, स्वतः आई-बाप बनलो तेंव्हाही तीच हक्काची मदत मागावी अशी आई होतीतिची सहाही नातवंड तिच्याकडे दीर्घ काळ छान राहिलीत आणि तिच्याकडून खूप शिकलीतत्यांच्याकडे दुरून बघतांना जाणवायच की आईची मुलांना हाताळायची कसोटी कांही वेगळीच होतीती तिला मॉम म्हणत आणि तीच जगातील सर्वात आवडती व्यक्ती असा निर्वाळा देत

ती शेवटी शेवटी माझ्याकडे गोव्याला राहिली होतीकाय तिचे नातवंडांसोबत ऋणानुबंध जुळले होते कुणास ठाऊक पण योगायोग असा की सहाही नातवंडं तिला एकेक करून भेटून गेलेली होती -- तेही एखाद्या प्लानिंगशिवायजग भटकत असलेला भाचा एकदा अचानक माझ्याकडे  आला -- डॉक्टरेटसाठी पुम्हा अमेरिकेत चाललोय म्हणून मॉमला भेटायला आलोयदोन दिवसांनी अचानक भाची पण आली कायरात्री मी मॉमजवळ झोपणारसे सांगून दोन दिवस तिच्याजवळ झोपली काय आणि तिसऱ्या दिवशी सकाळी आईला अचानक मोठा हार्ट अटॅक येऊन ती अचानकपणेच वारलीजणू सर्वांच्या भेटीपुरतच थांबली होती.

माझा नातू अडीच वर्षे वयांत जेमतेम पंधरा दिवस तिच्यासोबत राहिला होतापण नुकतेच जेंव्हा मला म्हणाला -- मला मॉमला भेटावस वाटत गं तेंव्हा मला खरं समजल की मुलांना हाताळायची तिची कांय विलक्षण ताकद होतीत्या ताकदीनेच आम्हा भावडांना घडवलं.

-------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

एक शहर मेले त्याची गोष्ट

उद्धव गीता भाग १ -- भांडारकर व्याख्यान दि. १२ जून २०१९