my first blog आणि नवीन लेखन

Friday, November 19, 2010

मंत्री शोधतांना

मंत्री शोधतांना
14 नोव्हेंबर -- पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस व म्हणून जाहीर झालेला बालदिवस. त्या निमित्ताने दिल्लीत आले असतांना महाराष्ट्र सदन मधील घालमेल अनुभवली. कित्येक दिग्गज कांग्रेसी आमदार व माजी मंत्री इथे दाखल झालेले. सर्वांना नवीन मंत्रीमंडढांत स्थान हवे आहे म्हणून. वरकरणी मात्र पंडित नेहरूंना जन्मदिवसाची श्रद्घांजली वाहणे व ती श्रद्घांजली सोनिया -- राहुल -- पृथ्वीराज यांच्यापर्यंत पोचवण्याची व्यवस्था करणे हा या दिल्लीवारीचा उद्देश.
हा लेख वाचकांपर्यन्त पोचेल तोवर बहुतेक नवे कांग्रेसी मंत्री निवडले जाऊन शपथविधी पार पडून त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव इत्यादि शुभारंभाच्या कामांना सुरूवात झालेली असेल. तरीपण या निमित्ताने राजकारणातली जी विसंगति आणि त्यातून आलेली पोकळी पहायला मिळते ती टिपल्याशिवाय रहावत नाही. आदर्श घोटाळा झाला आणि अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. याच कारणाने वीस वर्षापूर्वी अंतुले गेले होते -- शिवाजीराव निलंगेकर पाटील गेले होते -- विलासराव देशमुख गेले (आदर्श पुत्रप्रेमामुळे) शिवराज पाटील गेले (आदर्श अकार्यक्षमतेमुळे) आणि आता अशोक चव्हाण पण गेले. शेवटी एका व्यंगकाराला म्हणावे लागले “कां हो दिल्लीश्र्वरांनो इतका दुस्वास महाराष्ट्राचा.? आमच्या मंत्र्यांना तुम्ही सुखाने भ्रष्टाचार पण करू देत नाही !” असो
तर चव्हाणांना जायला सांगतांना पुन्हा एकवार कांग्रेस हायकमांडने नैतिकतेला पार्याय नाही, भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, स्वच्छ मुख्यमंत्री निवडू असे सांगत सांगत स्वच्छ मुख्यमंत्रीपदाची माळ पृथ्वीराज चव्हाण यांच्या गळ्यांत घातली. त्यांच्या नांवाला तीन वलये होती. -- जुन्था काळातील प्रेमलाताई या खासदारांचे ते सुपुत्र ही पूर्वपुण्याई, केंद्र शासनात पंतप्रधानांची खाती सांभाळणारे अभ्यासू राज्यमंत्री म्हणून ख्याती आणि स्वच्छ कारभराचे वलय. त्यांची निवड करण्यांत हायकमांडला फारसे श्रम पडले नाहीस. या आधीव्या दोन राउंड मघे त्यांचा विचार झाला नव्हता कारण त्यांना महाराष्ट्राचा फारसा अनुभव नाही -- इथला कोणताही राजकीय गट “त्यांचा” नाही. पण स्वमुमं (स्वच्छमुख्यमंत्री) निवडतांना हाच अलिप्तपणा त्यांचा “गुण” ठरला. शिवाय हायकमांडचे काम सोपे ठरण्याचे दुसरे कारण म्हणजे त्यांना एकच स्वमुभं निवडायचा होता.

खरे कठिण व खडतर काम करायचे आहे ते पृथ्वीराज यांना. ते जाहीर करून बसले की आपल्या टीम मधे ते फक्त स्वमं (स्वच्छ मंत्री) घेतील. त्यामुळे आता आपण स्वआ (स्वच्छ आमदार) आहोत हे दाखवणे सर्व आमदारांना क्रमप्राप्त झाले. त्याची सुरूवातही त्यांनी केली -- आधी ट्रॅडिशनल पद्घतीने -- स्वमुमं यांच्या अभिनंदनाची होर्डिग्ज लावून. पण यामुळे “स्व” असण्याला अडचण येते असं मुख्यमंत्र्यानी बजावताच सर्वानी होर्डिग्ज कादून आपण “स्व” असल्याचा निर्वाळा दिला. असे सर्वानीच केले -- आता आली का पुन्हा पंचाईत ? सर्वच आमदार जर “स्व” असतील तर स्वमं म्हणून कुणाला निवडणार आणि कुणाला वगळणार ?

पण माइया मते खरी पंचाईत ही पण नाहीच आहे. ती याहून मोठी आहे. तो प्रश्न असा आहे “आपल्याला (म्हणजे पृथ्वीराजना) स्वमं परवडतील कां ? ”

स्वातंच्यानंतरच्या सुरवातीच्या काळांत आलेल्या मंत्रीमडळंत बरीच मंडळी स्वच्छ होती. पंडित नेहरूंसारखा पंतप्रधान अशा स्वच्छ मंडळीचा अभिमान बाळगू शकत असे. हळूहळू ही मंडळी स्वच्छ राहीनाशी झाली -- जर कोणी राहिले असेल तर ते धुक्थाप्रमाणे विरत गेलेले लोकांनी पाहिले आहेत. शेवटी लोकांनी स्वच्छ मंत्री मिळण्याची आशा सोडून दिली. पण लोकांच्या डोळयासमोर ते स्वप्न मात्र तरळतच राहिले. त्याच स्वप्नाखातर हायकमांडला आदर्श मुख्यमंत्री हटवून स्वमुमं आणणे भाग पडले. दिल्लीत बसलेल्चा हायकमांडला हे कळते की असा एखादा स्वमुमं असल्यास लोक त्याला डोक्यावर घेतील. पण त्यामुळे सध्यातरी दिल्लीश्वरांना कोणताच धोका नाही. त्यामुळे ते स्वमुमं देऊ शकतात इत्केच नव्हे तर त्याची जाहिरातही करु शकतात !
पण स्वमुमंचे कांय ? त्यांनी टीम मधे स्वमं निवडले नाही, तर लोक त्यांना तत्काळ डोक्यावरून खाली उतरवतील. अगदी त्यांनी आटापिटा करून सांगितले की ही निवड त्यांची नसून हायकमांडची आहे, तरी लोक जे कांही करायच ते त्यांनाच करतील. म्हणून निवडतांना स्वमं हवेतच. पण, पण, पण . . . . . . …!
स्वमं म्हटला की लोक लग्गेच त्याच्या कडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहू लागतील एकापेक्षा जास्त स्वमं निघाले तर लोक आधिकच आनंदतील -- म्हणतील “चला, भावी काळांत निवड करायला एवढा चॉईस आहे बरे ! ” थोडक्थांत कांय तर येणारा प्रत्येक स्वमं हा स्वमुमं साठी प्रतिस्पर्धी असणार आहे. म्हणजे हातात धरलेला पेटता निखाराच की !
आपली टीम निवडतांना किंवा हायकमांड कडून मान्य करुन घेतांना मुख्यमंत्र्यांची हीच तर पंचाईत आहे -- अस्वच्छ किंवा कमी स्वच्छ मंत्री असेल तर आजचे संकट आहे की लोक त्याला पाहून नाकं मुरडतील आणि स्वमुमंच्या स्वच्छ कारभाराबद्दल प्रथमग्रासे शंका निर्माण करतील. स्वच्छ मंत्री निवडला तर उद्याचे संकट आहेच. कारण लोक म्हणतील “ठीक आहे, आजचा स्वमुमं गेला तर आमची हरकत नाही, उद्यासाठी तो आहे.” मग असा प्रतिस्पर्धी आजच खुर्ची ओढून घ्यायचा प्रयत्न करील.
आपल्या लोकशाहीची (मंत्रीमंडळाची) ही विसंगति आहे. लोकांसमोर चांगले काम दाखवायचे तर
टीमवर्कने पुढे यायला हवे. पण टीमचा प्रत्येक चांगला खेळाडू तुम्हांला
झाकोळून टाकू शकतो म्हणून तुम्ही सदैव प्रार्थना करणार -- “देवा या सर्वांचा खेळ
वाईटच राहू दे - आणि तरीही देवा, आमच्या टीमचा खेळ चांगला राहू दे !
बिच्चारा देव ! स्वमुमं बरोबर त्याचीही पंचाईतच आहे.
(लीना मेहेंदळे)
दिनांक : 14.11.2010

1 Comments:

  • लीनाजी , लेख उत्तम लिहला आपण ....धन्यवाद. प्रत्यक स्वमुमं अशीच टीम निवडतो कि ज्यामुळे त्यांची खुर्ची शाबूत राहील. काहीं वेळा त्यांना पण डोईजड होणारे मंत्री घ्यावेच लागते कारण ते हाय कमाडच्या मर्जीतले असतात . जर सर्वच कार्यक्षम मंत्री झाले तर मोठी पंचाईत होईल कारण कोणीच भ्रष्टाचार करणार नाही आणि नुसते लोक उपयोगी कामे करून दाखविले तर मग निवडणुकीसाठी पैसा कोठून आणणार ? आपली राजकीय परिस्थितीच अशी आहे. जो पर्यंत मतदार चांगल्या कारभारा साठी मतदान करणार नाहीत तो पर्यंत अशीच स्वमुमं टीम येत राहणार भ्रष्टाचार होताच राहणार. बिहारच्या मतदारां कडून आपण शिकले पाहिजे. ह्या भ्रष्टाचार विषयावर माझा लघु लेख वाचावा ही विनंती .
    hptt://mnbasarkar.blogspot.com

    By Blogger mnb, at 7:42 PM  

Post a Comment

<< Home