यक्ष प्रश्न
यक्ष प्रश्न -- लीना मेहंदळे ( सकाळ साठी शब्दांकन -- राधिका कुंटे) लहानपणी आपण जे वाचतो, ऐकतो नि पाहतो ते आपल्या स्मृतीमध्ये स्कॅन केल्यासारखं राहतं. त्यातील एखाद्या भावलेल्या गोष्टीसंबंधी विचार आपल्या नकळत चालू राहतात. माझे वडील संस्कृतचे प्राध्यापक होते. त्यांच्या पुस्तकाच्या संग्रहातून मी महाभारत काढून वाचलं होतं. `यक्षप्रश्ना`चा भाग खास करून त्यातील दोन प्रश्नांची उत्तरं माझ्या मनात ठाण मांडून बसली होती. याच विषयावरील एक पुस्तक हाती लागलं ते म्हणजे- आचार्य निशांतकेतूलिखित `सनातन यक्षप्रश्न` हे हिंदीतील पुस्तक. या पुस्तकात महाभारतातल्या गोष्टीचा संदर्भ आहे. द्यूतात राज्य हरून पांडव वनवासी होतात. एक दिवस त्यांच्याकडे एक ऋषि येतात. `यज्ञाच्या तयारीत एक हरीण वारंवार येऊन अडथळा आणतंय. त्या हरीणाचा बंदोबस्त करा,` अशी विनंती ऋषिवर्य करतात. हरीणाचा पाठलाग करता करता या पाच भावंडांना तहान लागते. पाण्याच्या शोधार्थ सहदेवास पाठवलं जातं. तो येत नाही, म्हणून पाठोपाठ नकुल, अर्जुन, भीमास पाठवलं जातं. अखेरीस युधिष्ठिरच त्यांचा शोध घेत घेत एका तळ्यापाशी पाणी प्यायला जातो. तिथं हे चारहीजण मृतप्राय अव...