पश्चिमी समृद्धीची लक्षणे आणि कारणे सा. विवेक १२-०२-२०१७


पश्चिमी समृद्धीची लक्षणे आणि कारणे
--लीना मेहेंदळे
गेल्या दीड वर्षातील १२ महिने अमेरिका व नीदरलॅण्ड या दोन देशांत गेलेनोकरीमुळे मुलांबरोबर जास्त काळ घालवता आला नव्हता म्हणून निवृत्तिनंतर त्याची भरपाई हे सांगायला कारणही झाल. या काळांत तिथली समृद्धि व तिची कारणे जवळून पाहिली , आणि पुन्हा पुन्हा जाणवत राहिले की त्यांचे मॉडेल डोळे मिटून उचलणे हे भारताला किती घातक आणि मारक ठरू शकते. दुसरीकडे त्यांच्या काही पद्धति ज्या आपण खरोखरी उचलायला हव्या तिकडे आपण दुर्लक्ष करतो. थोडक्यांत आपला विवेक हा हंसाचा नीरक्षीरविवेक न रहाता पंचतंत्रातील सुतारांच्या रंधाकामाची नक्कल करायला गेलेल्या मर्कटासारखी आपली अवस्था आहे असा थोडासा  त्रागा होण्याची मनस्थिती झाली आहे खरी. असो

अशी काही उदाहरणे सांगता येतील ज्या योगे समृद्धी टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी तिकडे काय चालले आहे याचा थोडा अंदाज यावा.
आपल्याकडे वनजीवनांची मोठी परंपरा होती. वानप्रस्थ आश्रम हा शब्द रूढ होता. वानप्रस्थ म्हणजे वनगमन करणे . सुमारे ५० ते ६० वर्ष वय झाले की आपले अधिपत्य इतरांकडे देऊन आपण कार्यमुक्त होणे व स्वाध्यायासाठी वनांत जाऊन रहाणे . तिथे त्यांच्या प्राथमिक गरजांची काळजी घेण्याची सोयही होऊ शकत असे. म्हणजेच नागरी जीवनाशी असलेले नाते पूर्णपणे तुटत नसे. पण मोठा काळ वनांत व स्वाध्यांयात घालवला जाई.
अगदी ब्रिटिश येईपर्यंत ही प्रथा काही अंशांनी सुरू होती. वनांत रहाणारे वनवासी , आदिवासी तर होतेच शिवाय कित्येक साधू परंपरेतील मंडळी , औषधे शोधणारे वैद्य , रानभाज्या गोळा करणारे तसेच पानांच्या पत्रावळी, द्रोण इत्यादि बनविणारे यांचे देखील वनांत सहजगत्या जाणे येणे असायचे. अगदी साने गुरूजींच्या शामची आई, या आधुनिक काळातील पुस्तकातही त्याचा उल्लेख आढळतो. वनभोजन हा रूढ शब्द होता. वनांमध्ये गूरूकुले चालत त्यामुळे बालवयीन व किशोरवयीन विद्यार्थ्यांचाही तिथे वावर असे.
ब्रिटिशांनी ही प्रथा मोडीत काढत जंगले ही संपूर्णपणे सरकारची मिळकत घोषित केली. लोकांचे वनातील व्यव्हार कमी कमी होत गेलेअगदी देवराई सारखी पुरातन व धर्माधिष्ठित प्रथा देखील मोडीत निघालीत्या काळांत फॉरेस्ट ऑफिसरांचे पगार हे कलेक्टरच्या पगारापेक्षा जास्त असत यावरून ब्रिटिशांना वनांचे किती महत्व वाटत होते ते आपल्या लक्षात येऊ शकते. स्वातंत्र्यानंतरही सरकारचे धोरण तेच राहिले. वनसंरक्षणाकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष झालेव समाजानेही  वने ही सर्वस्वी सरकारी बाब हे मान्य केले. वनजीवन ही संकल्पना आता फक्त पुराणकथांमध्ये शिल्लक राहीली. 

भारतीय संस्कृतिची दुसरी दोन वैशिष्टये होती ती म्हणजे एकत्र कुटुंब परंपरा व बलुतेदारी-आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थापण एकोणविसाव्या   शतकाच्या आरंभी मोठ्या प्रमाणात ग्रामीण अर्थव्यवस्था मोडीत  निघू लागली. कारखानदारीमुळे शहरीकरण वाढले. मिल-मजूर हे बिरुद बलुतेदारीपेक्षा श्रेष्ठ व स्थैर्याचे झाले. कारण ते हमखास पगार देत होते. विसाव्या शतकात स्त्रीशिक्षणाविषयी लोकजागृतिला सुरवात झाली . स्त्रीशिक्षण रूढ झाले आणि स्त्रियांना नोकरीच्या संधी, घराबाहेर पडण्याच्या व आपली क्षमता आणि कर्तृत्व दाखविण्याच्या संधी मिळू लागल्या या दोन्हींमुळे  कमावणारे आणि न कमावणारे असे दोन गट परिवार संस्थेमधे पडू लागले . त्यातून ताणतणाव वाढले आणि चौकोनी कुटुंबे अस्तित्वात आली. शिक्षणाचे प्रमाण अजून वाढले , आणि गांवोगांवी मुली-मुले आधुनिक शिक्षण घेऊ लागली. या आधुनिक शिक्षणाने त्यांना गावांकडून शहराकडे आणि शहराकडून परदेशाकडे ओढले. या दोन्ही कारणांनी वृद्ध आईबाप एकाकी पडू लागले. जीवशास्त्राचा एक सिद्धांन्त असे सांगतो की एका पिढीचे नैसर्गिक सख्य दुसऱ्या पिढीशी नसते. मात्र तिसऱ्या  पिढीशी असते. आजी-आजोबा आणि नातवंड असे  सख्य जास्त नैसर्गिक असते. पण आधुनिकतेच्या प्रवाहात हे सख्यही मोडीत निघाले. आता आजी-आजोबांच्या वयोगटाला आपली उपयोगिता संपली असा एक भयाण निराशेचा काळ सतावू लागला. याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न अजूनही भारतीय समाजवेत्त्यांनी सुरू केलेला नाही.

या पार्श्वभूमिवर अमेरिकेत सध्या प्रचलित असलेले दोन महत्वाचे पायंडे मला मनोवेधक वाटले.

स्थळ सान फ्रान्सिस्को भागातिल कुठलीशी गुलाब -बाग पण अशी व्यवस्था अमेरिकेत बहुतेक सगळ्या शहरांमधून आढळतेतर या १० एकरच्या गुलाब बागेत वेगवेगळ्या क्षेत्रात विविध प्रकारचे गुलाब आहेत.मधेच कुठे वृक्षराजी आहे,गवताचे लॅान आहेकारंजे आहे, ओढा व त्यावरचा धबधबा आहे. नर्सरी आहे, स्वच्छता गृहे आहेतखानपान सुविधा आहेत, रस्ते आहेत आणि या सर्वांना व्यवस्थित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा आहे.

मात्र यंत्रणेतील सुमारे १० टक्के व्यक्ति पगारी नोकरदार व इतर ९० टक्के पैकी फुलटाईम व्हॅालंटियर अगर कमी पगारावरील व्हॅालंटियर आहेतयापैकी बरीच मंडळी वृध्द व सेवानिवृत्त तर काही शिकाऊ विद्यार्थी आहेत. व्यवस्था अशी कि स्वयंसेवकांनी त्यांच्या त्या त्या आठवड्यातील सोईच्या तारखा व वेळा आधी कळवून ठेवायच्या. त्यानुसार त्यांना देणाऱ्या कामाचे नियोजन आधीपासुन ठरवले जाते. कोणी अपंग तर कुणावर वृध्दत्वामुळे काही मर्यादा असतात त्या विचारात धरल्या जातात. नवीन येणा-यांना काही प्रशिक्षणाची गरज असते तसेच जुन्यांना देखील वेळोवेळी पूरक प्रशिक्षण लागते. त्याची सोय केली जाते. अशा प्रकारे समाजाची सामूहिक ऊर्जा योग्य त-हेने वापरली जाते.
अशा त-हेचे व्यवस्थापन सोपे नसते. मुळात अशी  व्यवस्था फार जाणीवपूर्वक करावी लागतेतसेच ती टिकविण्यासाठी विशेष लक्ष पुरवावे लागते.जे कोणी अशा व्यवस्थापनाचा भाग असतात त्यांच्या साठीही हे एक मोठे प्रशिक्षण असते.जे स्वंयसेवक या योजनेमध्ये सहभगी होतात त्यांची मनोऊर्जा वाढतच रहाते कारण आपण अजून आयुष्यातून बाद झालेलो नाही तर अजून आपण समाजाला उपयोगी आहोत हा आत्माभिमान त्यांच्या सोबत असतो. त्यांच्याशी बोलताना हे प्रकर्षाने जाणवते.
याच बागेतील एका कोपऱ्यात छोट्याशा झोपडीवजा जागेत तीन चार म्हाताऱ्या बायका कौशल्यपूर्ण असे कागदाचे पुष्पगुच्छ बनवत होत्या. भेट देणाऱ्या प्रत्येकाला त्या एक अती छोटा पण सुबक गुच्छ देत होत्या. शिकू म्हणणाऱ्यांसाठी अर्ध्या ते एका तासाचे शिकवणी वर्ग चालवत होत्या आणि मोठा गुच्छ हवा असल्यास तो विकत देत होत्या.
आपल्याकडे कोणत्या IIM मधे असे समाजोपयोगी व्यवस्थापन शिकवले जाते?

दुसरे उदाहरण वनांबाबत आहे. लोकांना वनजीवनाची सवय लागावी म्हणून हे खास प्रयत्न केले जाऊ लागले आहेत. अशा एका दीड दिवसाच्या कॅम्पसाठी मी गेले होते. सुमारे ३०० हेक्टर वनक्षेत्राच्या तोंडावरच एक मोठे सुसज्ज ऑफिस व वन-म्युझियम. त्यांत पुतळे, बनावट घरटी, छोटे ओढे व पुस्तकांच्या माध्यमातून वनांची ओळख करून देण्याचा प्रयत्न. रजिस्ट्रेशन, फी भरणे, इत्यादी होत असतांना लोक  यात फेरफटका मारत होते. वनांत शिरल्यावर काय करायचे आणि कांय नाही याबद्दल निर्देश दिले जात होते. कॅम्पवर शेगडी पेटवण्यासाठी लाकडाचे ओंडके इथेच गोळा करायचे.  
तीन चार किलोमीटर पुढे कॅम्पसाइट होती. इथे प्रत्येक कॅम्पिंग परिवारासाठी शंभर फूट बाय शंभर फूट मोकळी केलेली जागा, त्यांत एक भली मोठी शेगडी एवढेच. जागेत आपण आपला टेण्ट लावायचा. सुमारे ४०-५० परिवार मिळून १०-१५ एकत्र स्वच्छतागृहांचे बांधकाम केलेले.  संपूर्ण परिसरात वीज पूरवठा फक्त या स्वच्छतागृहांसाठी. थोडासा रस्ता केलेला --त्यावरच कार पार्किंग व पाण्याच्या नळांची सोय. जागोजागी कचरा टाकण्यासाठी मोठे कण्टेनर. आत गेल्यावर म्युझिक वाजवायला परवानगी नाही. शेगडीतील आग इतरत्र पसरू नये याचे निर्देश.
इथे आल्यावर तुम्ही तुमचे अन्न शिजवायचे, व  टेण्ट मधे झोपायचे. एरवी जंगलातल्या पायवाटांवरून भटकायचे. सर्वांना रात्री एखाद्या ठिकाणी जमवून १ ते २ तासांचा वन ओळख हा कार्यक्रम तिथले फॉरेस्ट अधिकारी करतात. कठीण जागांवर भटकण्यासाठी खास गाइड होते. हा कॅम्प दीड दिवस ते पंधरा दिवस एवढा मोठा असू शकतो.
वनांची नासाडी न करता वन पर्यटन वाढवून त्यातून उत्पन्नही काढता येते आणि शिवाय लोकांचे वनाबाबतचे ज्ञानही वाढवता येते असा हा उपक्रम. इथे आम्हाला एक प्रयोग दाखवला . अमेरिकेतले मूळ रहिवासी या भागांत मिळणाऱ्या एका प्रकारच्या कंदाला वाळवून त्याचे पीठ करत. पण शिजवायचे कसे ? त्यांच्याकडे भांडी ही संकल्पना नव्हती. धातुंचीही नाहीत आणि मातीचीही नाहीत. मात्र तिथल्या बांबू आणि गवतातून घट्ट विणीची भांडी बनवली जात ज्यांत पाणीसुद्धा साठवून ठेवता येत असे. आता अशा भांड्यांना चुलीवर ठेऊ शकत नाही. तेंव्हा अशा भांड्यात हे पीठ पाण्यात कालवून ठेवायचेचूल वेगळी पेटवून त्यावर मोठा दगड तापवायचा. दोन लाकडांचा चिमट्यासारखा वापर करून तो दगड उचलायचा आणि थोड्या पाण्यांत क्षणैक बुडवून त्याची राख झटकली गेली की तो या पिठात टाकायचा. दगडातील उष्णतेवर ते पीठ शिजत होते. हा प्रयोग आमच्यासमोर करून आम्हाला ती लापशी थोडी मध टाकून खायला पण देऊन झाली.
विचार करून पाहिले तर अशा प्रकारचे पर्यटन आपल्या देशांत वाढवण्याच्या लाखो संधी व जागा आहेत.त्यातून वनांविषयी, निसर्गाविषयी प्रेम आणि जबाबदारी वाढीला लागते. त्याऐवजी सध्याच्या पर्यटन कार्यक्रमांत कांय दिसते ? तारांकित होटेल्स, त्यांचे तेच ते ठराविक मेनू, कॅसिनोज, मद्यपार्टी. किंवा फारफार तर एखाद्या देवस्थानावर सिंमेंटची बांधकामे जी त्यांना जास्तच घाण करतात.
हे चित्र आपणच बदलू शकतो.
------------------------------------------------

 -----------------------------------------------------------------------------------------------------------------------
 -------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 ------------------------------------------------------------------------------------------------------------------


Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

एक शहर मेले त्याची गोष्ट

उद्धव गीता भाग १ -- भांडारकर व्याख्यान दि. १२ जून २०१९