इनस्क्रिप्ट मराठी धपाधप लेखन हेतू this article n site

मराठी लेखनाच्या ब्लॉगसाठी - इनस्क्रिप्ट
[[ खालील लेखाइतकेच हे 2 व्हिडियो पण सवडीने पाहिल्यास उपयोगी आहेत.
Inscript-part- 1-- मराठी हिन्दी धपाधप लेखन हेतू
Inscript-part- 2-- मराठी हिन्दी धपाधप लेखन हेतू
तसेच ही लिंक देखील पहावी. Link - लीना मेहेंदळे, भा.प्र.से. ]]


सुमारे नव्वद ते नव्व्याण्णव टक्के मराठी किंवा कोणत्याच भारतीय भाषेतील लेखकांना हे माहीत नाही कि एका युक्ती मुळे मराठी व तत्सम भारतीय भाषांचे टायपिंग शिकायला फक्त अर्धा तास पुरतो. आणि आता ऑफिसेस मध्ये सर्वत्र संगणकांचा बोलबाला झाल्यावर खूप अधिका-यांनी गरजपुरते एका बोटाने करण्याइतपत इंग्रजी टायपिंग शिकून घेतले आहे. पण त्यांना देखील हे माहीत नाही की त्याच संगणकामध्ये अर्ध्या तासांत मराठी टायपिंग शिकण्याची युक्ती देखील आहे. या युक्तीचे नांव इनस्क्रिप्ट की बोर्ड ले आऊट.
शासकीय कार्यालयांत तर हा अनुभव पदोपदी येतो. बारा पंधरा वर्षांपूर्वी कधीतरी शासनाने क्लार्क व टायपिस्ट असे दोन पदांमधले अंतर काढून टाकले. सर्वांचे नामकरण क्लार्क कम टायपिस्ट असे केले. ज्यांना टायपिंग येत नसेल ते शिकून घ्यावे असा फतवा काढला. झालेच तर जे शिकून घेतील - त्यांना कांही तरी प्रोत्साहनपर इन्क्रीमेंट वगैरेची योजना आखली. आणि फतवा काढल्यामुळे जसे सर्वच योजनांमधे आबादीआबाद होते अस गृहीत धरलेल असत तस इथेही झालेल असणारच अशी स्वत:ची गोड समजूत करुन सर्व अधिकारी स्वस्थ बसले.
त्यामुळे प्रत्यक्ष समस्या कांय त्याबद्दल अनभिज्ञता आणि त्याला एक अगदी सोपे उत्तर आहे - पण त्यासाठी पुन: एक छोटा फतवा काढायची गरज आहे या बाबतही शासकीय अधिका-यांचे अज्ञान नडत आहे. याचा उल्लेख अशासाठी केला की मराठी लेखक किंवा सामान्य माणसाकडून जे पहिले पाऊल उचलले जात नाही ते निदान सरकारतर्फे (सरकार पुरते) जरी उचलले गेले असते, तरी ते लेखकांपर्यंत पोचू शकले असते. शिवाय सरकारमधल्या कित्येक टायपिस्ट व अधिका-यांची सोय झाली असती. पण ज्या मराठी भाषा संचालनालयातर्फे मराठी टायपिंगच्या परीक्षेची सर्टिफिकेट्स दिली जातात त्यांनाही या युक्तीचे अज्ञान असल्याने त्यांनी अजूनही पुराणकालीन दीर्घमुदतीची पध्दतच या प्रशिक्षण व परीक्षेसाठी चालू ठेवलेली आहे.

असो, या प्रश्नाच्या इतर मुद्दांआधी थेट त्या युक्तींकडेच वळू या. इनस्क्रिप्ट की बोर्ड ले आऊट मधे बहुतेक सर्व स्वर डाव्या बोटांनी व बहुतेक सर्व व्यंजने उजव्या बोटांनी लिहितात त्यामुळे टायपिंग मधे आपोआप एक लय निर्माण होऊन टायपिंग शिकणे व करणे खूप सोपे जाते. संगणकाच्या की बोर्ड वरील K या अक्षराने क, ख, आणि त्याच्याच शेजारी वरच्या ओळीतील I या अक्षराच्या वापराने ग, घ, लिहिता येते. याच प्रमाणे K शेजारच्या L या अक्षर खटक्याने त, थ आणि वरच्या O या खटक्याने द, ध लिहिता येते. L शेजारचे दोन खटके च, छ, ज, झ साठी तर त्या पुढचे दोन ट, ठ, ड, ढ साठी आहेत. K च्या डावी कडील H, Y या खटक्यांनी प, फ, ब, भ लिहिता येते. म्हणजे मराठी वर्णमालेची ही 20 अक्षरे शिकायला फारसा वेळ लागत नाही - पाच मिनिटे पुरतात - याला कारण आपण शाळेतील इयत्ता पहिली मधे घोकलेली क ते ज्ञ ही वर्णमाला आणि या वर्णमालेच्या आधाराने तयार केलेली इनस्क्रिप्ट नांवाची की बोर्ड पध्दत. या पैकी प्रत्येक कठिण अक्षरासाठी (ख, घ, छ, झ, थ, ध ...) अक्षरासोबत शिफ्ट हा खटका पण दाबावा लागतो.
तशीच आपण बाराखडीही घोकलेली असते. त्यापैकी अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ ही दहा अक्षरे आणि त्या अक्षरांनी लावायच्या 9 काना मात्रा (अ सोडून) अशा वीस गोष्टींसाठी डाव्या हाताने डावीकडील मधल्या व वरच्या ओळीतील पाच-पाच खटके (कीज) वापरतात. त्यांचा क्रम थोडा उलट - सुलट आहे - ओऔ, एऐ, अआ, इई, उऊ असा तो क्रम सोईसाठी लावला आहे.
अशा युक्तीने काकू लिहिण्यासाठी क (K) + काना (E) + क (K) + ऊकार (T) अशी युक्ती आहे. तसेच चूक लिहिण्यासाठी च (:) + ऊकार (T) + क (K) लिहावे लागते. अकारान्त अक्षरासाठी अकाराचा खटका (D) मुद्दाम वापरावा लागत नाही. ‘ताक’ या शब्दासाठी त (L) + काना (E) + क(K) आणि ‘किती’ हा शब्द लिहिण्यासाठी क (K) + इकार (F) + त (L) + ईकार (R) असे लिहायचे असते. हे इतकं सोप्प आहे की तीन चार वेळा करून याचा सोपेपणा कळला की आपल्याला एक वेगळाच आनंद होतो.
माझ्या घरातील पाचवी सहावी शिकलेली कामवाली मंडळी किंवा त्यांच्या पाचवी - सहावीत जाणा-या मुलामुलींना देखील मी ही युक्ति शिकवून पहिल्याच दिवशी त्यांच्याकडून या वीसही अक्षरांच्या बाराखडयांची प्रॅक्टिस करून घेते. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण होतो. संगणक शिकण्यासाठी इंग्रजी येत नसल्याने त्यांचे अडून रहात नाही.

उरलेल्या 16 अक्षरांपैकी क्ष, ज्ञ, त्र, श्र आणि ऋ ही अक्षरे आकड्यांसोबत ऍडजस्ट केली आहेत तर म, ण, न, व, ल, स, श, ष, य ही अक्षरे खालच्या ओळीत (कांही शिफ्ट की सोबत तर कांही शिफ्ट की शिवाय) आहेत. र, ह, ड., ञ इतरत्र आहेत. यांच्या जागा डोक्यांत बसण्यासाठी थोडीशी प्रॅक्टीस लागते. पण त्यांना काना - मात्रा लावण्याची पध्दत आधी सांगितल्याप्रमाणेच आहे.
अकार असलेल्या अक्षरासाठी अ चा खटका (D) मुद्दाम वापरावा लागत नाही. त्याऐवजी अकार काढून टाकण्यासाठी त्याचा वापर करतात. म्हणजे दत्त या शब्दासाठी
दत्त = द (O) + त (L) + अकार काढल्याची खूण (D) + त (L).
यातील D च्या खटक्यामुळे त चा पाय मोडला जाऊन जोडाक्षराची तयारी होते. अशा प्रकारे तुमच्या घरी असलेल्या संगणकावर मराठी शिकण्याची ही सोप्पी पध्दत आहे.
एका माहिती पत्रावरून असे दिसून येते की सर्व भारतीय भाषा मिळून इंटरनेटवर टाकलेल्या पानांची संख्या 1 कोटीच्याही खाली आहे - त्याचवेळी इंग्रजी भाषेत इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या पानांची संख्या पद्म, महापद्म (इंग्लिश भाषेत सांगायचे तर ट्रिलियन्स ऑफ पेजेस) एवढी आहे.
तेंव्हा भारतीय लेखकांना थोड्याशा प्रयत्नाने मराठी लिपिचे टायपिंग शिकून अन्तर्जालावर (का याला इन्द्रजाल म्हणू या कारण हे ही किती मायावी !) धडाधड मराठी वाड.्‌मय उपलब्ध करून देण्याने आपल्या साहित्य संस्कृतीचे चांगले जतन होऊ शकेल.
आता कोणत्याही युक्ती किंवा जादूच्या मागे कांही तरी पण - परन्तु असतातच आणी कोणत्याही जादूगाराला त्यांचे भान ठेवावेच लागते. या सोप्या की बोर्ड वापरासाठीही लेखकांनी दोन - चार मुद्दे ध्यानांत ठेवले पाहिजेत.
तुमच्याकडील संगणक पेन्टियम जातीचा (586 या चिपचा) असून त्यावर विन्डोज XP ही ऑपरेटिंग सिस्टिम असली पाहिजे. 2000 साला नंतर ज्यांनी संगणक घेतले ते बहुतेक या त-हेचे आहेत. संगणक सुरू करून स्टार्ट - सेटिंग - कण्ट्रोल पॅनेल मधे जाऊन लँग्वेज सेटिंग च्या आयकॉन वर डबल क्लिक केल्याने एक नवीन प्रश्नावली तुमच्या समोर येते. तिथे लँग्वेज च्या प्रश्नावर मला हिन्दी किंवा मराठीचे म्हणजे देवनगरीचे ऑप्शन हवे आहे असे सेटिंग सुरूवातीला एकदा कधीतरी करून घ्यावे लागते.

ते करून झाले की संगणकाच्या खालच्या पट्टीत जो मेनूबार येतो तिथे E (म्हणजे इंग्लिश) हे अक्षर दिसते. त्यावर क्लिक करून आपल्याला टायपिंग साठी मराठी किंवा इंग्रजी हे ऑप्शन निवडता येते. यासाठी विन्डोज मधील वर्ड हा प्रोगाम उघडल्या नंतर मेनू बार वर हिंदी हे ऑप्शन द्यायचे आणि टायपिंग ला सुरूवात करायची.
गुगल वरील - म्हणजे जी मेल वरील मेल आपण याच पध्दतीने मराठीत अगदी सोप्पेपणाने करू शकतो. तसेच गूगल च्या मार्फत ब्लॉग करायचे असतील, म्हणजे www.blogspot.com ही साइट वापरून तर वरील टायपिंगच्या पध्दतीने आपले पुस्तक थेट संगणकावरच लिहिले जाऊ शकते. या ब्लॉग मधे मराठी अक्षरांतून लिहिलेले सर्व विषय गूगल सर्च मधेही मराठीतून विषय दिल्यास त्याच्यावर सापडतात.
सुरूवातीला सांगितलेली पध्दत वापरून मेनू बार वर हिंदीचे ऑप्शन मिळवणे हे पुष्कळांना कटकटीेचे वाटेल पण ते फारसे कठिण नाही. मायक्रोसॉफ्ट कंपनीला ही सोय बाय डिफाल्ट देता आली असती आणि लेखकांना ही खटपट देखील करावी लागली नसती. आपल्या देशांत मायक्रोसॉफ्ट कंपनी अक्षरश: लाखो संगणक विकते. तरीपण आपले सरकार तुम्हीं बाय डिफाल्ट हे ऑप्शन उघडे ठेवा असे ठणकावून का नाही सांगत? कारण आपल्या गृहखात्यातील राजभाषा व आय्‌टी या दोन्हीं विभागांच्या अधिका-यांची भारतीय भाषांबद्दल असलेली तीव्र उदासीनता. हे ऑप्शन उघडे ठेवा असे सांगणे तर फारच क्षुल्लक. पण आपल्या भारतीय भाषांबाबत संगणकावर जे अनंत गोंधळ चालतात त्यापैकी कोणताही गोंधळ ठणकावून सुधारण्याची इच्छाशक्ती शासकीय अधिका-यांकडे दिसून येत नाही.
त्यामुळेच, म्हणजे आपल्या अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे शिरजोर होऊन मायक्रोसॉफ्टने एक चलाखी अजून केलेली आहे. विन्डोज XP वापरणा-या प्रत्येक संगणकात एक किंवा दोनच भारतीय भाषा ते बसवतात. त्यामुळे एखाद्या संगणकांत हिंदी (मराठी) नसेल आणी बंगालीच असेल किंवा मल्याळीच असेल असेही होऊ शकते. अशा वेळी आपल्या विक्रेत्याकडे आग्रह धरून मराठी ऑप्शन मिळवून घ्यावे.
खरे तर ही सिस्टिम भारत सरकारच्या सी-डॅक या संस्थेने सुमारे 20 वर्षांपूर्वी तयार केली. परंतु तीची किंमत ठेवली रू.15,000/- च्या पुढे. त्यामुळे सोपी असूनही ती कोणालाच वापरता आली नाही. यावरून आपल्या सरकारांचे राष्ट्रभाषा किंवा राज्यभाषेवरील प्रेम (?) समजून येते.

विन्डोज विकणा-या मायक्रोसॉफ्टने देखील याचे फॉन्टस उपलब्ध करून देतांना खूप तांत्रिक अडचणी निर्माण करून ठेवल्या होत्या. शेवटी लीनक्स या ओपन सिस्टिम वाल्यांनी या पध्दतीची महती ओळखून स्वत:च Unicode वर ही पध्दत वापरून ते सर्व फॉन्टस लीनक्स व गुगल वर उपलब्ध करून दिले तेंव्हा आपली भारतीय बाजारपेठ टिकवण्यासाठी मायक्रोसॉफ्टने त्यातील कांही सुविधा देऊन टाकल्या. मायक्रोसॉफ्ट ही कंपनी प्रत्येक काम मार्केट, प्रॉफिट, विक्री या तत्त्वावर करते. या उलट लीनक्स चे तत्त्व आहे की प्रत्येकाने आपण निर्माण केलेली नवीन सोय त्यांच्या प्लॅटफॉर्म वरून जगाला मोफत उपलब्ध करून द्यावी. याचसाठी त्यांची सिस्टिम झपाट्याने वाढत आहे व त्यांचे तत्त्वज्ञान मान्य असणारे त्यांत भर टाकीत आहेत.
इनस्क्रिप्ट हा एकच लेआऊट (म्हणजे कीज वापरण्याची पध्दत) सर्व भारतीय भाषांना चालतो कारण तो संस्कृतजन्य वर्णमालेवर आधारीत आहे. त्यामुळे या एकाच लेआऊट वर सर्व भारतीय लिपिंचे ऑप्शन उपलब्ध होण्यास कांहीही अडचण नाही. विन्डोजची ऑपरेटिंग सिस्टिम न वापरता हल्ली कांही जण लिनक्स ही ओपन सिस्टिम वापरतात. त्यांच्याकडे ही सर्व सुविधा बाय डिफॉल्ट उपलब्ध आहे. त्यांच्याकडेही की बोर्ड वर मराठी टायपिंग याच पध्दतीने होते, शिवाय मोजक्या लिपींची कटकट उद्भवत नाही. भारतात एकूण नऊ लिपी वापरल्या जातात पण सर्वांची वर्णमाला सारखीच आहे व त्या सर्व लीनक्स वर उपलब्ध आहेत.

अशा प्रकारे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिम वापरणे, विन्डोज XP वर हिंदी ऑप्शन टाकून घेणे या खेरीज तिसरा उपाय आहे जो जुन्या संगणकांना देखील चालू शकतो, तो म्हणजे आपल्या संगणकावर - इझम किंवा लीप ऑफिस हे सॉफ्टवेअर बसवून त्यांच्या मार्फत वरील इनस्क्रिप्ट की बोर्ड ले - आऊट वापरणे. सदरहू इझम व लीप ऑफिस ही दोन्ही सॉफ्टवेअर सीडॅक या संस्थेने सुमारे 15 वर्षापूर्वी बाजारांत आणली असून इतकी वर्षे लोकांना सहजासहजी व अत्यल्प किंमतीत उपलब्ध झाला नाही व अजूनही होत नाही या बद्दल सर्व लेखकांनी एकत्रित आवाज उठवला तर कांही होऊ शकेल असे वाटते.
भारतीय भाषांमधील संगणक वापरातील इतर गोंधळांबाबतही आवाज उठवण्याची गरज आहे. मात्र लीनक्सच्या धडाक्यामुळे इनस्क्रिप्ट लेआऊट आता या वेगळ्या पध्दतीने उपलब्ध झाला आहे. तसेच लीनक्स आणि गूगल ने पुढाकार घेतल्यामुळे भारतीय लेखकांना वरील प्रमाणे सोप्या पध्दतीने भारतीय भाषा लेखन शक्य होत आहे. त्यामुळे आता मराठी मधे धपाधप ब्लॉग तयार करून अंतर्जालावर मराठी पानांची संस्था वाढवण्यासाठी सर्व मराठी लेखकांनी मोहीम उघडणे शक्य आहे.
----------------------------------------------------
वेब 16 वर ठेवले आहे.

Comments

आपका आलेख बहुत ही उपयोगी है। इन्स्क्रिप्ट कीबोर्ड लेआऊट की सबसे बड़ी विशेषता है कि यह भारत की 10 भाषाओं के लिए एक समान, एक ही लेआऊट प्रदान करता है, जिसके कारण एक भाषा में टंकण करने का जिसे अभ्यास हो वह किसी दूसरी भाषा के पाठ को सुनकर भी उसमें उसी गति से इनपुट कर सकता है।

मैंने msklc.exe के सहारे इन्स्क्रिप्ट कीबोर्ड में कुछ सामान्य परिवर्तन करके अपना कीबोर्ड विकसित किया है जिस पर गति लगभग 80 शब्द प्रतिमिनट की आ गई है।

इसी सन्दर्भ में यहाँ देख सकते हैं।
भन्नाट!
खूप छान!
Unknown said…
ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे
Abhay said…
Pn ..Avtarn chinhe...key board wr disat nhi

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट