माझे लेखन -- सासंमं साठी

श्रीमती लीना मेहेंदळे एक कुशल प्रशासक व विचारवंत लेखक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. प्रशासनांत त्यांनी विविध क्षेत्रांवर ठसा उमटवला. देवदासींच्या आर्थिक पुनर्वसनाचे काम असो वा ऊर्जा-संरक्षणाचे, प्रत्येक कामांत त्यांची सामाजिक जाण व सिस्टम-सुधारण्याच दृष्टिकोन दिसून येतो. त्यांच्या कित्येक वैचारिक लेखांपैकी कांही लेख "इथे विचारांना वाव आहे" (संस्कृती प्रकाशन, पुणे) आणि "समाजमनांतील बिंब" (मौज प्रकाशन, मुंबई) या दोन लेखसंग्रहाच्या रूपाने प्रसिद्ध झाले आहेत. हिंदीमधेही तीन संग्रह आले आहेत, व बरेच लेख त्यांच्या ब्ल़ॉगवरही पहायला मिळतात. या लेखांतून प्रशासन व समाजाच्या नात्यांतील बारकावे उलगडत जातात आणि आपल्याला कोणत्या उद्देशाने कोणत्या दिशेने जायला हवे त्याची चर्चा आपल्या मनांत होऊ लागते.
संगणक-युगांत भारतीय भाषा हरवू द्यायच्या नाहीत यासाठी शासनामधे व शासनाबाहेर त्या सतत प्रयत्नशील आहेत. त्या विचारातूनच त्यांनी लिहिलेले "संगणकाची जादुई दुनिया" हे पुस्तक साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केले आहे.
वेचारिक लेखनाखेरीज त्यांनी विपुल निसर्ग-साहित्य, विज्ञान व बालसाहित्यही लिहिले आहे. देशांतील वेगवेगळ्या भाषांमधील साहित्य अनुवाद रूपाने मराठी व हिंदीत आणले आहे. त्यानी केलेला मा. कुसुमाग्रजांच्या 108 कवितांचा हिंदी अनुवाद आनंदलोक या नांवाने प्रकाशित झाला आहे. आतापर्यंत त्यांची एकूण 24 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
मराठी-हिंदीप्रमाणेच त्या इंग्रजीमधेही लेखन करतात. प्रशासनातील त्यांच्या प्रदीर्घ वाटचालीचे चित्र या लेखनातून पहायला मिळते. त्यामधे भाषा, स्त्री-विचार, पर्यावरण, विकास-नीती, शिक्षण, कायदा व सुव्यवस्था असे वेगवेगळे विषय हाताळलेले दिसतात. संप्रती बंगळुरू येथे केंद्र-शासनाच्या प्रशासनिक ट्रिब्यूनल मधे मेंबर पदावर कार्यरत.

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट