रवि पटवर्धन नाट्यकलाकार

रवी पटवर्धन

‘‘माझा मेंदू सोडून माझ्या सगळ्या अवयवांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या वयात मृत्यू अटळ आहे. पण औषधं, तपासण्या, व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक दृष्टिकोन याच्या जोरावर मृत्यूला लांब उभं राहायला भाग पाडायचं ही माझी जिद्द आहे. त्याच जोरावर आज वयाच्या ८२ व्या वर्षी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक मर्यादांचाच पुरेपूर उपयोग करत ‘आरण्यक’ नाटकाद्वारे मी रंगभूमीवर ठामपणे उभा आहे. ’’

१९४४ चा नाटय़महोत्सव. त्याचे अध्यक्ष होते बालगंधर्व तर स्वागताध्यक्ष होते आचार्य अत्रे. त्या नाटय़महोत्सवातल्या बालनाटय़ात अवघ्या साडेसहा वर्षांच्या एका बालकलाकाराच्या चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लागला. तो बालकलाकार मी- रवी पटवर्धन! तेव्हा मला स्वत:लाही जाणीव नव्हती की आपण किती मोठय़ा दिग्गज कलाकारांसमोर अभिनय करतोय. पण आज मला वाटतं, साक्षात बालगंधर्वाचा आशीर्वाद मला नकळत मिळून गेला. ते पाथेय घेऊन गेली ७५ वर्षे मी रंगभूमीवर कार्यरत आहे. आजही वयाच्या ८२ व्या वर्षी मी ‘आरण्यक’नाटक करतोय.

हे नाटक पहिल्यांदा मी १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबरच केलं होतं. २०१८ मध्ये त्यांनी मला पुन्हा विचारलं, तेव्हा मी तत्काळ होकार दिला आणि वयाच्या ८२ व्या वर्षी हे आव्हान स्वीकारलं. मला अजूनही रंगभूमीची इतकी ओढ आहे, की माझ्या मनात वय, व्याधींचा विचार क्षणभरसुद्धा आला नाही. माझ्या पायांवर ‘व्हेरीकोज व्हेन्स’ची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे या नाटकात मी एवढा वेळ उभा राहू शकेन का, असा घरच्यांना प्रश्न पडला. पण झालं उलटंच! नाटकातल्या हालचालींमुळे माझ्या रोजच्या शारीरिक हालचाली सुधारल्या. मी नुसता घरात बसून राहिलो असतो तर हे शक्यच नव्हतं. आजही त्या नाटकाचे मी दिवसाला २ प्रयोग करू शकतो. मी नेहमीच सकारात्मक विचार करतो.

वाढत्या वयानुसार येणाऱ्या कमतरतांचा ‘पॉझिटिव्ह पॉइन्टस्’ म्हणून कसा उपयोग करायचा हे आपलं आपण ठरवायचं असतं. आज वृद्धत्वामुळे माझी गात्रं थरथरतात. माझ्या डाव्या हाताला किंचित कंप आलाय. पण मी तो वाढवून त्याचा धृतराष्ट्राच्या भूमिकेसाठी चपखल वापर करतो. ‘आरण्यक’मधील धृतराष्ट्र वयाच्या शंभरीजवळ पोहोचला आहे. छत्तिसाव्या वर्षी शंभरीच्या धृतराष्ट्राचा अभिनय करताना त्यात नाटकीपणा अधिक होता. आज ८२ व्या वर्षी वयाने मी धृतराष्ट्राच्या वयाच्या जवळ आलोय. त्यामुळे अभिनयात सहजता तर आलीच, शिवाय या भूमिकेतील भावनिक आणि शारीरिक बारीकसारीक कंगोऱ्यांवर मला आता उत्तम प्रकारे काम करता येतं. वय वाढल्याने आज जाणिवा तीव्र झाल्या आहेत. नाटकाचा तपशील आणि गाभा तोच असला तरी आज मजजवळ अनुभवांची शिदोरी आहे. जाणिवा प्रगल्भ झाल्या आहेत. त्यामुळे कलाकृती तीच. माझी भूमिका तीच. पण आज प्रयोग करताना मी माझ्या भूमिका वेगळ्या प्रकारे विकसित करतो.

या भूमिकेला सकारात्मक-नकारात्मक अशा रंगछटा आहेत. मला जाणवतंय की पूर्वी मी संवादातील शब्द बोलत असे. आज वयाच्या प्रगल्भतेमुळे मी त्या शब्दांमधील बारकावे प्रेक्षकांपर्यंत अधिक उत्कटतेने पोहोचवतो. शब्दांचे अर्थ, संवाद, अभिनय देहबोलीतून प्रेक्षकांपर्यंत ताकदीने पोहोचवतो आणि जेव्हा नाटक संपल्यावर प्रेक्षक मला आवर्जून भेटतात आणि या वयातल्या माझ्या उर्जेचं कौतुक करतात तेव्हा माझा हा प्रयत्न त्यांच्यापर्यंत अचूक पोहोचतो याचं मला समाधान वाटतं. वयपरत्वे येणारा मोठा धोका विस्मरणाचा! मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काही वर्षांपूर्वी मी शाम मानव यांच्याकडे स्वसंमोहन शास्त्र शिकलो. या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला. या शास्त्राचा वापर करून मी माझ्या अनेक व्याधींवर मात केली. शिवाय आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती आणि व्याधिग्रस्तांवरही मी या उपचारपद्धतीचा वापर केला. त्याचा त्यांना खूप फायदा झाला.

‘आरण्यक’ नाटक करताना या तंत्राचा वापर मी करतोच. शिवाय दोन प्रयोगांमध्ये चार-पाच दिवसांचं अंतर असेल, तर मी पूर्ण नाटक ‘रिवाइज’ करतो. त्यामुळे संवादांचा सराव होतोच. त्याचबरोबर अभिनयातली सूक्ष्म बारकावे हुडकण्याची प्रक्रियाही आपोआप होते. हा एकप्रकारे रियाझच असतो. असे प्रयोग केल्यावर मी नाटकातल्या तरुण कलाकारांशी विचारविमर्श करतो. ते जेव्हा म्हणतात, ‘ही जागा तुम्ही चांगली घेतलीत.’ तेव्हा माझं समाधान होतं. या तरुण कलाकारांमध्ये अभ्यास आणि अवलोकन यातून चांगली जाण आलीय. त्यांचं मत माझ्यासाठी फार मोलाचं असतं.

माझा आवाज हा माझा मोठ्ठा ‘अ‍ॅसेट’ आहे. तो मी खूप सांभाळतो. जुनं ‘आरण्यक’ नाटक पाहिलेले प्रेक्षक जेव्हा नव्याने ते नाटक बघतात तेव्हा म्हणतात, ‘तुमचा आवाज आजही तसाच दमदार आहे.’ काही काही वाक्यातला भाव प्रभावी होण्यासाठी पल्लेदार वाक्य फेकण्यासाठी ती एका दमात बोलावी लागतात. त्यासाठी दमसास टिकवावा लागतो. म्हणून मी आवर्जून प्राणायाम करतो. अशोक रानडेंकडे मी ‘व्हॉईस कल्चर’चं प्रशिक्षण घेतलं होतं. त्या तंत्राचाही मी वापर करतो.

आणखी एक फायदा मला झाला, वृद्धत्वामुळे माझ्या हालचाली काहीशा मंद झाल्या आहेत. धृतराष्ट्र अंध असल्याने उलट चाचपडण्याचं बेअरिंग घेणं त्यामुळे मला अधिक सोपं गेलं. एकूण काय माझ्या सर्व शारीरिक मर्यादांचा मी या नाटकांत पुरेपूर वापर केला आहे. या माझ्या प्रयोगाला जेव्हा प्रेक्षकांच्या पसंतीची दाद मिळते, तेव्हा कळतं की ही प्रगल्भता आपल्यात वयाने आणि अनुभवाने आली आहे.

अर्थात हे एका रात्रीत घडत नाही. त्यासाठी शारीरिक आणि मानसिक पातळीवर जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत. आहार-विहाराकडे लक्ष पुरवावं लागतं. वास्तविक या क्षेत्रातली अनियमितता, जागरणं, अवेळी खाणंपिणं, व्यसनं यामुळे शारीरिक तंदुरुस्तीवर विपरीत परिणाम होतो. होऊ शकतो. मी त्यावर मात केली, त्याला पहिलं कारण आनुवंशिकता! माझी आई नव्वदीपर्यंत ठणठणीत होती. नऊवारी नेसून बुलेटवर माझ्या मागे बसून बिनधास्त फिरायची. तरुणपणी ती घोडेस्वारीसुद्धा करायची. तिची व्यायामाची आवड माझ्यातही उतरली. मी रोज घराजवळच्या कचराळी तलावावर तासभर फिरतो. आपलं हृदय ठीक तर आपण ठीक! त्यामुळे रोजचा फिरण्याचा व्यायाम मी चुकवत नाही. अगदी दौऱ्यावर गेलो तरीही! अलीकडे ‘शिवपुत्र संभाजी’ या नाटकाचा मराठवाडय़ात दौरा होता. या नाटकात अमोल कोल्हे संभाजी आहे तर मी औरंगजेब! हे नाटक मैदानावर होतं. त्यात दोनशेच्या वर कलाकार आहेत. त्यावेळी ऐन उन्हाळ्यातही मी वॉकला जात असे, अगदी भल्या पहाटे! दौऱ्यावरही माझा आहार अत्यंत संतुलित असतो.

मध्यंतरीच्या काळात इच्छा आणि क्षमता असूनही माझ्याकडे कामं येत नव्हती. दीडशे नाटकं आणि दोनशे चित्रपटांचा अनुभव गाठीशी असूनही कोणीही माझ्याकडे फिरकत नव्हतं. भिडस्त आणि संकोची स्वभावामुळे मी कोणाकडे काम मागायला जात नव्हतो. पण तरीही मी कधीही नाउमेद झालो नाही. त्या रिकाम्या वेळात मी संस्कृत आणि उर्दू भाषेचा अभ्यास सुरू केला. वयाच्या ऐंशीव्या वर्षी भगवद्गीतेचे ७०० श्लोक पाठ करून शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसलो. त्या परीक्षेच्यावेळी मी खूप आजारी होतो. तरीही मी शृंगेरीला गेलो. श्रीमद्शंकराचार्यानी संस्कृतमध्ये माझी परीक्षा घेतली. त्यात मी पहिला आलो. त्यांनी मला वय विचारलं. वयाच्या ऐंशीव्या वर्षी माझं पाठांतराचं कौशल्य पाहून ते चकित झाले. पण यात माझा काहीच मोठेपणा नाही. वय कितीही असो, कामावर निष्ठा असेल तर माणूस कोणत्याही अडचणींवर सहज मात करू शकतो.

मला नेहमी वाटतं, वयाचा विचार न करता माणसाने कायम एक ध्येय निश्चित करावं. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. त्यामुळे मन सबळ होतं. सबळ मनाला आपोआप वेगवेगळे उपाय सुचत जातात आणि आपल्याला शेवटी यश मिळतंच. मात्र त्यासाठी आपल्या वय आणि व्याधींचा बाऊ न करता सतत आपल्या आवडीचं काम करत राहिलं पाहिजे. त्यामुळे शरीर कार्यक्षम राहात आणि मेंदू तल्लख रहातो.

या क्षेत्रांत अनेक वेळा काम न मिळाल्याने कलाकारांना वैफल्य येतं. अशा वेळी आपण आपला स्तर बदलवायचा. तडजोड करायची आणि येणाऱ्या काळाशी आणि परिस्थितीशी जुळवून घ्यायचं. १९९८ मध्ये मी शेवटची मोठी भूमिका ‘तक्षक’ चित्रपटात केली. त्यानंतर छोटय़ा मोठय़ा भूमिकांसाठी मला बोलवण्यात आलं. अलीकडे मी जोतिबा फुले यांच्या चरित्रपटात काम केलं. पैसा वा भूमिका कशाही मिळो मी त्यात आनंदाने काम करतो. नुकताच माझ्याबरोबर सतार शिकणारा एकजण मला भेटला. तो आज अमेरिकेत कार्यक्रम करतो. पण हे ऐकून मला वैषम्य वाटलं नाही. कारण मी संगीताचे कार्यक्रम करत नसलो तरी संगीताचा आस्वाद घेऊ शकतो. ‘तेजाब’ चित्रपटाला ३५ वर्षे झाली आहेत आणि त्यात मी अवघे दोन सीन्स केलेत. पण आजही रिक्षात बसलो आणि रिक्षावाल्याने मला ओळखलं की तो त्या चित्रपटातले संवाद म्हणून दाखवतो तेव्हा मला खूप बरं वाटतं.

मी नेहमी गमतीने म्हणतो, माझा मेंदू सोडून माझ्या सगळ्या अवयवांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. पण तरीही मी ठाम उभा आहे. या वयात मृत्यू अटळ आहे. पण औषधं, तपासण्या, व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक दृष्टिकोन याच्या जोरावर मृत्यूला लांब उभं राहायला भाग पाडायचं ही माझी जिद्द आहे. माझा देवावर नव्हे, नियतीवर विश्वास आहे. सत्कर्मावर विश्वास आहे. ‘पेराल ते उगवतं’ या सिद्धांतावर माझी नितांत श्रद्धा आहे.

– शब्दांकन : माधुरी ताम्हणे

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

एक शहर मेले त्याची गोष्ट

उद्धव गीता भाग १ -- भांडारकर व्याख्यान दि. १२ जून २०१९