my first blog आणि नवीन लेखन

Thursday, May 29, 2008

सर्व ओझी निवारणासाठी - क्रिकेट

सर्व ओझी निवारणासाठी - क्रिकेट

- लीना मेहेंदळे

वाचकहो, सर्वत्र असते तसेच याही लेखातील सर्व घटना, स्थानांची व व्यक्तींची नांवे संपूर्णपणे काल्पनिक असून त्यात कोणताही तथ्यांश नाही. जर कोणत्याही व्यक्ती किंवा स्थानाचे नांव किंवा घटनेचा तपशील एखाद्या सत्य घटनेबरोबर मिळता-जुळता असेल तर तो निव्वळ योगायोग मानावा.
तर रसिक वाचकहो, आटपाट नगर होते- तिचे नांव मुंबई. तिथे एक मोठी वास्तू होती - जिचे नांव माहीत नाही. परंतु तिथे नित्यनेमाने नाट्यस्पर्धा होत असत. त्या यशस्वी होण्यासाठी एक मुख्य सूत्रधार व त्यांचेबरोबर इतर छप्पन सूत्रधार होते.
नाट्यस्पर्धा पहाण्यासाठी लोकांची झुंबड उडत असे. वास्तूच्या दारावर हीss गर्दी असायची. परत जाणारी मंडळी फारशी खूष असावीत असे मला वाटत नाही. कारण बहुतेक प्रेक्षक नाक मुरडीत, नावे ठेवीत जात- इथे येणार्‍याच्या पदरांत कांहीच पडत नाही. हे कसले नाटक - या कसल्या स्पर्धा ? कोण, कोणाशी काय संवाद बोलतो तेच कळत नाही. पडदे कधीही कुठल्याही प्रसंगी पडतात. शिवाय प्रत्येक पात्राच्या शिरावर एक ओझ असते. त्यामुळे त्यांचे चेहरे सदा ओढग्रस्त दिसतात. एक पात्र विंगेत जाऊन परत आले की त्याच्याकडील ओझ हमखास वाढलेलंच दिसत. काय असेल बुवा त्या विंगेत ?
शिवाय एखाद्या पात्रावर पडदा पडला की पुन: दर्शन केव्हा त्याचा पत्ताच नाही. प्रसंग तोच पण पात्र बदललेले - त्याच्या ओझ्याचा रंग बदललेला. आता एखाद्या दर्शकाला उत्सुकता लागली की जुन्या ओझ्याच काय झाल तर त्याने कांय करावे ? अशा वेळी सूत्रधारांकडून हळूच सूचना येई - त्या दर्शकाने ओझ्यासाठी एखादा रुमाल आणून द्यावा -की बांधून टाकू नवीन ओझ. ती हरवलेली पात्र आणि हरवलेली ओझी कुठे गेली याचा कधीच उलगडा होत नसे.

- 2 -
अशाप्रकारे नाट्यस्पर्धा दीर्घकाळ चालल्या व पुढेही दीर्घकाळ चालणारच आहेत. पण त्यातील काही स्थित्यंतरे प्रबोधनकारक तसेच मनोरंजकही आहेत.
नाट्यस्पर्धांना सुरुवात झाली तेव्हांपासूनच सूत्रधार हे चर्चेचे, उत्सुकतेचे व थोड्या कौतुकाचे विषय झालेले होते. कुणी म्हणत ते किती हुशार ! देशातील क्रीम निवडून आणलेले आहे हो ! कुणी म्हणत -हो, पण येऊन जाऊन नाटकांचे सूत्रधारच ना ! कधी नांदी म्हणतील तर कधी भरतवाक्य ! यापरती लाइमलाइटची परवानगी तर त्यांना नाही ना ! आम्ही बघा - राजे आहोत राजे. आम्हीच त्यांना नाटके करायला सांगतो. एकीकडे आमचे मनोरंजन व दुसरीकडे प्रेक्षकांना लावलेल्या तिकिटांचे उत्पन्न ! शिवाय यशस्वी नाटकांचे श्रेय राजांना व अयशस्वी नाटकांचे खापर सूत्रधारांवर - असे आमचे वर्क डिस्ट्रिब्युशन देखील ठरलेले आहे. नाट्यस्पर्धांना प्रचंड गर्दी होते आहे. छान, छान ! लोकही खूष, आम्हीही खूष - आणि सूत्रधार तर काय खूषच असणार !
पण सूत्रधार फारसे खूष राहिनासे झाले. त्यांच्या सूत्रांना गाठी पडत होत्या - रंग विटत चालले होते. आता प्रेक्षकांना नसेल माहीत - पण या सूत्राच्या सहाय्यानेच पात्रांच्या डोक्यावरील ओझ्याचे नियमन होत असे. ओझे मागे पुढे ओढणे, त्यांत भर घालणे, झालेच तर हरवलेली ओझी शोधून काढणे - ही कामे देखील त्यांच्याकडेच होती. त्यामुळे मार्मिक संवाद- लेखन, प्रॉम्प्टींग, अभिनय बसवून घेणे, रंगमंचावरील प्रकाश संयोजन - या कुठल्याच बाबींकडे लक्ष देणे जमेना झाले. शेवटी ओझी खूप खूप वाढली. त्यांमध्ये पात्रांचे संवाद, हावभाव लपून जाऊ लागले. एकेका सूत्रधाराला त्याची सर्व सूत्रे सांभाळणेच अवजड होऊ लागले. राजे लोक देखील वैतागले. प्रेक्षकांचे नाक मुरडणे तर वाढतच होते.
मग सर्व सूत्रधारांनी मिळून नारदमुनींना पाचारण केले. नारदांचा सर्वत्र संचार होताच - प्रेक्षकांमध्येही होता. त्यांनी कधीतरी खाजगीत बोलून पण दाखवले - हा ओझ्यांचा प्रकार म्हणजे मंत्रालयातील फाईलीच झाल्यात जणू. पण सूत्रधारांच्या बैठकीत त्यांनी आधी आपले मत नाही मांडले. त्यांनी आधी सर्वांना आपले आपले स्वॉट ऍनॅलिसिस करायला सांगितले.

- 3 -
स्वॉट ऍनॅलिसिस ? कशाकरता ? आमच्याकडे स्वॉट पैकी फक्त स्ट्रेंग्थच आहे. नो वीकनेस, नो थ्रेट. ऑल स्ट्रेंग्थ - सर्वांचे व्हेरी गुड ते आऊट स्टॅडींग परफॉर्मन्सेस आहेत. हां, आता दूर त्या दिल्ली शहरात सर्वांचेच आऊटस्टॅडींग परफॉर्मन्स असतात असे ऐकतो -पण आम्हाला त्याची गरज नाही. कारण सर्व आऊटस्टॅडींग परफॉरमन्सचे सूत्रधार असूनही तिथली नाटकं आमच्यापेक्षा जास्त फ्लॉप होतात. अहो मुनीवर, असले रुढीवादी उपाय सांगत बसण्यापेक्षा कांही नवीन सांगा की ! मग नारदानी सर्वांना लॅटरल थिंकिंगवर एक लेक्चर दिले!
तुमचे बलस्थान आहे म्हणता ना ! मग सूत्रांद्बारे ओझी हलवतांना तुमची दमछाक कां होते ? कारण तुम्ही नव्या युगाची चाहूल ओळखलेली नाही. पहा - पहा त्या क्षितिजाकडे - मन प्राण ओतून पहा - तिथे तुम्हाला दिसून येईल नवीन युगात प्रेक्षकांना काय हवे ते ! असे म्हणत नारदाने सर्वांना दूर क्षितिजापारचे कसे ओळखावे ते शिकवले.
मात्र एक झाले. क्षितिजपारचे सर्वांना ओळखता आले नाही. त्यांनी लॅटरल थिंकिंगच्या धड्यांवर समाधान मानले व आपले काम चालू ठेवले. पण ज्यांनी ते ओळखले त्यांना कळले की आपले बलस्थान नेमके कुठे असते. अरे गड्या, ते असते क्रिकेटमध्ये. हीच ती नव्या युगाची चाहूल. सूत्रधारांच्या टी क्लब व सूत्रधार असोसिएशनमध्ये क्रिकेटची चर्चा होऊ लागली - नवे बॉल्स, ग्लोव्हस्‌, विकेटस्‌, खेळाचे मैदान इत्यादी साधन सामुग्री गोळा झाली. क्रिकेटची स्ट्रेंग्थ वाढविण्यासाठी इतर संस्थांना विनंती करण्यात आली - तुमची टीम व्हर्सेस आमची टीम अशी प्रॅक्टीस मॅच खेळू या ! इतर कित्येक संस्थांनी सूत्रधार क्रिकेट टीमला सरावासाठी मदत करुन जास्तीत जास्त चांगले खेळण्याची संधी दिली. महत्त्वाचे सूत्रधार त्यांना व खेळाडूंना शाबासकी देऊ लागले.
क्रिकेट खेळल्याने काय झाले ? खेळाडूंचा दृष्टिकोन बदलला - त्यांना पात्रांच्या डोक्यावरील ओझी दिसेनाशी झाली - त्यामुळे सूत्रे हलवत रहाण्याची जबाबदारी संपली. प्रेक्षकांचे नाक मुरडणेही दिसेनासे झाले. त्यामुळे संवाद लेखन, प्रकाश नियोजन, नांदी म्हणणे इत्यादी जबाबदार्‍या देखील संपल्या. क्रिकेटमधील संधी व स्ट्रेंग्थ वाढवण्याला वाव मिळाला. नवीन दृष्टि तर एवढी मिळाली की नारदालाही न सुचलेले त्यांना लक्षांत आले - क्रिकेटमधून सर्व स्त्री सूत्रधारांना खड्यासारखे बाजूला
- 4 -
ठेवणे शक्य होते. बर झाल- फारच नाकाने कांदे सोलायच्या सर्वजणी. बसा म्हणाव ओझ्यांची सूत्रे ओढत. तरी पण त्यांनी इतर खेळाडू संस्थांचा सल्ला घेतला. सर्वांनी तेच सांगितले - क्रिकेट खेळतोय्‌ ना आपण ! मग स्त्री सूत्रधारांना कुठे क्रिकेट खेळता येणार आहे ?
तर रसिक वाचकहो, ही झाली एका स्थित्यंतराची कथा - थोडी जुनी झाली असेल कदाचित आणि कदाचित इतरही कांही स्थित्यंतरांची कुणकुण तुम्हाला लागली असेल. पण सध्या ही साठा उत्तरांचे फळ देणारी कथा इथेच संपवावी म्हणते. कारण लक्षांत आले ना ? अहो, नारदाची दूरदृष्टी नाही लक्षांत आली ? बघा, बघा क्रिकेटला कसे सोन्याचे दिवस आले आहेत. कित्येक क्रिकेटपटू सूत्रधारांचे सुहास्यवदन पाहण्याचा आनंद काही औरच ! तेव्हा तुम्ही नाटके पहा - आम्ही सध्या पुरते त्यांना पहातो. पुढील भेट दुसर्‍या स्थित्यंतराची कथा सांगताना! -------------

लोकसत्ता दि.
वेब 16 वर ठेवले dvbttsurekh, mangal, pdf
geocities.yahoo.com/chakori_baheril_prashasan_16/chintaman_moraya/sarv_ojhyasathi_Cricket.pdf

Labels: ,

0 Comments:

Post a Comment

<< Home