लक्ष्मी आणि अलक्ष्मी व्याख्यान दि
लक्ष्मी आणि अलक्ष्मी व्याख्यान दि
नमस्कार. आज आपली ही दुसरी भेट गाठ होत आहे. मी पहिल्या दिवशी सांगितले होते तसेच पुन्हा सांगते की समजा तुम्हाला कधीही वाटल की मला थांबवून काही प्रश्न विचारायचे आहेत तर नक्की विचारा. त्यातूनही थोडासा संवादात्मक हा विषय मांडला जाऊ शकतो. एकटी मीच बोलत राहीले तर मला कळत नाही की तुम्हाला किती आवडतय किंवा किती भावतय. म्हणूनच जर मधेच काही वेगळ विचारावास वाटत असेल तर नक्की तुम्ही मला थांबवू शकता.
आज आपला विषय अगदी वेगळा असा आहे. लक्ष्मी आणि अलक्ष्मी. तर या विषयामुळे प्रत्येकीला थोडस कुतुहल असेल. पण अलक्ष्मी हे नाव आपल्याला अपरिचित नाहिये. आपल्याकडे अलक्ष्मी हा शब्द पुष्कळ वेळेला वापरला जातो, कुठेना कुठे वाचनात हा शब्द आलेला असतो. तो शब्द अजिबात अपरिचित अश्यातला भाग नाहिये. पण त्याची संकल्पना काय आहे हा विषय मी इथे मांडणार आहे.
आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज आपल्या देशाच स्वप्न काय आहे. अस विचारल किंवा आज आपल्या देशातल सगळी राजकीय म्हणा सामाजिक म्हणा परिस्थिति पहाता देशाची पहिली प्राथमिकता, पहिली प्रायोरिटी काय आहे. अस विचारल तर सगळ्यांना एक सागंता येईल. की आपला देश जगातल्या सगळ्यात श्रीमंत देशामध्ये पाचव्या नंबरावर आणून ठेवायचा. आता तो अकराव्या नंबर वर आहे. आधी तो एकशे सत्तराव्या नंबर वर होता. तर हे आपल्या देशाच स्वप्न आहे. आणि आपणही सगळे जण हे स्वप्न ऐकल्यावर विचार करतो की वा,वा, म्हणजे इतके चांगले काहीच असू शकत नाही. कारण पैसा किंवा श्रीमंती हे नको कुणाला?
पण गंमत अशी आहे की एका गोष्टीची आपण कुठेतरी गल्लत करतो. आणि ती कुठे करतो तर आपल्याकडील म्हणजे भारतीय संस्कृतीत. मला अस आवर्जून सांगावस वाटत की भारतीय संस्कृती आणि जगातली इतर कुठलीही संस्कृती असा भेद आपल्याला करता येईल. बाकी सगळे जग एकीकडे आणि भारतातली संस्कृती एकीकडे. ह्या दोघांमधला खरा फरक कुठे निर्माण होतो? तर इतर कुठल्याही देशाला, म्हणजे चीन सारखा देश कदाचित सोडला तर इतर कुठल्याही देशाला, एवढया हजारो वर्षांची परंपरा, जी आपल्या देशाला लाभलेली आहे,, तशी त्या देशांना नाहिये. म्हणजे भूभाग या नात्याने ते देश अस्तित्वात होते का नव्हते तर नक्की होते. जो ग्रीस म्हणून आपण आज ओळखतो तोच ग्रीस दहा हजार वर्षांपूर्वीचा तो भूभाग होताच. त्याला कदाचित ग्रीस हे नाव नसेल पण तिथे लोक राहत होतेच. मुद्दा काय आहे की एक सभ्यता किंवा एक संस्कृती म्हणून ते किती प्रगत झाले - कुठपर्यंत पोचले आणि जिथे ते पोचले तिथे ते टिकून राहिले का त्यांची घसरण झाली? का ते पूर्णपणे संपून गेले? तर आपण अस बघतो की भारत आणि चीन हे दोन देश जर सोडले तर जगातल्या इतर सगळ्या देशांमध्ये ज्या काही प्रचंड उलथा पालथी झाल्या त्यामध्ये त्यांची संस्कृती म्हणून जी काही होती ती सगळी नष्ठ झाली. जस आपण आता म्हणतो प्राचीन ग्रीक संस्कृती, ती ग्रीक संस्कृती आत्ता आपल्याला त्यांच्या वाङमयामधून आपल्याला जाणवते किंवा आपण त्याचा अभ्यास करू शकतो. पण प्रत्यक्ष ती संस्कृती आचरणात आणणारा समाज आहे का याच उत्तर नाही असच आहे. भारतामध्ये मात्र स्थिती वेगळी आहे. भारतामध्ये आपण जर का म्हटल की महाभारत हे साधारण पाच हजार वर्ष पूर्वीचे होते. रामायण सात हजार पूर्वीचे होते वेद वाङमय दहा हजार वर्षापूर्वीचे होते. तर त्यामध्ल्या वर्णिलेल्या ज्या काही परंपरा आहेत त्यामधल्या ज्या काही मान्यता आहेत जे सिद्धांन्त आहे त्यातल बरचस काही आजही आपल्या जवळ संचित म्हणून उपयोगी आहे. त्यामुळे जी काही सांस्कृतिक जडण- घडण त्या काळात झाली ती एक कनटयुन्यीअस वाटचाल अजूनही आपल्याला दिसून येते. तर कुणी कदाचित म्हणेन छे छे वेद काही दहा हजार वर्षा इतके जुने नव्हते तर ठीक आहे हरकत नाही. ते दहा हजार वर्ष, जुने नसतील तर कदाचित दोन हजार वर्ष जुने असतील. पण तितकी जुनी परंपरा सुद्धा जगातल्या इतर कुणाला उपलब्ध नाहिये. हे भारताचे मोठे विशेष.
दुसरा जो विशेष की ज्याच्याकडे आपण कायम दुर्लक्ष करत असतो. तो हा की कित्येक विषयांमध्ये आपल्याकडला समाज हा अतिशय प्रगत होता. मग तो विषय खगोलशास्त्र असो की अस्त्र निर्मिती असो. तो विषय धातू निर्माणाचा असेल, तो विषय व्याकरणाचा असेल, आर्युवेदाचा असेल असे कित्येक विषय. ह्या जगातील विषयांपेक्षा अतिशय वेगळे, वेगळ्या प्रकारचे विषय आपल्या कडल्या त्या काळातले जे काही समाज धुरीण होते किंवा विद्वान होते त्यांनी हाताळले आहेत. अगदी राजनीती, समाजशास्त्र हे विषय सुद्धा त्या लोकांनी हाताळले आहेत. आपल्या वाङमयात आपल्याला झलक त्याची दिसून येऊ शकते. पण गेल्या दोनेकशे वर्षामध्ये ब्रिटिशांच्या काळात एक अशा प्रकारचा पगडा आपल्या मनावर बसला की ही जी काही आपली पूर्वापार चालत आलेली संस्कृती आपण म्हणतो. ती खरी संस्कृती नव्हती किंवा त्यातल्या ब-याच गोष्टी काल्पनिक होत्या. किंवा त्या काल्पनिक नसल्या तरी अयोग्य होत्या, त्या अयोग्य नसल्या तरी आता त्या अयोग्य आहेत. इत्यादि इत्यादि. आणि त्या ब-याच इररेलेव्हंट आहेतच म्हणजे अप्रस्तुत आहेत. शिवाय त्यांच्यामध्ये सत्ताकारण होत, राजकारण होत आणि त्यामुळे भेदाभेद होते. जाती विद्वेश होता, वर्णविद्वेश होता.
आणि ह्या सगळ्याच्या मागे अजून एक गोष्ट आहे. फक्त इंग्रजांमुळे आपल्या देशात ही मनोवृत्ति घडली असे म्हणणे चुकीचे होईल. जर आपण जगाचा इतिहास गेल्या तीनशे वर्षें एवढाच बघितला तर गेल्या तीनशे वर्षात घडलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे औदयोदिक क्रांती. त्या औद्योगित क्रांतिमुळे जी पूर्वापार चालत आलेली पद्धत होती, विशेषतः जो कामगार वर्ग जो अॅक्युअली गोष्टी घडवून देणारा वर्ग, मग ते लोहार असतील सुतार असतील तर ह्या वर्गाच काम औद्योगिक क्रांतीच्या पूर्वी कस चालत असेल? समजा मला हा पेला तयार करायचा आहे. तर जो कोणीतरी लोहार असेल तो याच्यासाठी लोखंड किंवा जे काही धातू आहेत ते वितळवून याच्या मुशित घालून तो एक पेला काढणार मग त्याला घासून पुसुन देणार. म्हणजे एक- एका वस्तुवर त्या कारागिराला काम कराव लागत असे. औद्योगिकरण आल्यानंतर मशिनने त्या गोष्टींची निर्मिती जेंव्हा सुरू झाली ते मशीन एकाच प्रकारच्या शंभर गोष्टी एकापाठोपाठ करू शकतो. मग आपल्याकडे जे कामगर होते, जे पूर्वी हाताने प्रत्येक गोष्ट करत होते. त्या कामगारांच एकुण आयुष्य जे आहे ते संपूर्णपणे पालटून गेल आणि त्यांच्या व्यवसायाला आता कुठेही कोणी विचारानेस झाल. कारण ते कुणाला परवडणार नव्हत आणि पुन्हा मशीन वापरण्यासाठी श्रमिक लागतच होते म्हणजे वर्कर्स लागत होते. तर ह्या सगळ्यांना ज्यांचा नेहमीचा रोजागार संपला आता, ते बेरोजगार आहेत आणि तिकडे मशीन चालवणाऱ्यांची गरज आहे म्हटल्यावर त्या सगळ्यांचे यांत्रिकीकरण झाले. युरोपामध्ये औद्योगिक क्रांतीत त्या सगळ्यांना सामावून घेतल गेल. ते होत असताना आपण ज्याला उद्योजक म्हणून म्हणतो - की ज्यांनी इनव्हेसमेंट केली, ज्यांनी मशिनरी उभी केली, ज्यांनी एखाद्या पॉड्रक्शनची इंडस्ट्री उभी केली, त्यांना प्रचंड प्रमाणात आर्थिक गुंतवणूक गरजेची होती. आणि त्या गुंतवणूकीच्या पोटी ह्या कामगारांचे मात्र अतिशय मोठया प्रमाणावर शोषण त्या इंड्रशिअल रिव्होल्युशनच्या काळी झाल. त्या म्हणजे सतराव्या आणि अठराव्या शतकात फार प्रचंड प्रमाणावर कामगारांच शोषण तिथे सुरू झाल. आणि ह्या शोषणाला पर्याय किंवा उत्तर म्हणून सशस्त्र क्रांतीची भाषा हेगेल किंवा कार्लमार्क्स सारखे लोक करू शकले. आणि ते तत्वज्ञान पुढे एकोणीसाव्या शतकात युरोपभर आणि विसाव्या शतकात जगभर पसरल. ते तत्वज्ञान मांडताना ते अतिशय डायनॅमिक, गतिशिल, आव्हानात्मक, आधुनिक आणि मुख्य म्हणजे सगळ्या पीडित, दलित, दुःखित, शोषित लोकांच्या सगळ्या कष्टांना निवारण करू शकेल अस रामबाण औषध असाव अशा पद्धतीने मांडलं गेल. सशस्त्र संघर्षातून सत्ता ही कम्युनीझमची थिअरी जवळ- जवळ सगळ्या जगभर मान्य झाली.
त्या काळात म्हणजे एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकात भारताची काय अवस्था होती अस जर आपण बघितल तर आपल्याला अस लक्षात येईल की आपणही वेगळ्या अर्थाने दुःखीत, पिडित, शोषित असेच होतो. आत्ता नुकतेच एका जर्मन विद्यापीठात एक रिसर्च पेपर्स लिहिला गेला त्यात त्यांनी अस म्हटलय कि शून्याव्या शतकापासून तर सतराव्या शतकापर्यंत म्हणजे सेवेनटिन हण्ड्रेड एडी पर्यंत जे काही जागतिक समृद्धी, जागतिक जीडीपी होती त्यामध्ये भारताचा वाटा तेहतिस टक्के होता, म्हणजे एक तृतियांश. तो सतराशे एडी पासून एकोणीसशे सत्तेचाळीस एवढया दोनशे अडिचशे वर्षाच्या काळावधीत तेहतीस टक्क्याच्या वरून पाच टक्यावर आला. आणि आता तो हळु हळु वाढत पाच टक्यावरून साडे आठ टक्यावर आलेला आहे. म्हणजे तेवढया अडिशचे वर्षाच्या काळात जे मोठया प्रमाणावर शोषण इथे झाले, त्याच एक हे रिफेल्कशन आहे. जागतिक जीडीपी मध्ये भारताच कन्ट्रीब्यूशन तेहतीस टक्यावरून पाच टक्यावर येत म्हणजे ब्रिटिशांनी इथली संपत्ती किती लुटून नेली असेल आणि ते करत असताना इथे किती अत्याचार किंवा शोषण केल असेल त्याचा आपल्याला अंदाज येतो. तर अश्या ह्या शोषित मनस्थितीतल्या देशाला सुद्धा कम्युनिझमचे आकर्षण वाटल नसेल तर नवल आहे. आणि म्हणून आपण बघतो की आपले जे स्वातंत्र्यावीर, आपण ज्यांना मानतो, मग ते भगतसिंग असतील चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस असतील, नेहरू असतील आणि काही प्रमाणात गांधीजी आणि सरदार पटेल असतील परंतु ह्या सगळ्यांवर सुद्धा कम्युनिझमचा विलक्षण पगडा होता.
मग असा स्वातंत्र्याचा विचार करणारे जे खंदे लढवय्ये तेही कम्युनिझमने प्रभावित झाले होते, तर आपल्याकडचे ज्यांना आपण ऑकॅडमिक स्कॉलर म्हणू शकतो, जे शिक्षण तज्ञ होते त्यांचे काय. इंग्रज भारतात आले सतराशे सत्तावन्नमध्ये आणि साधारण आणि सतराशे नव्वद पासून त्यांनी इथली शैक्षणिक परिस्थिती आणि परंपरा बदलायला आणि इंग्रजी शिक्षण आणायला सुरवात केली. अठराशे चाळीस मध्ये त्यांनी संपूर्ण भारतभर युनिव्हर्सल एज्युकेशन हे नाव देत इंग्रजी शिक्षण पद्धत लागू केली. त्या शिक्षण पद्धतीमध्ये अस एकदम व्यवस्थितपणे मांडण्यात आल होत की तुम्ही इंग्रजी शिक्षण घेतल आणि इंग्रजांच्या पद्धतीच शिक्षण घेतल आणि इंग्रजी मानसिकतेतून शिक्षण घेतल तरच तुम्हाला शासकीय मानसन्मान, शासकीय नोकऱ्या, शासकीय प्रतिष्ठा, पैसा सगळ मिळू शकत. पण ब्रिटिश मानसिकता बाजूला ठेवून तुम्ही तुमची भारतीय म्हणून काही वाटचाल केली तर तुम्हांला ह्या सगळ्या गोष्टीतून बाजूला राहाव लागेल.
मी जेंव्हा आपल्या स्वातंत्र्य लढयातल्या नेत्यांचा विचार करते तेंव्हा सावरकर सोडले तर मला असा दुसरा कोणीही नेता दिसत नाही कि ज्याच्यावर कम्युनिझमचा पगडा नव्हता. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामधले आपले जे विद्वान होऊन गेले, त्यांच्यावर देखील ह्या नवीन गोष्टींचा पगडा होता. ते नुसते कम्युनिझमचे विचार नव्हते तर आधुनिक विज्ञान, आणि आधुनिक विज्ञानापाठोपाठ ज्याला आपण ह्युमॅनिटिज म्हणतो म्हणजे, समाजाशी निगडित जी इतर शास्त्र आहेत, मग त्याच्यामध्ये समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, इकॉनॉमिक्स असेल फिलॉसॉफि असेल, इतिहास असेल भूगोल असेल – ह्या सगळ्यांना ह्युमॅनिटिज अस एकत्रित नाव आहे. यांच्यापासून जी वेगळी ब्रांच आहे तिला आपण सायन्स म्हणतो. म्हणजे फिजिक्स, केमेस्ट्री, जीयॉलॉजी, वगैरे वगैरे. तर ह्युमॅनिटीज मध्ये देखील जे काही इंग्लंडमध्ये किंवा युरोपियन देशांमध्ये जे लिहले गेल, तेच खर त्याच्या आधीचे जे काही लिहले असेल ते सगळ काल्पनिक किंवा पुराणतत्ववादी किंवा मिथ्या मायथॉलॉजी. अशा प्रकारे भारतामध्ये जे काही लिहले गेले होते, पूर्वापार शिकवले जात होते, त्याची भारतामध्ये अशा प्रकारे संभावना झाली आणि जे काही आपण युरोपियन पुस्तकांमधून शिकत असतो आणि युरोपियन शिक्षणामधून आपण शिकलेल जे काही इतरांपर्यंत पोचवत असू ते खर शिक्षण. त्याच्या बाहेरच तुम्ही काही सांगत असाल तर ते मिथ्या किंवा पुराणमतवादी आहे, असा एक शिक्का सगळ्या विद्वानांवर बसवण्याची प्रथा निर्माण झाली होती. त्या मध्ये आपल्या देशातील खूपशा विद्वानांनी हा पुराणमतवाद सोडून किंवा पुराणमतवाद झुगारून हिमतीने नवीन आधुनिकता वाद स्वीकार केला तर मला त्यात आश्चर्य ही वाटत नाही आणि त्या काळात खूप मोठी चूक झाली असही वाटत नाही. पण आजचा जर आपण विचार करायला बसलो तर आज जेंव्हा आपण स्वतंत्र भारतात आहो तेंव्हा आज आपल्याला पुर्नविचार करण्याची गरज आहे अस मला राहून राहून वाटत.
हा पुर्नविचार करत असताना आपल्याला पुन्हा एकदा मागे वळून बघायची गरज आहे. आणि तिथे आपल्याकडे काय संचित होत, वाङमय काय होत, आपल्या कल्पना काय होत्या आपली समाजशास्त्रीय व्यवस्था कशी होती, आपली राजकिय व्यवस्था कशी होती, ह्याचा आज आपण अभ्यास करण्याची गरज आहे. आणि तो तौलनिक अभ्यास आपण करू शकतो. आधी काय होत आणि आत्ता काय आहे आणि पुढे होऊ शकत. अभ्यास केल्यानंतर अस वाटल की नाही, आधीचे भारतीय चुकीचे होते आणि आताचे बरोबर आहेत, तर आपण तो निष्कर्ष स्वीकारू शकतो पण जर आपण केवळ आपल्या एकोणीसाव्या व विसाव्या शताब्दीतल्या मानसिकतेमुळे, व त्यातून आलेल्या इनर्शिया मुळे तो मत प्रवाह स्वीकारत असू तर ते चूक आहे, अस मला मह्णायच आहे.
ही प्रस्तावना जरा मोठी का झाली - तर आजही आपण कसा विचार करतो पहा. जेंव्हा आपल्याकडे इकॉनॉमिक्स हा विषय शिकवला जातो, त्यावेळेला आपल्या देशातले इकॉनॉमिक्स या विषयातले सर्वात मोठे अर्थशास्त्रज्ञ कोण असा जर प्रश्न विचारला तर त्याच उत्तर येत -- मनमोहन सिंग, आणि चिदंबरम. कारण काय -- कारण ते हॉरवर्ड मधून शिकून आले आहेत. त्यांनी युनायटेड नेशन्स व इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ह्या संस्थांमध्ये नोकऱ्या केलेल्या आहेत. म्हणून ते सगळ्यात मोठे अर्थशास्त्रज्ञ. त्यांनी भारतीय अर्थशास्त्राचा कधी अभ्यास केला आहे का असा जर प्रश्न विचारला तर उलट प्रश्न येतो की भारतीय अर्थशास्त्र अस काही होत का त्यामुळे मला वाटत की अगदी मनमोहम सिंग असतील किंवा चिदंबरम असतील, तरी सुद्धा भारतीय अर्थशास्त्र काय होत हेच त्यांना माहित नसेल किंवा त्यांनी अभ्यास केला नसेल तर त्यांनी भारतात अर्थशास्त्रज्ञ म्हणून का मिरवाव? असा प्रश्न मला विचारावा वाटतो. कुणी म्हणेल त्या अभ्यासाची काय गरज आहे? ह्याच सुद्धा कारण आहे. समजा जगभरात कुणीही हा अभ्यास करत नसेल आणि संबंध जगभरात हॉरवर्ड जे म्हणेन तेच सर्वश्रेष्ठ अस मान्य असेल तर भारताने वेगळा विचार का करावा हा ही प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण आपल्या देशाची जी काही एकूण परंपरा आहे, नुसती सांस्कृतिक परंपरा अस मी म्हणणार नाही, आपल्या देशाची भौगोलिक परिस्थिती आणि आपल्या देशातील सामाजिक मनोवैज्ञानिक परिस्थिती ह्या सगळ्याचा विचार केला तर आपल्या देशात अस बरच काही वेगळ आहे, की ज्यामुळे जगात इतरत्र जे काही चालत त्यापेक्षा आपल्याला काही वेगळ्या सोल्युशन्सची गरज आहे. आणि त्या सोल्यूशन्सचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्याला थोडस मागे वळवून आपल्याकडे ह्याची काही उत्तरे होती का ह्याचा शोध घेण गरजेच आहे. मागे वळून बघण हे किती महत्वाच असत. ह्याच एक छोटस तथ्य बघा. आपण म्हणतो जंगलाचा राजा सिंह. तर सिंहाची अशी पद्धत असते की थोडस अंतर चालून गेल्यावर तो थांबतो, आणि मागे वळतो. आपण जेवढ अंतर चालून आलेलो आहे, ते तो पुन्हा एकदा त्याच्या दृष्टिने पूर्णपणे निरखतो. आणि तिथे काही नवीन संकट आहे का, तिथे कुणी नवीन शत्रू लपून बसलेला आहे का, किंवा जी जागा आपण सोडून आलो तिथे ही माझ्या वहिवाटीतील जागा आहे असे सांगणाऱ्या ज्या काही खाणाखुणा निर्माण करत मी पुढे आलेलो आहे त्या खाणाखुणा व्यवस्थित आहेत ना, त्यांच्यावर कुणी घाला घातलेला नाही ना – ह्या सगळ्याचा विचार करून मग जेंव्हा तो समाधान पावतो, तेंव्हाच तो पुढली वाटचाल करतो. तो विनाकारण जंगलाचा राजा नाही झालेला. ही जी काही सिंहाची प्रवृत्ती आहे, पद्धत आहे, तर ह्या गोष्टीला आपल्या कडे खूप सुंदर शब्द आहे- सिंहावलोकन. मला अस नेहमी वाटत की तुम्हाला जर स्वामित्व पाहिजे असेल जस जंगलाच्या राजाला प्राप्त आहे, तर तुम्हांला सिंहावलोकनाची सवय हवी, आणि ती पद्धत तुम्हाला अनुसरावी लागेल.
पण आपल्याकडे दुर्दैवाने आपण ती विसरायला लागलो आहे. आपण म्हणतो भारताला विश्व गुरू व्हायचय - विश्वाचा राजा व्हायचय. हे कस शक्य आहे? तर पहिल्यांदा आपण ही सिंहावलोकनाची सवय लावून घेऊया अस मी म्हणेन. म्हणून भारतात कदाचित एक्झॅकटली अर्थशास्त्र हा शब्द वापरला गेला नसेल, परंतु आर्थिक सुबत्ता होती आणि ती आर्थिक सुबत्ता आणण्याची जी काही पद्धती आहे, त्या पद्धतीबद्दल भारतात काय सांगीतल गेल? ह्याचा आढावा मला ह्या ठिकाणी मांडायचा आहे. ती पद्धत सांगत असताना आपल्याकडे लक्ष्मी आणि अलक्ष्मी असे दोन शब्द वापरले गेले.
आता ही पुन्हा भारतीय संस्कृतीची एक वेगळी परंपरा किंवा आपण खासियत म्हणूया की ज्यांच्या बद्दल आपल्याला फारस प्रेम वाटत नाही, किंवा त्यांनी आपल्या जवळ असाव अस वाटत नाही, तरी सुद्धा त्यांचा तिरस्कार न करता त्यांना थोडाफार आदर दाखवण ही एक आपली संस्कृती आहे. त्यामुळे लक्ष्मी आणि अलक्ष्मी हा भेदाभेद करताना अगदी पुराणकालीन कथा आपण बघितली तर ती कथा काय सांगते? समुद्र मंथनाच्या वेळेला त्यातून लक्ष्मी लक्ष्मी बाहेर आली हे सगळ्यांनी ऐकल आहे, पण सगळ्यात अगोदर हालाहाल बाहेर आल आणि ते शंकराने ते हलाहल प्राशन केल म्हणून पुढील समुद्रमंथन शक्य झालं. त्या हलाहलानंतर लक्ष्मीच्या सोबत अलक्ष्मी प्रकट झाली आणि तिला कुणीच स्वीकार करीना. परंतु देव आणि असुरांनी समुद्रमंथन सुरू ठेवल आणि त्यातून जसजशी इतर रत्न निघायला सुरवात झाली तस अलक्ष्मीकडे सगळ्यांच दुर्लक्ष झाल. मग काही रत्नांवर असुरांनी, काहींवर देवांनी आपापला हक्क सांगायला सुरवात केली. अस करता करता जेंव्हा लक्ष्मी निघाली तेंव्हा ती आपल्याला मिळावी अस देव व असुर दोघांनाही वाटल. पण तिने त्या दोघांचाही तिरस्कार केला आणि ती विष्णुकडे गेली. परंतु विष्णुशी विवाह करण्यापूर्वी तिने विष्णूला सांगितले की माझी मोठी बहिण आहे, अलक्ष्मी. तिचा विवाह आधी व्हावा मग माझा विवाह व्हावा. तरी तिचा विवाह होईल अशी तुम्ही काही व्यवस्था करा. मग विष्णूंनी उद्दालक नावाचे एक ऋषी होते त्यांना भरीला घालून त्यांच्याशी अलक्ष्मीचा विवाह लावून दिला. परंतु उद्दालक ऋषींची कथा काय आहे? आपल्याला लहानपणी कधी तरी खरा शिष्य आरूणी हा धडा होता, तो कोणी वाचलेला आहे का? तर हे जे आरूणी म्हणून धौम्य ऋषींचे शिष्य तेच पुढे उद्दालक आरूणी या नावाने प्रसिद्धीस आले आणि त्यांनी बरीच मोठी ग्रंथरचना केली. छांदोग्य उपनिषषदातील प्रसिद्ध तत्त्वमसि हे सूत्र त्यांचेच असून छांदोग्य हे त्यांचेच एक वेगळ कर्तुत्व आहे. अशा उद्दालक ऋषींनी अलक्ष्मीच्या एकूण सगळ्या स्वभावावरून तिला सोडून द्यायचा निर्णय घेतला आणि तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. अलक्ष्मी पुन्हा दुःखाने व्याकुल झाली. मग विष्णू तिच्याजवळ आले तेंव्हा तिने विष्णूला म्हटल की जस तूझ्याशी लक्ष्मीने विवाह केलाय, आणि जसा तू तिचा स्वीकार केलाय तस माझाही का ही स्वीकार करत नाही? जुन्या ग्रंथात अलक्ष्मीच वर्णन अस आहे की ती दिसायला लक्ष्मीसारखीच सुंदर, तिच्यासारखीच कमळावर बसून आलेली. परंतु तिच वाहन हे कावळा आणि लक्ष्मीच वाहन उलूक म्हणजे घुबड. आपल्याकडे म्हणयाची पद्धत आहे की कावळा आणि घुबड यांच शत्रुत्व आहे. तर कावळा हे अलक्ष्मीच वाहन. जरी तिचा चेहरा अतिशय सुंदर, सौंदर्यवान असला तरी बाकीचे शरीर हे कुरूप अस तिच पुराणातल वर्णन आहे. तर विष्णुनी सांगितले की नाही, अलक्ष्मी ही कुठयाही परिस्थितीत माझी पत्नी होऊ शकत नाही, मी तुझा स्वीकार करू शकत नाही. पण तुला काहीतरी निवासस्थान हव. म्हणून मी तुझ निवासस्थान ठरवून देतो. जिथे आळस आहे, जिथे कामचुकारपणा आहे, जिथे अप्रामाणिक पणा आहे, जिथे घाण आहे, कचरा आहे, अशा लोकांच्या घरात तुझ वास्तव्य तुझ असू शकत. तू तिकडे राहू शकतेस. पण यानंतर अशी काही मंडळी विष्णूकडे गेली आणि म्हणाली की आमच्यात सगळे जरी दोष असले तरी सुद्धा अलक्ष्मीने कायम आमच्याकडे राहू नये. कधीतरी आम्हांला थोडासा रिलिफ मिळावा. तेंव्हा विष्णुंनी सांगितले की ठीक आहे तर मग वर्षातून चार सहा दिवस लक्ष्मीची पण तुमच्यावर कृपा होईल. पण त्याला अट अशी राहील की तुम्ही तेवढया काळात आळस झटकून आधी तुमच्या घरातली घाण बाहेर काढा. अश्या तऱ्हेने आपल्याकडे दिवाळीच्या अगोदर लक्ष्मीपूजनाच्या अगोदर पहिल्यांदा घराची साफ- सफाई, घराचा कचरा काढण हे करतात. पण ते करत असताना सुद्धा अलक्ष्मीचा अनादर करायचा नाही. त्यामुळे तिचे प्रतीक म्हणून केरसुणी आणायची, तिची पूजा करायची, आणि तिच्यावर बसवून आम्ही तुझी बोळवण करत आहोत असा मंत्र अलक्ष्मीला उद्देशुन म्हणायचा, आणि तिला बाहेर काढायची. शक्यतो वाहत्या पाण्याच तिच विसर्जन करायच, की जेणे करून ती पुन्हा येऊ नये. आणि मग लक्ष्मीला आपल्या घरात आणायच आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तिची पूजा करायची.
ही आपली परंपराच आपल्याला बरच काही सांगून जाते. मी जेंव्हा आजच्या युगाप्रमाणे याचा विचार करते - ह्यात जे पौराणिक शब्द होते - आळस, किंवा अकर्मण्यता, यांच्या जोडीला अप्रामाणिकपणा. ह्या सगळ्या वर्णनामध्ये अप्रामाणिकपणा हा चपखल बसणारा शब्द आहे. ही कथा आपल्याला भारतीय परंपरेमधील धनाची, संपत्तीची व्याख्या आणि भारताबाहेरील परंपरेत असलेली संपत्तीची व्याख्या ह्या दोघांमधील फरक आपल्याला सांगून जाते. जगातल कुठलही अर्थशास्त्राच पुस्तक जर तुम्ही घेतल आणि खास करून त्यातले निगोशियेबल इन्सट्रमेंट अॅक्ट घेतले तर ते काय सांगते? हेच की निगोशियेबल इन्सट्रमेंट म्हणजे नोटा किंवा बँकेचे चेक कुठल्याही अवस्थेत असले तरी ते ज्याच्या हातात आहे त्याचे आहेत. म्हणजे पैशाला काळा गोरा, प्रामाणिक, अप्रामाणिक अशी कुठलीही लेबल चिटकवली जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही चोरून पैसे आणले, पण ते आज तुमच्या हातात आहेत तर ते तुमचे आहेत. जोपर्यंत कोर्टात कुणी केस केली नाही की तुम्ही त्याचे पैसे चोरून आणलेले आहेत आणि ते सिद्ध केले नाही, तोपर्यंत ते तुम्ही त्याला परत करण्याची गरज नाही. तुमच्यावर गुन्हा साबित झाल्यावर तुम्हाला त्या गुन्ह्याप्रमाणे जो काही तुरूंगवास अमुक तमुक शिक्षा दिली जाणार आणि मग त्या जजाच्या सदसद्विवेक बुद्धीवर अवलंबून आहे की ते पैसे त्याला परत करा अस तुम्हाला सांगायच कि नाही सांगायच. तर सांगायचा उद्देश असा की ह्या ज्या सगळ्या नवीन पद्धती आपण बघतो, त्यातील एक ठळक गोष्ट अशी असते की पैसा हा पैसा आहे. त्याला कोणतही दुसर लेबल लागत नाही. पण भारतीय पद्धतीत तस नाहीये. भारतीय पद्धतीत त्याला अ हा शब्द लावून अलक्ष्मी अस वर्णन केल तर त्या शब्दामध्येच अप्रामाणिकपणा, आळस इत्यादि अनुस्यूत आहेत. आळसातून आलेला पैसा म्हणजे जुगाराचा पैसा – जो मिळण्यासाठी श्रम केलेले नसतात. तर आपण अशी वेगळी व्याख्या करतो कि ह्यांच्या मधून आलेला पैसा अलक्ष्मी आहे. निव्वळ अप्रामाणिकपणा नको एवढयावर आपली संस्कृती थांबत नाही, तर श्रमाविना मिळालेला पैसाही अमान्य करते. समजा मी रस्त्याने चालत गेलेली आहे, मी कुणाची चोरी केलेली नाहीये पण शंभर रूपयांची नोट मला रस्त्यात सापडली, ती मी उचलली. आता विधान काय सांगत - ती मी उचलावी की ना उचलावी? तर मी ती उचलावी कारण ती संपत्ती आहे, तिचा अनादर करायचा नाही. ती लक्ष्मी असेल तरी अनादर नाही, अलक्ष्मी असेल तरी अनादर नाही. अनादर करायचा नाही म्हणून तिला उचलायच पण ती मी वापरायची का? आपल्याला आठवत असेल, आपल्याला लहानपणी हे शिकवल गेल होत की असे काही पैसे पडलेले मिळाले तर ते उचला आणी ते मंदिरात नेऊन ठेवा. मला अस आठवत की कित्येक वेळेला आम्हांला मुद्दाम मंदिरात जाव लागत होत -- का तर कुठे तरी रस्त्यात सापडलेत पैसे. ते घरी न्यायला परवानी नाही, खिशात ठेवायला परवानगी नाही, तर सर्वात आधी त्या अलक्ष्मीची बोळवण करा -- तिला मंदिरात देऊन टाका. मी ते चोरल होते का – तर चोरले नव्हते, पण ते मी कमावलेले ही नव्हते. त्यामुळे जे मी श्रमपूर्वक कमावले नाहीत ते मी वापरायचे नाहीत, हा एक खूप मोठा अर्थशास्त्रीय नियम आपल्याला सांगितला गेलेला होता. जे तुम्ही कमावल असेल तेवढच तुम्ही वापरू शकता. जे तुम्ही कमावल नाही ते तुम्ही वापरू शकत नाही. तर ही जी आपली संपत्तीची व्याख्या आणि अशी जी लक्ष्मी आहे ती ज्याच्याकडे आहे त्याा व्यक्तीमधे विष्णूचा अंश आहे. पण जर तुम्ही अप्रामाणिकपणे कमावल असेल किंवा जे बिन मेहनतीच तुम्हाला मिळाल असेल, ती अलक्ष्मी आहे. तिचा तुम्ही अनादर करू नका, परंतु तिचा तुम्ही स्वीकारही करू नका. हे मुख्य तत्वज्ञान आहे.
आता एक उदाहरण म्हणून सांगायच तर आपल्याकडे लॉटरी ही खुप प्रचलित आहे. त्याची मोठी सिस्टीम आहे, ्गदी सरकारीसुद्धा. लॉटरीचे तिकिट घेणारे घेतात – एकदा नाही तर कित्येकदा. मग कधी तरी त्यांना एक मोठ बक्षीस लागत आणि धन्य वाटत. आपण प्रायव्हेट लॉटरी थांबवू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर मग सरकारने ठरवले की आपणच यात उतरायच. म्हणून सरकारी लॉटरीची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे लॉटरी ही आपल्याकडे एक मान्य़ता प्राप्त गोष्ट झाली आहे. पण आपण खोलात जाऊन विचार केला की समजा मी लॉटरीच एक रूपयाच तिकिट घेतल आणि मला एक लाख रूपयाच बक्षिस लागल, तर हा विचार पहिल्यांदा मनामध्ये येण गरजेच आहे की हे एक लाख रूपये मी कमावले आहेत का? आता जर आपण हा मुद्दा लोकांशी चर्चेला नेला, तर टिपिकली काय उत्तर मिळत? हो हे मी कमवल आहे - कस कमवल? तर एक रूपया मी इनव्हेस्ट केला आणि त्याच फळ म्हणून मला एक लाख रूपये मिळाले. ते बरोबर आहे, ही माझी कमाई आहे.
आता मला तुम्हाला अस विचारायचय की हे उत्तर तुमच्यापैकी किती जणांना पटत नाही? आणि का पटत नाही? म्हणजे मी पुष्कळांना हा प्रश्न विचारला - की तुम्ही एक रूपयाच तिकिट घेतल आणि तुम्हाला दहा हजार रूपयाच बक्षीस मिळाल ही तुमची कमाई झाली का? तर त्याच उत्तर खूप जणांनी हो सांगितल. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम हा प्रश्न विचारते की त्याच उत्तर नाही अस असेल का? मला हो, माझी कमाई अस सांगणारी खूप मंडळी भेटली आहेत. त्यामुळे तुम्हाला जर माझ्या मिशनमध्ये सामिल व्हायच असेल तर तुम्हाला सांगता आल पाहिजे की ही तुमची कमाई का नाही. आणि हो, हे लक – किंवा भाग्य पण नाहीये. हा एक स्टॅटॅस्टिकचा नियम आहे की तुम्ही फासा फेकला तर कुठलतरी दान पडेलच. हे गॅम्बलिंगच आहे. पण खेळणारे म्हणतात आम्ही गॅम्बलिंग खेळलो की नाही? म्हणजे आमची मेहनत सुद्धा झाली आहे, आम्ही आमचा सुरवातीला अडकवलेला एक रुपया ही आमची इनव्हेस्टमेंट आहे. शिवाय आम्ही आमचा वेळ अडकवला, आम्ही थोडीफार मेहनत केली. म्हणून ही कमाई आमची. जस तुम्ही करोडपतीच्या प्रश्नांना समोर बसलात तर ती तुमची मेहनत आणि तिथे बसायचय म्हणून तुम्ही घरी थोडाफार अभ्यास पण केला. म्हणजे तुम्ही थोडीफार मेहनत केली, थोडी इनव्हेस्टमेंट केली, थोडे श्रम केले, थोडा अभ्यास केला, थोडा वेळ खर्च केला. मग ही तुमची मेहनतीची कमाई नाही अस कस?
ते यासाठी की कामाच आणि मोबदल्याच प्रपोर्शन खूप व्यस्त आहे. त्यामुळे त्या कामाचा, त्या श्रमाचा, त्या इनव्हेसमेंटचा तो मोबदला नाहीये. हे जो पर्यंत आपण लक्षात घेत नाही तो पर्यंत आपण म्हणतो की ते पैसे येऊ द्यात. पण हे जेंव्हा आपल्या लक्षात येत की हा खराखुरा श्रमाचा पैसा नाही, तेंव्हा आपण म्हणतो की हा मला नको. कदाचित आपण घेऊ लॉटरीचा पैसा किंवा करोडपतीचा पैसा. पण आपल्याला जाणीव पाहिजे की हे आपल्या मेहनतीच नाहीये. ही जाणीव असेल तर मग आपण योग्य विचार करू लागतो.
आपल्याकडे ईशावाश्य उपनिषद हे आपल्या संस्कृतीतले पहिले उपनिषद आणि ह्या उपनिषदाची पहिली ओळ किंवा पहिला श्लोक अस सांगतो की जो तुमच्या मेहनतीच आहे तेवढच तुमच आहे. ते जास्तीत जास्त असाव यासाठी तुम्ही तुमची मेहनत, तुमचे श्रम, तुमची बुद्धी, तुमचे सामर्थ्य हे सगळ पणाला लावा. त्याच्यात तुम्ही कर्तव्यदक्षता बाळगा. तिथे आळस नको किंवा अदक्षता पण नको. तिथे तुम्ही दक्ष रहा आणि मेहनत करा. आणि दक्षता म्हणते काय तर ते काम कस करतात याच नेमक ज्ञान. कस करायच ही दक्षता. पण जसे हे ज्ञान तुमच्याकडे पाहिजे,, त्याप्रमाणे तुमचे हात देखील चालले पाहिजेत. दक्षता आणि श्रम हे दोन्ही वापरून जे तुम्हाला मिळेत ते तुमची संपत्ती. आणि अशी जी संपत्ती आहे तिच्याबद्दल श्री सूक्तात अस एक वर्णन आहे की ही जी माझ्या मेहनतीची संपत्ती आहे, ती माझ्याकडे वाजत गाजत, सगळ्या जगाला ओपनली सांगत, आणि हत्ती, रथ, घोडे यांच्यावर बसून म्हणजे इतक्या मोठया प्रमाणात यावी. परंतु सगळ्या जगापासून लपवून, हळूच कुठल्यातरी खिडकीतून, हळूच कुठल्या टेबलाखालून अशी येणारी संपत्ती माझ्याकडे येऊ नये. कारण तशी संपत्ती माझ्याकडे जेंव्हा येते तेंव्हा ती अलक्ष्मी असते. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर मानसशास्त्र किंवा आरोग्यशास्त्र अस सांगत, की तुमच्याकडे आलेल्या संपत्तीकडून तुम्ही जे अन्न विकत घ्याल, त्या अन्नातून तुम्हाला जे पोषण मिळेल, आणि त्या पोषणातून तुम्हाला जे बुद्धीचातुर्य मिळेल -- ते बुद्धीसामर्थ्य तुम्हाला नवीन-नवीन प्रतीभा देईल. तुमच्याकडून नवीन नवीन शोध घडवून येईल. आणि त्याबुद्धीच्या माध्यमातून, त्या ज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही परब्रह्माला पाहू शकता. पण जी तुमच्या मेहनतीची नाही अशी कमाई, अशी संपत्ती जेंव्हा तुमच्या घरात येते - त्या संपत्तीतून विकत घेतलेल किंवा त्या संपत्तीतून आदान- प्रदान करून मिळवलेल अन्न जेंव्हा तुम्ही तुमच्या घरात वापरता तेंव्हा त्या अन्नातून निर्माण झालेली तुमची बुद्धी पण तशीच भ्रष्ट होते. आणि तशी बुद्धी तुम्हांला पुढे विनाशाकडेच घेऊन जाते.
अशा प्रकारच्या तत्वज्ञानाची एक मोठीच मोठी साखळी आपल्याकडे सांगितली आहे. मग याच्यामध्ये इकॉनॉमिक्स हा विषय एक स्टॅड अलोन विषय राहत नाहिये. त्या इकॉनॉमिक्स सोबत तुमच आरोग्यशास्त्र येत, तुमची सायकॉलॉजी येते. तुमची जी प्रगती किंवा उन्नती व्हायची आहे ती त्याच्याबरोबर येते. तिथे समाजशास्त्रही येत. अस सगळ काही येत आणि ह्या सगळ्याचे उद्दिष्ट अल्टीमेटली समाजधारणेचे उद्दिष्ट असते. अशा तऱ्हेने समाजाची धारणा ह्या तत्वज्ञानामुळे होते. म्हणून ह्या तत्वज्ञानाला धर्म अस म्हणायच.
धर्म म्हणजे काय की जो समाजाला धारण करू शकेल. समाजाला कायमस्वरूपी टिकवून ठेवण्याची जी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ते म्हणजे धर्म. त्या धर्माच्या व्याख्येमध्ये ईशावाश्य उपनिषदातल हे पहिल वाक्य आहे की जर समाज तुम्हाला टिकवायचा असेल, तर त्या समाजात बिन मेहनतीचा पैसा, बिनमेहनतीची लक्ष्मी ही नेहमी बोळवण करायची अलक्ष्मी अशीच तुम्ही मानली पाहिजे. त्याला निगोशियेबल इन्सटरुमेंट अॅक्टची म्हणणे की ज्या अर्थी तो पैसा आहे त्या अर्थी तो सर्वशुद्ध आहे, अस तुम्ही मानता कामा नये. हे आपल तत्वज्ञान किंवा आपल अर्थशास्त्र म्हणू. आपण जे काही आधुनिक आर्थशास्त्र म्हणून शिकतो त्याच्यामध्ये हा फरक आहे.
आता जस मी सांगितल की बिनमेहनतीचा पैसा नको, बिनश्रमाचा पैसा नको, अप्रामाणिकपणाचा पैसा नको, तस ह्याच्याही पलीकडे जाऊन अजून एक आयडियल किंवा क्रायटेरियन आपल्या तत्वज्ञानात सांगितले ते काय? तर ज्याच्यामध्ये समाजाचे दोहन होत असत समाजाचे शोषण होत असेल, भले ही ते तुम्ही खूप मेहनतीने करत असाल, तरी ती अलक्ष्मीच आहे. म्हणजे समजा मी एक राजकीय सामर्थ्य असणारी कोणीतरी व्यक्ती आहे आणि मी खूप मेहनत केली. प्रत्येकाच्या घरी गेले, प्रत्येकाला धाक दाखवला, प्रत्येकाकडून काही खंडणी वसूली केली तर काय? मी मेहनत केली का - हो केली. सामर्थ्य वापरला का - हो. बुद्धी वापरली का, वेळ वापरला का – हो हो. पण ती होती लूट. आणि त्याच्यातून दुसऱ्या व्यक्तीचे शोषण झालेले आहे. नुसत शोषण झाल अस नाही, तर त्या व्यक्तीने तिच्या मेहनतीची म्हणून जी काही कमाई केली होती, ती माझ्यापर्यंत आली. तेंव्हा अशी जी काही शोषणाची आणि दोहनाची व्यवस्था आहे ही व्यवस्था सुद्धा अप्रामाणिक आहे.
आपल्याकडे अपरिग्रह नावाचा अजून एक शब्द आहे. ज्याला समाजधारणेत आपल काही तरी कनट्रिब्युशन असाव, समाजाचा धर्म टिकविण्यासाठी माझ काही तरी योगदान असाव अस वाटत असेल त्यांनी अपरिग्रह करावा. आपल्या सामान्य गरजेपेक्षा जास्ती मला हे पण हवय, हे पण हवय ही हाव त्यांनी ठेवू नये. मग आता आपण साडयांचच उदाहरण घेऊया. आपल्याकडे प्रत्येकीकडे अगदी छान कपाटात रचून ठेवलेल्या आणि सणासुदीला काढायच्या पन्नास साडया असतील. मी म्हणेन ते ही ठीक आहे, अजूनही तुम्ही अपरिग्रहाचा सिद्धांन्त नाही मोडला. पण मी ज्यावेळेला टिव्हीवर बघितल की जयललीताच्या घरातून पाच हजार साडया निघाल्या आणि तरी अजून तिच्या कपाटांची उपसणी चालूच आहे - ती रिकामी होतच नाहीये तेंव्हा मला अपरिग्रह या शब्दाचा अर्थ लक्षात आला. तिने हे करायला नको होत अस वाटल. तिने अपरिग्रहाचे तत्वज्ञान शिकलेले नाही हे मला इथे दिसून येत. अपरिग्रह का याचं अजून एक छोट उदाहरण सांगते. आपल्याकडे एक खनन माफिया आहे. खनन माफिया म्हणजे जी काही प्राकृतिक संपदा आहे ती लुटा. वाळू असेल तर वाळू उपसा, डोंगर आहे तर डोंगर कापत चला, अशा प्रकारचे जे उद्योग करतात त्यांना खनन माफिया अस नाव आहे. असाच एक खनन माफिया आहे जो डोंगर कापतो, वाळू उपसतो. कशासाठी तर म्हणे, मला माझा एक रिझोर्ट बांधायचा आहे. माझा स्वतःचा. बर ठीक आहे. एक रिझोर्ट बांधला मग आता दुसरा बांधायला घेतला, मग तिसरा बांधला असे आज त्यांचे जवळ- जवळ पंधरा- सोळा रिझोर्ट आहेत. आणि त्यांचे जवळ जवळ एकशे वीस क्रशर्स चोवीस तास पुणे ते कोल्हापूर ह्या महामार्गावरचे डोंगर कापत आहेत. म्हणजे हे तुम्हाला एक उदाहरण सांगितले. तो माणूस काही आज वीस रूपे धारण करून त्याच्या प्रत्येक रिझोर्टमध्ये नाही राहू शकत. झोपतो तेंव्हा एकाच पलंगावर एकाच खोलीत झोपणार. एका वेळेला वीस रिझॉर्ट मध्ये नाही राहात. पण ह्याला हाव अस म्हणतात. तर हे जे काही प्रकृती-दोहन आहे हे देखील समाजधारणेला अनुकूल नाही प्रतिकूल आहे. कारण डोंगर नसतील तर त्या भागातील पाऊसमान कमी होऊन काही वर्षांनी तिकडे अवर्षणाची वेळ येईल. लाखों वर्षांपासून उभे असलेले डोंगर कापायला ४०-५० वर्षच पुरतील आणि तेवढी हाव अशा व्यक्तींची नक्की आहे. पण आपण याला अलक्ष्मी म्हणून ओळखू शकलेलो नाही. म्हणून अश्या तऱ्हेचे दोहन करणारी जी काही व्यवस्था असेल ती देखील अप्रमाणिकच. कुणी म्हणेल - त्यातून संपत्ती जनरेट होते का तर येस होते. हॉरवर्डने ज्याला संपत्ती अस नाव दिलेले आहे ती संपत्ती जनरेट होतेय. त्या व्यक्तीचा बँक बॉलन्स दरवर्षी दुपटीने वाढत जात असतो. आज दोन हजार रूपये तर उद्या चार हजार रूपये परवा आठ हजार रूपये मग सोळा हजार. तुम्ही बिरबलाची गोष्ट ऐकली आहे की एका बुद्धिबळाच्या पटावरील चौसष्ठ खणांमधे मला गव्हाचे दाणे द्या. पहिल्या खणात मला एकच गव्हाचा दाणा पाहिजे, पण पुढल्या प्रत्येक खणात मागच्या पेक्षा गव्हाचे दाणे दुप्पट करा. आणि चौसष्ठ घरांमध्ये जेवढे गव्हाचे दाणे बसतील तेवढे दाणे मला द्या अस त्यानी अकबराला सांगितल्यानंतर तेंव्हा तो तेराव्या दाण्यापर्यंत पोचला तेंव्हा अकबराचा अकाउटंट घाबरला. त्याने अकबराला सांगितले की ह्या क्षणी तुझे वचन मागे नाही घेतलस तर सगळ राज्य बिरबलाला द्याव लागेल. तशीच ही गोष्ट. ही मंडळी साधारण चौसष्ठ घरापर्यंत त्यांचा बँक बॅलन्स दाम दुपटीने दररोज वाढायला पाहिजे अशा मनस्थितीची आहेत आणि हारवर्डच्या व्याख्येप्रमाणे ते सगळे योग्य प्रकारे संपत्ती कमावत आहेत. पण म्हणून आपणही तीच व्याख्या स्वीकारायची की लक्ष्मी आणि अलक्ष्मी असा भेद करून अलक्ष्मीला बोळवायच?
पुन्हा एकदा बघूया, प्रामाणिक धन त्या प्रामाणिक धनामध्ये काय - काय बसत नाही. जे मी दुसऱ्यांच चोरल, दुसऱ्यांची लूट केली ते तर बसत नाहीच पण जे माझच होत किंवा माझ्या वाडवडिलांकडून जे मला मिळाल होत तिथेही अपरिग्रह नाही दाखवला तर ती अलक्ष्मीच. समजा माझ्या वाडवडिलांचा शंभर एकराचा सागवानाचा एक मोठा भूखंड असेल आणि मी म्हटल की मी तो रोज कापत जाते म्हणजे मला प्रत्येक सागवानाच्या झाडातून एवढे पैसे मिळतील, तर बाहेरचा माणुस मला अडवू नाही शकत कारण माझ्या वाडवडिलांकडून मला ते वारसा हक्काने मिळाले आहे. पण जेंव्हा मी अपरिग्रह हा शब्द वापरते, प्रामाणिक धनाच्या डेफिनेशन मध्ये जेंव्हा मी अपरिग्रह हा कनसेप्ट वापरते तेंव्हा तीही हावच म्हणजे अलक्ष्मी आहे हे मला समजते. तर अशी ही लक्ष्मी आणि अलक्षल्मीची व्याख्या. भारतीय तत्वज्ञानात त्या व्याख्येचा संबंध कशा-कशाशी जोडलाय? तर आपल अन्न, आपल आरोग्य, त्या आरोग्यातून मिळणारे सामर्थ्य, त्या आरोग्यातून मिळणारे ज्ञान, त्यातून मिळणारी प्रतिभा, आणि त्या प्रतिभेतून आणि त्या ज्ञानातून मिळणारी सांसारिक समृद्धि तसेच परमतत्वाचा बोध हे सगळ लक्ष्मीमुळे निर्माण होत आणि अलक्ष्मीमुळे दुरावत अस हे आपल तत्वज्ञान आहे.
----------------------------------------xxxxxxxxxxxxxxxxxxxxx------------------------------------
Comments