आपले भाषा वैविध्य
आपले भाषा वैविध्य
रामराम मंडळी, आपल्या देशाची लोकसंख्या आहे सुमारे दीडशे कोटी. इथल्या प्रमुख भाषा मोजायच्या तर पन्नास एक भाषा निश्चितच अशा आहेत जी बोलणारे कोटयावधी, निदान एक कोटीपेक्षा जास्त लोक असतील. जगांत कांही छोटे -छोटे देश आहेत ज्यांची स्वतःची भाषा त्या देशांत बोलली जाते, व ती भाषा बोलणारे फक्त कांही लाख, कधी कधी तर फक्त कांही हजारच आहेत. पण ते सर्व देश प्रयत्नपूर्वक आपापल्या भाषा जपतात, आपली भाषाभिन्नता जपतात. कोणी म्हणेल आपल्या देशात इतक्या भाषा असण्याचा काही फायदा आहे काय? तर एक गोष्ट आठवते.
1971 मधे पाकिस्तानविरुद्ध बांगला देशाची स्वातंत्र्य लढाई चालू होती. त्यांच्या मदतीला भारतीय विमाने, व सेना तिकडे झेपावत होती. हे भारत-पाक युद्धच होते. अचानक आपल्या सैन्याला दाट संशय वाटू लागला की आपण जे संदेश प्रसारित करत आहोत त्यांचे डी कोडिंग पाकिस्तान सेनेला कळलेले आहेत त्यामुऴे आपला सर्व प्लान त्यांना समजत आहे. आता कांय करायचे? नवीन कोड तयार करून रुजू करण्याइतका वेळ नव्हता.
तेंव्हा कुणीतरी शक्कल लढवली. आपल्या सैन्यात मल्याळी सैनिक पुष्कळ आहेत. तर प्रत्येक विमानात व प्रत्येक मोठया सैन्य हालचालीच्या ठिकाणी किमान एक तरी मल्याळी सैनिक ठेवा आणि सर्व संदेश चक्क मल्याळीत ऐकवा. तसेच केले गेले. कुठल्याही कोडेड संदेश पाठवण्यापेक्षा ही युक्ती यशस्वी ठरली.
तर मंडळी, आपल्या देशात किमान हजार लोक तरी बोलतील अशा बोलीभाषा किती असाव्यात? त्यांची संख्या 7000 च्या पुढे आहे. जगातील प्रमुख 20 भाषांपैकी पाच भाषा भारतीय आहेत - हिंदी, बंगाली, तेलगू, मराठी, तामिळ ! एक कोटी पेक्षा अधिक लोक बोलतात अशा किमान 15 भाषा आहेत. हे वैविध्य टिकवू या. आंतर्राष्ट्रीय पातळीवर याचा फायदा मिळवू या. भाषांतील सौहार्द वाढवण्यासाठी अनुवादाचे सेतू, पूल, सर्वांमधे बांधूया. आपल्या भाषांमधे खूप खूप लिखाण करूया. त्यांच्या तुलनात्मक शब्दावळ्या, म्हणी, लोककथा यांचा संग्रह करूया, अभ्यास करूया. कलासक्त व कलाभक्त भारतात हे काम वेगाने होऊ शकेल.
Comments