चरखा-टकळीचे तत्वज्ञान

चरखा-टकळीचे तत्वज्ञान
(हे ही पहावे चरख्याचे तत्वज्ञान प्रत्यक्षांत आणता येईल कांय --
लोकसत्ता बुधवार 8 जुलै 2009 पुन्हा चरखा

http://sites.google.com/site/leenameh/punha-charkha.pdf)
काही दिवसापूर्वीची गोष्ट, एका विशिष्ट ध्यासामुळे मी ठरवलं की, आपण चरख्यावर सूत कातायला शिकायचं. ती सुरूवात झाली आणि एक वेगळचं तत्वज्ञान मनाला जाणवू लागलं. आता लक्षात आलं की, शेले विणताना कबीराला दोहे सुचत आणि जात्यावर बसून बहिणाबाईना ओव्या सुचत ते कसे.
तसं पाहिल तर, चरखा हे दिसायला किती सोपं काम, चरख्याला एक टकळी असते आणि एक फिरवायची तबकडी. तबकडी गोल फिरवली की, टकळीवर दोरा फिरतो. त्याने दो-याला पीळ पडतो व त्याला मजबुती येते. दो-याच्या टोकाला पेळूचा कापूस गुंतवला आणी थोडासा ताण देऊन ओढल की, सूत निघत रहातं, तबकडी फिरवून या सुतावर हल्कासा पीळ देऊन पक्का करायचा आणि टकळीवर गुंडाळून घ्यायचा की पुन्हा पेळूतून नवीन धागा ओढायला आपण तयार.
पण प्रत्यक्ष चरखा चालवायला बसल्यावर जाणवलं की हे काम दिसत तितकं सोप नाही. कापसातून जो धागा कातला जातो त्याच्या टोकाला भरपूर तंतू असतात. पेळूवर त्यांना ठेऊन टकळीने अगदी हलके फिरवल तर, त्या तंतूना पेळूच्या कापसाचे तंतू जोडले जाऊन धागा बाहेर येऊ लागतो. पण याच धाग्यामध्ये पीळ जरा जरी जास्त होऊ लागला तर कापसाच्या तंतूना आकृष्ट करण्याची, त्यांच्याशी एकरूप होण्याची क्षमता संपून जाते आणि पुढला धागा कातला जात नाही.
मनाचेही असेच नाही का? जोपर्यन्त आपल्या बोलण्यात पीळ असेल तोपर्यन्त आपण इतरांशी जुळवून घेऊ शकत नाही की, एकरूप होऊ शकत नाही की त्यांना आपल्याकडे आकृष्ट करू शकत नाही.
समाजातील चांगल्या लोकांचेही असेच आहे. समाजातील दुष्प्रवृत्त व्यक्ती एकत्र येऊ शकतात पण सत्प्रवृत्त व्यक्तींना मात्र एकमेकांची साथ मिळत नाही, कारण प्रत्येकाच्या मनात मोठा पीळ पडलेला असतो - अहंकाराचा पीळ.
काही वेळा खूप जास्त पीळ बसून धागा मध्येच तुटतो. अशा वेळी ज्या ठिकाणी टकळीचा धागा तुटला त्या जागेवरील थोडासा धागा खुडून टाकला तर त्या टोकावर पुन्हा एकदा तंतूंचा फुलोरा दिसू लागतो. मग आपण ओळखायचे की, आता हा भाग पेळूवर ठेवल्यास तंतू ओढले जाऊन धागा कातला जाईल.
धागा कातण्यासाठी आप‌ण उजव्या हाताने तबकडी फिरवत असताना डाव्या हाताने पेळू अलगद धरून हळूहळू मागे ओढत जायचे. हा हाताचा अलगदपणा, धाग्याचे कातले जाणे आणि थोडा पीळ देऊन त्याला मजबुती आणणे, या सर्वामध्ये एक प्रकारचा तोल सांभाळसा गेला पाहिजे. असाच तोल सांभाळणे जीवनात पण महत्वाचे.
म्हणूनच की काय, गांधीजी म्हणत की, माझा चरखा म्हणजे माझा रामच आहे. चरखा कातायला बसलं की एक प्रकारची भावसमाधीच लागते.
आपण टकळी, चरखा कातायला बसायचे या संकल्पनेचे बीज कित्येक वर्षापासून माझ्या मनात होते. आषाढ लागला की, महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील भक्तांना पंढरीच्या विठोबाचे वेध लागतात. वारी सुरू होते. मजल दरमजल करीत वारकरी मंडळी पंढरीला जातात. त्याकाळी यांच्याकडे एक एक टकळी दिली आणि मुक्कामाच्या ठिकाणी त्यांनी सूत कातले तर, सुमारे १ कोटी मनुष्य दिवसात सहजपणे लाखो मीटर धागा आणि हजारो मीटर वस्त्र तयार होऊ शकेल. हे वस्त्र श्रमाची प्रतिष्ठा प्रस्थापित करणारे तर असेलच पण त्याहीपेक्षा या वस्त्राच्या धाग्याधाग्यांत हरिनाम सामावलेले असेल. मग हेच वस्त्र ज्याने त्याने पांडूरंगाला अर्पण केले आणि तेच प्रसाद स्वरूपाने भक्तांना वाटप केले तर ती एका कर्मनिष्ठ भक्तीयागाची सांगता असेल. मुखी हरीनाम, कानी हरिनाम आणि हाती टकळीचा धागा, त्या वस्त्राने कदाचित पांडूरंगालाही धन्य वाटेल.
पण हे घडून यायच तर खूप जुळवाजुळवी करावी लागेल, ती कशी करणार या विचारात, आणि हे करावं की न करावं या संभ्रमात कित्येक वर्ष गेली आणि योगायोगाने अचानक वारकरी पंथातील वरिष्ठ मंडळीना ही संकल्पना ऐकवण्याचा योग आला, त्यांनी देखील तात्काळ ही कल्पना उचलून धरली आणि पहिले एक पाऊल, मग पुढचे पाऊल, याप्रमाणे वाटचालीला नुकतीच सुरूवात झालेली आहे.
यासाठी सुमारे पन्नास महिला वारक-यांची पहिली बॅच प्रशिक्षीत झाली, टकळी ऐवजी एक पाँकेट चरखा वापरण्याचे ठरले. सुरूवात बारा चरख्यांनी झाली, तरी वारीमध्ये किमान पन्नास चरखे वापरून किमान एक हजार वारकरी भक्त सूतकताई करतील असे उद्दिष्ट ठरले. त्यामध्ये महिलांचा सहभाग मोठा असेल.
अशाप्रकारे या उपक्रमात श्रमाची प्रतिष्ठा व श्रध्दा हे दोन महत्वाचे मुद्दे तर आले. पण अपरिहार्यपणे आर्थिक मुद्दा पण आलाच. कारण तो प्रश्नही ज्याच्या त्याच्या मनांत असतोच. चरखा शिकून झालेल्या महिलांच्या मनांतही आहे की वर्षभरांत त्यांना पुष्कळ वेळ मिळणार असतो, मात्र त्यांचं सूत विकलं गेलं, त्याचं कापड विणलं गेलं, तर थोडा पैसा गांठीला येऊ शकेल. याची व्यवस्था झाली तर किती दिलासा असेल.
चरखा, टकळी यावर कातलेले सूत किंवा हातमागावर विणलेले वस्त्र यांचे आजच्या युगात नेमके स्थान कोणते आहे? महात्मा गांधीनी स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी ही स्वदेशीची चळवळ चालविली ती परिस्थिती खूप वेगळी होती. ती विसाव्या शतकाची सुरूवात होती. युरोपात औद्योगिक क्रांती येऊन कापड गिरण्या स्थापन झाल्या, त्याला फार तर शंभर वर्षे लोटली होती. भारतात कापडगिरण्या नुकत्याच येऊ लागल्या होत्या. मात्र गावोगांवी टकळी, चरख्यावर सूत कातणे आणि गावातच मागावर कापड विणणे हे दोन मोठे उद्योग होते. कृषी संस्कृती पाठोपाठ वस्त्र संस्कृती हीच आपल्या देशाची दुसरी मोठी खूण होती. त्यावर कोट्यावधी लोकांचा विशेषतः स्त्रियांचा चरितार्थ चालत असे.
गिरण्या येऊ लागल्या तसे हे चरितार्थाचे साधन लोकांच्या हातातून निसटून जाऊ लागले. अर्थात गिरण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होऊन काही टक्के लोकांचा चरितार्थ पुन्हा नीट बसला. पण त्यामध्ये सर्वाचा समावेश नव्हता. तो शक्यही नव्हता. आणी मालकीच्या नात्याने तर नव्हताच नव्हता. त्याच जोडीला विदेशातून मोठ्या प्रमाणावर आयात होणा-या युरोपीय मिल्सचे स्वस्त कापडही होते. त्यामुळे देखील चरखा व हातमाग मागे पडत होते आणि खेडोपाड्यातील लाखो विणकरांचे चरितार्थाचे साधन संपुष्टात येत होते.
या पार्श्वभूमिवर गांधीनी चरखा-टकळी मोहीम सुरू केली. तिला एवढे मोठे परिमाण लाभले की “चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे” हे त्यावेळचे लोकगीतच होऊन बसले. विदेशी शक्तीबरोबर लढण्याचे एक साधन म्हणून चरखा वापरला गेला. तो तसा वापरला जाऊ शकला कारण तत्कालीन विकेंद्रित अर्थव्यवस्थेतील उत्पादकतेचे ते प्रतीक होते आणी ही उत्पादकता लाखो विणकरांच्या हातात, त्यांच्या मालकीची होती.
आज आपण शंभर वर्षे पुढे आलेलो आहोत. या शंभर वर्षानंतर कापड गिरण्यांचे तंत्रज्ञान आपल्या मातीतही घट्ट रू‏जलेले आहे. देशाची सांपत्तिक प्रगती वाढवण्याचे साधन म्हणून आपण सूत गिरण्यांकडे बघतो. पूर्वी गावोगांवी असलेली चरखा - हातमागांची परंपरा कधीच मोडकळीत निघालेली आहे. नवीन पिढीला तर हे शब्दही माहित नसतील. स्वदेशी मुद्दाही गैरलागू नाही पण आता कापडगिरण्या आपल्याच लोकांच्या हातात आहेत. मग चरखा टकळी कशाला असे स्वदेशीचे आधुनिक पुरस्कर्ते विचारतात तेंव्हा यावर गांधींनी काय उत्तर दिले असते असा प्रश्न माझ्या मनांत येतो.
तरी पण चरखा टकळी व हातमाग यांचा कार्यभाग किंवा रोल पूर्णपणे संपलेला नाही असे मला वाटते. आणि त्याला तसेच कारणही आहे.
आपला देश आजही भयानक आर्थिक विषमतेने ग्रासलेला आहे. श्रीमंतांकडे आलिशान खाजगी विमाने असतील, पण गरीब माणसाकडे अजूनही बैलगाडी, हाताने ओढण्याच्या रिक्षा, हीच साधने असलेली आपण पाहतो. एकीकडे अद्ययावत इस्पितळे असतील तर दुसरीकडे कापलेल्यावर पटकन हळद दाबून जखम बरी होऊ देणारे लोकही आहेत. थोडक्यात आपल्याकडे संमिश्र अर्थव्यवस्था आहे. केंद्रित व्यवसाय उद्योगाबरोबरच विकेंद्रित उद्योगही आपल्याकडे चालतात नव्हे आवश्यक देखील असतात. आर्थिक विषमतेची दरी जेवढी कमी तेवढी या विकेंद्रित साधनांची गरजही कमी. पण आज तरी ही दरी मोठया प्रमाणावर आहे, वाढत आहे, अशा परिस्थितीत या विषम दरीच्या तळागाळाला असलेंल्या गरीब माणसाच्या हातात कांय उरतं? तर फक्त विकेंद्रित उत्पादनाची साधने उरतात. त्यंना लहानशी कां होईना, बाजारपेठ मिळाली नाही तर गरीबाचे हाल होतात.
ज्याच्याकडे मोठे आर्थिक भांडवल असेल तो कापड गिरणी उभारेल, गरीबाच्या हातात त्याला थोडा दिलासा देऊ शकेल असे काय? याचे उत्तर चरखा, टकळी आणि हातमाग.
चरखा टकळी यावर तयार झालेले वस्त्र किंमत, सौंदर्य आणि फिनिश या सर्वच बाबतीत मिलच्या कापडाच्या तुलनेत टिकाव न धरु‎ शकणारे असेल, पण एका बाबतीत ते मिलच्या कापडापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. कारण हे कापड आपल्या आरोग्यासाठी अति उत्तम आहे, कम्फर्टेबल आहे. आताच्या भाषेत बॉडी फ्रेन्डली. ज्याने खादी वापरु‎न प्रचीती घेतली त्यालाच हे कळू शकेल.
म्हणूनच आपल्या अर्थव्यवस्थेत चपखल बसेल असा हा फॉर्म्यूला आहे. देशातील नव्वद टक्के लोकांनी मिलचा कपडा वापरावा, पण देशाला लागणारे सुमारे दहा टक्के कापड हस्त उद्योगातून निर्माण होऊ शकते. तेवढे गिर्‍हाईक आपल्या देशांत आहे, किंवा तयार होईल. कांही स्वत:च्या आरोग्याचा विचार करु‎न इकडे वळतील तर काहींच्या दृष्टीने तो समाज सेवेचा किंवा समाज ऋण फेडण्याचा वसा म्हणून असेल. त्यातून जर असे वस्त्र आषाढीच्या वारीत पांडुरंगावर अर्पण केलेले वस्त्र असेल ते प्रसाद रूपाने ग्रहण करु‎ इच्छिणारे भाविक देखील हजारोच्या संख्येने पुढे येतीलच.
अर्थकारणचा एक दुसरा मुद्दा फार महत्वाचा आहे. आज विदर्भ मराठवाडयातील कापूस उत्पादक शेतकरी इतका नाडला जातो की, त्याच्या आत्महत्या थांबता थांबत नाहीयेत. याचे एक महत्वाचे कारण आहे. कापूस उत्पादक शेतकरी स्वत:कडे कापूस साठवून ठेऊ शकत नाही. कारण उघडयावर ठेवलेल्या कापसावर पावसाचे शिंतोडे उडाले तर, त्यामधील सरकीला (म्हणजे कापसाचे बी) कीड लागली तर, अशी एक ना दोन अनेक कारणे आहेत ज्यामुळे कापसाची नासाडी होते. एका ठराविक मुदतीत हा कपूस सरकारी यंत्रणेत विकला गेला नाही तर समोर येईल त्या व्यापार्‍याला, मिळेल त्या भावाने कापूस विकणे शेतक-याला भाग आहे. कापूस लवकर विकला तरच शेतकरी देणेकर्‍यांचे कर्ज फेडू शकतो ही ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात त्याला डिस्ट्रेस सेल (Distress sale) करावा लागतो. त्याऐवजी शेतकरी आणि त्याचे कुटुंब यांना जेवढया कापसाची सफाई करवून घेऊन पेळू तयार करु‎न ठेवता येतील त्यांना तेवढ्या प्रमाणांत डिस्ट्रेस सेल करावा लागणार नाही. हे प्रमाण खूप कमीच असेल, माझ्या अंदाजाने शेतकरी स्वतः फार तर दहा टक्के कापूस पेळू करण्यासाठी वापरू शकेल.
मात्र हे पेळू मिलवर कापड विणण्यासाठी चालत नाहीत. मिलला लागणारे पेळू तयार करणारं पण तरीही जे शेतकर्‍याला घरगुती पध्दतीवर वापरता येईल अस मशीन आहे का? या बद्दल मला माहिती नाही. मात्र टकळी किंवा चरख्यासाठी लागणारे पेळू तयार करण्याचं छोटं मशीन तीन ते चार हजाराला मिळून ते शेतकर्‍याला घरातच वापरता येईल. त्याचप्रमाणे सूतकताई देखील घरीच करता येईल. या पुढचा टप्पा म्हणजे करघ्यावर कापड विणणे. ते ही गांवातच करता येईल -नव्हे यायला पाहिजे कारण विकेंद्रीकरणाच्या व्यवस्थेत मालाची फारशी वाहतूक ही परवडणारी बाब नसते. तसेच माल विकला जाण्याची गति देखील फारशी नसते. म्हणूनच या विकेंद्रीत व्यवस्थेमार्फत दहा टक्केपेक्षा जास्त बाजार पेठेचा विचार केला जाऊ शकत नाही. म्हणूनच ज्यांना आरोग्यासाठी बॉडी फ्रेंडली वस्त्र हवे त्यांना रात्री अंथरण्याच्या चादरी, नाईट ड्रेस, इत्यादीसाठी हे कापड वापरता येईल. याचा प्रचार होणे गरजेचे आहे. यामध्ये पर्यावरणाचा समावेशही आहे. मिल मधून कापड तयार होत असताना 1 मीटर कापड तयार होण्यास सुमारे 70 लिटर पाणी लागते असे एका अभ्यासात आढळून आले. या उलट हातमागात पाणी लागत नाही.
याखेरीज चरखा व टकळीवर सूत काततांना मी एक विलक्षण अनुभव घेतला. कापसाची बोंडे रोपांवर असतात तोपर्यंत त्यांच्यात प्राण किंवा जीवन असते. कापूस वेचल्याबरोबर हा प्राण निघून जात असेल कां? सध्याच्या वैज्ञानिक सिध्दातांना माहिती असलेले उत्तर हेच की असा कापूस निष्प्राण असतो. पण मला आता या उत्तरा बद्दल संशय निर्मा‌ण झाला आहे. कापूस वेचण्या‍पासून तर वस्त्र विणण्यापर्यंत त्यावर जेवढे कमीत कमी मशीनी आघात होतील, त्यांत पॉलिस्टर इत्यादींची जेवढी कमी भेसळ होईल तेवढे ते जास्त बॉडी फ्रेंडली असेल. हा बॉडी फ्रेंडली रहाण्याचा गु‌ण कुठून आला? चराचरांत ब्रह्मचैतन्य आहे असं सांगणारी आपली भारतीय संस्कृती सांगते की ज्याला आपण सजीव म्हणतो आणि ज्याला निर्जीव म्हणतो त्या दोहातही चैतन्य आहे पण त्यांचे स्वरूप वेगळे आहे. याचा असा अर्थ काढावा कां की कधीतरी पहिल्या प्रकारचे चैतन्य हळू- हळू लोप पावून (एका झटक्यांत नाही) दुसर्‍या प्रकारात रु‎पांतरित होत असेल? टकळी काततांना खूपदा पाहिले की जो पेळू तीन चार दिवस उघडयावरच राहिला त्याचा धागा जास्त तुटायचा पण जो कागदांत गुंडाळून ठेवलेला पेळू असेल त्याचा धागा फारसा तुटला नाही. पीळ जास्त पडला की, धाग्याच्या टोकाला पुढचा कापूस जोडला जात नसे. तर मग त्या कापसाच्या तंतूंमध्ये कुठेतरी आंतरिक संवाद किंवा कम्युनिकेशन असेल का? जितके मशीनी आघात जास्त तितके हा संवाद चटकन तुटत असेल आणी चैतन्य हरवत असेल, असे तर नाही? म्हणूनच हाती कातलेले व विणलेले वस्त्र जास्त बॉडी फ्रेंडली रहात असेल का? चरखा टकळी कातताना मला कधीकधी जाणवायचं की आपला या धाग्याबरोबर संवाद सुरू आहे. तसे नसेल तर हरिनाम घेत गेत सूत कातण्याच्या कल्पनेला महत्व काय उरते?
ही अनुभूति व हे प्रश्न मनात आल्यावर मी माझ्या मनात असणार्‍या भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्याला विचारलं - आपण
अंधश्रध्देकडे चाललोय कां? उत्तर मिळाल "नाही. अनुभूतीचे सत्य हेच सत्य असते. मात्र आपला अनुभूतींचा ठेवा अपुरा असेल तोपर्यंत त्यातून फक्त निरीक्षण मांडावे निष्कर्ष काढू नयेत." आणि हो, जॉर्ज गॅमो, आइन्स्टाइन आणि श्रोडिंगर सारख्या नोबेल पारितोषक विजेत्या भौतिक शास्त्रज्ञांनी देखील त्यांचे निरीक्षण नोंदवले आहेच की “फिजिक्सच्या पुढच्या टप्प्यासाठी भारतीय दर्शनशास्त्राचा अभ्यास करणे उपयोगी राहील.” सबब हा निरीक्षण नोंदविण्याचा प्रपंच.
या अनुभूतीजन्य किंवा तात्विक मुद्यांची चर्चा सोडून यातील आर्थिक मुद्द्याची चर्चा प्रशासनातील माझ्या वरिष्ठ सहाकारी मंडळी बरोबर केली तेंव्हा त्यांचा प्रश्न होता - पण गरीबाला चरखा-टकळी का द्यायचे? त्यापेक्षा तुम्ही दुसर्‍या व्यवसायाचा विचार का करीत नाही? उदाहरणार्थ शिलाईचा व्यवसाय.
याचे उत्तर असे आहे की, विकेद्रित व्यवस्थेतील कोणत्याही उत्पादनाच्या तीन बाजू असतात - तिवईच्या तीन पायांसारख्या - यातली कुठलीही बाजू लंगडी पडली तर तिवई उभी राहू शकत नाही. एक म्हणजे त्या व्यवसायासाठी लागणारे कौशल्य शिकायला किती वेळ लागतो आणी ते किती सोपे किंवा किती कठीण आहे? दुसरे म्हणजे त्या व्यवसायाच्या सुरुवातीसाठी किती भांडवल लागेल - किती जास्त किंवा किती कमी? त्या मालाची विक्री केंव्हा होऊ शकेल - किती लवकर किंवा किती उशीरा? ती बाजारपेठ त्याला कुठे मिळते - किती जवळ किंवा लांब? तिसरा म्हणजे त्यातून मिळणारे उत्पन्न किती जास्त किंवा किती कमी असेल?
भांडवली खर्च जेवढा जास्त तेवढी जास्त आटापिटा झटपट वि‌क्रिसाठी करावा लागणार. गरीबाला ते नेहमी जमेलच असे नाही. शिवाय गरीबाला हातात काय द्यावे याचे उत्तर देतांना महाराष्ट्रातील 35 टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली आहे - म्हणजेच सुमारे साडेतीन कोटी जनता - त्या सर्वांना एकच उत्तर कसे चालेल? त्यांच्यासाठी शेकडो पर्यायांची आखणी करावी लागेल. विक्रीला देखील स्थळ, काळ व गटांसाठी विभिन्न पर्याय असतील.
चरखा टकळी या पर्यायात प्रारंभिक भांडवली खर्च आणि तांत्रिक कौशल्य कमी लागते आणि त्यातून मिळणारा पैसा पण कमी असेल, पण कित्येकांसाठी हाच पर्याय त्यांच्या आवाक्यातील असेल. म्हणूनच "हा नको दुसरा विचार करू या" अशा दृष्टीकोनाऐवजी "हे करू या आणि पुढचे पाऊल म्हणून अजूनही इतर आखणी करू या" अशी विचारसरणी जास्त योग्य असे मला वाटते.
------------------------------------------

Comments

Anonymous said…
अतिशय योग्य विचार करुन आपण एक फारच चांगली आणि उपयुक्त योजना मांडली आहे.आपले मनःपूर्वक अभिनंदन!
आणि ही योजना यशस्वी व्हावी यासाठी शुभेच्छा !
Prashant said…
लीनाजी,

माझ्याही मते हा अगदी योग्य दृष्टीकोन: "हे करू या आणि पुढचे पाऊल म्हणून अजूनही इतर आखणी करू या" अशी विचारसरणी जास्त योग्य असे मला वाटते.
अनेकदा लोक अधिक चांगला विचार पुढे न ठेवता, कुठल्याही गोष्टीला विरोध करत राहतात. अशा पूर्वग्रहाने ग्रासलेल्या विचारांपासून प्रत्येकाने काळजीपूर्वक दूर रहावे.


कापसाच्या चैतन्याचा अर्थ जरा चुकला असं मला वाटतं, उदाहरणार्थ सर्वसाधारणपणे निर्जिव समजला जाणारा लोह देखिल आपला स्वभाव / गुण बदलतो, जर त्यावर अग्नीचा योग्य प्रयोग केला. म्हणजे Heat treatment केल्याने जर लोखंडाचे गुणधर्म बदलले, तर त्याचा संबध चैतन्याशी नाही तर internal realignment वगैरे मुळे असतो. तसेच कापसाच्याही physical, chemical गुणधर्मावर हवेचा / वाळण्याचा परिणाम होण्याबद्दल अभ्यास करावा लागेल.



थोडी लेखनातली दुरुस्ती:

पाँकेट - पॉकेट
काही ठिकाणी र्‍य असा बरोबर तर काही ठिकाणी -य असा चुकीचा काढला आहे.
तसेच आणी जमल्यास आणि असा लिहावा (blog title मधे)

अशा प्रकारच्या अधिक माहितीसाठी पहा : http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=90016191&tid=5337676323429277727&start=1
sujay said…
varimadhe charaka chalavane mast idea ahe, mala vatat bhinna pradeshat rahanaryanna ekatra anun bhakti barobar shaktichi sthapana karanyasathi vari itaka dusara changala vyaspith nahi,varimadhe apan arogya shikshan, sarkarchya navya yojana, shetisambandhi mahitihi deu shaku. madam devdasi punarvasan kendrasarakhya samsthanche stall pan varimadhe lagu shakatat.pan charakyachi idea best!
Ashok Saraf said…
Akhand Charakha jar suru thewata aala tar baryach Pil padalelya vyaktina unwind hota yeil. Kalpana ashi ahe ki pratyek gawat ek tari charakha akhand 24 tas satat suru thewayacha . Mothya pudharyanni he compulsory kam mhanun tithe hajeri lavayachi . He shakya hoil ka ? Congress hyat pudhakar gheil ka ?
Unknown said…
I had instructed my DVIO Parbhani , who had discussion with Mr. Munde I think they r submitting proposal under PMEGP which will be get sanctioned in TFC. I will keep u appraised
Arun Shinde
Unknown said…
योजना चांगली आहे. वारीत चरखा चालवून भक्तांना कपडे 'प्रसाद' देणे याच्यासारखी चांगली गोष्ट असूच शकत नाही. तुम्हाला शुभेच्छा!!
Unknown said…
This comment has been removed by the author.

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

एक शहर मेले त्याची गोष्ट

उद्धव गीता भाग १ -- भांडारकर व्याख्यान दि. १२ जून २०१९