शिव आणि राम - आराध्य म्हणूया की मायथोलॉजिकल वॉरियर


शिव आणि राम - आराध्य म्हणूया की मायथोलॉजिकल वॉरियर
भारतीय वाङ्मयात एक चुकीचा शब्द शिरला आहे - मायथोलॉजी, मिथक ज्याचा इंग्रजी शब्दकोषातील अर्थ मिथ्या या शब्दाच्या अगदी जवळपास पोचतो. आणि हा शब्द भारतीय इतिहासासाठी धडाक्याने वापरण्याची एक प्रणालीही स्वातंत्र्योत्तर काळांत अस्तित्वात आली होतीच. भारतीय प्राचीन इतिहास कपोलकल्पित आहे असे सांगणारे दोन प्रदीर्घ वर्षांचे कोर्सही आपल्या विद्यापीठांमधून आधी इण्डोलॉजी व अलीकडे मायथॉलॉजी या नावाने सुरू झालेले होते. पण त्यामधे सामान्य माणूस गुंतून पडलेला नव्हता. त्याला अजूनही उपासनेसाठी राम, शिव, ही सगुण प्रतीके आवडत होती व त्यांच्या प्राचीन अस्तित्वाच्या इतिहासात्मक सत्यतेबाबतही सामान्यजन निःशंक होता.
आता मात्र क्रॅश कोर्सेसच्या माध्यमातून भारतीय मिथ्या वाङ्मय ही परिकल्पना जनामनात रुजविण्याचे काम सर्व विद्यापीठांनी सुरू केले आहे. क्रॅश कोर्स हे हल्ली झटपट पैसे मिळवण्याचे माध्यम झाल्यामुळे विद्यापीठाबाहेरील संस्था देखील हा मार्ग चोखाळत आहेत. त्यांना इंडियन मायथोलॉजी ही सोन्याची खाणच सापडली आहे असं म्हणता येईल. आता त्यांनी रुद्र, हनुमान, इत्यादींना मिथिकल चरित्ररूपाने शिकविण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या उपासना-आधारित संस्कृतिला हे मोठे आव्हान असून भारतीय संस्कृति हा प्रहार झेलू किंवा थोपवू शकेल का असा प्रश्न उद्भवतो. तीच चर्चा इथे प्रस्तुत आहे.
जगातील सर्व संस्कृतींच्या मूलभूत संकल्पनांवर नजर टाकली तर असे दिसते कि निर्गुणाची उपासना आणि सगुणाची प्रीती या दोन गोष्टी सगळ्याच संस्कृतींमधे होत्या. या सगुण प्रीतीत थोडी श्रद्धा होती, थोडा भितीयुक्त आदर होता आणि मोठ्या प्रमाणात कल्पनाविलास होता. सगुण प्रतीकांमधे सूर्य, चंद्र, वर्षा, मेघ, वीज, सागर, नाग ही बहुमान्य प्रतीके होती. सगुण प्रतीकांचे वैशिष्ट्य असे असते की जरी ती वस्तूंची प्रतीके असली तरी कल्पनेने त्यांना मानवी रूप दिले जाते. जे कोणी श्रद्धाळू असतील ते नवस बोलतात आणि आपल्या प्रतीकांच्या दैवी गुणांमुळे लाभ होण्याची आशाही बाळगतात.
सगुणाची केवळ प्रीती करणाऱ्या सभ्यतांमधे निर्गुण परब्रह्माची प्राप्ति असंभवनीय आहे कारण त्याची वाटचाल त्यांच्यापैकी कोणीही जाणत नाही. ज्या निव्वळ निर्गुण उपासक सभ्यता आहेत तिथे देखील मर्यादित उद्दिष्ट आहे – ईश्वराचा कृपाप्रसाद मिळवणे जेणेकरून मानवी जीवन सुखापूर्वक व्यतीत होईल. या सर्वांपेक्षा भारतीय संस्कृतिमधे जन्मलेल्या सर्वच पंथ आणि परंपरांचे एक खास व समान वैशिष्ट्य आहे जे त्यांना जगातील इतर धर्म आणि पंधांपेक्षा वेगळे ठरवते. मनुष्य आपल्या उपासनेतून परब्रह्माची प्राप्ति करून घेऊ शकतो हे भारतीय तत्वज्ञान आहे. अहं ब्रह्मास्मि, प्रज्ञानं ब्रह्मः किंवा तत् त्वमसि यासारखी वचने सांगतात की मी ब्रह्म आहे, तूही ब्रह्मच आहेस. अनुभूतिजन्य ज्ञानाने ब्रह्माची प्राप्ति होते. तपश्चर्येतून ज्ञान मिळते, उपासनायुक्त तपातून अनुभूति, ज्ञान आणि परतत्वाची प्राप्ति होते. हे बृहद्दर्शन केवळ भारतीय संस्कृतीतच पहायला मिळते.
आणि हे ब्रह्म हे परतत्व कसे आहे तर सर्वज्ञ, शुध्द, अपापविद्ध असे आहे. अविद्या आणि विद्या- दोहोंचा एकत्रित अभ्यास करून मनुष्य मृत्युची दिव्य अनुभूति घेत पुढील मार्गक्रमण करत अमृताची गोडी चाखतो. अशा प्रकारे ईशावास्य उपनिषद् असो, पातञ्जल योगसूत्र असो, कठोपनिद् नाहीतर भगवद्गीता असो, सर्वांच्या मते माणसाला निःसंशयपणे परतत्त्वापर्यंत पोचून आपरिमित ज्ञान मिळवता येते, आणि त्यासाठी साधने ही ही आहेत. त्यामधे सगुण उपासना हे ही साधन आहे.
रूद्र, लघुरूद्र, महारूद्र, महामृत्युंजयजप, आदियोगी तपस्यारत शिव, शिवाचीतपस्या करणारा कृष्ण आणि कलियुगाला हरि ॐ तत्सत् हा एकच मंत्र आहे असे सांगणारा शिव, त्या दोघांचे ऐक्य सांगणारे भागवत, बमबम भोलेच्या घोषणेत गंगोत्री ते रामेश्वर गंगाजल घेऊन जाणारे कांवडिये, बारा ज्योतिर्लिंगात सुप्रतिष्ठ शिव.
बालपणात मनःपटलावर कोरलेली ही सारी सगुण प्रतीके तरूणपणातून ते सिनियर सिटिझनचे बिरुद येईपर्यंत माझ्या मनातून कधी पुसली गेली नाहीत. शक्तिपीठे, गणेशपीठे, भगवती जागरणात देवीची भक्ति, हनुमान भक्तिमध्ये बलोपासना इत्यादि संकल्पना कधी अगम्य नाही वाटल्या. माझ्या जन्मगांवी धरणगांवला चिंतामणी मोरया नावाचे जागृत देवस्थान आहे आणि संकट निवारणसाठी हजारो लोक तिथे नवस बोलायला व फेडायला येतात. आई होती तोपर्यंत आम्ही भावंडे आपल्या छोट्या-मोठ्या अडचणी सांगून तिला गळ घालायचो, की ती लगेच पाच शनिवारचे उपास बोलायची आणि आमची अडचण हमखास निवृत्त व्हायची. मग आम्ही तिला म्हणायचो - संकट मिटे सब पीरा, जो सुमिरै हनुमत बल वीरा .......
घरामध्ये वैष्णव परंपरा होती. आजोबा, वडील आणि मी स्वतः श्रीकृष्ण भक्त होतो. उपासनेचे फळ मिळतेच हा मी प्रत्येक वेळा अनुभव घेतला आहे. वडील नियमित ध्यान करत. मी स्वतः अत्यल्प प्रमाणात का होईना, उपासना केलेली आहे. उपासना कशी करावी याचे क्रमबद्ध विधान असते आणि या कृती शिकत पुढे जाता येते एवढे पुस्तकी ज्ञानही मला आहे.
ज्या प्रकारे परब्रह्म उपास्य आहे आणि चिन्तनीय आहे त्याचप्रमाणे समाजधारणा देखील उपास्य आणि चिन्तनीय आहे कारण समाजधारणा करणारा तो धर्म अशाच प्रकारे धर्माची व्याख्या सांगितली आहे.
भारतीय संस्कृतीचे महावाक्य आहे --
परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्याम युगे युगे।
इथे आपण सगुण-उपासना आणि सगुणप्रीती यातील अंतर समजून घेतले पाहिजे. एकमेव भारतयांचीच संस्कृति सांगते की सगुण ईश्वर हा प्रीतीइतकाच साधनेचाही विषय आहे. सगुणप्रीतीमधे कल्पनाविलास महत्वाचा आहे तर सगुण उपासना ही निर्गुण प्राप्तिच्या मार्गातील ज्ञानसोपान आहे. म्हणूनच वेद-उपनिषदांमधे सगुण प्रतीकांचेही मंत्र आहेत, मंत्रजापाचे विधान आहे. एक गायत्रीसारखा मंत्र घेतला तर तिच्या जापाने विश्वामित्रामधे प्रतिसृष्टि निर्माण करण्याचे सामर्थ्य येते. याचीच चर्चा, पतञ्जली करतात, आपली नुण्डकादि उपनिषदे करतात. पण हा फरक इंग्रजी शासकांना किंवा आपल्या आधुनिक इतिहासकारांना कळला नाही. मला शंका आहे की कदाचित आपल्या वर्तमान धर्मावलंबियांना देखील हा फरक कळलेला नाही. जप-जाप्य, यज्ञ, अनुष्ठान आदिमधे त्यांना गति नक्कीच आहे पण आमची सगुण उपासना ही ज्ञानमार्गाचे सोपान असल्याने सगुण प्रतीके मिथ्या किंवा मिथक नाहीत असे तेही ठाम आत्मिश्वासपूर्वक म्हणतांना दिसत नाहीत.
भारतियांच्या संस्कारात मुरलेला प्राकृतिक प्रतीकांचा समादर आणि त्यांची मानवी रूपे ही केवळ कल्पनाविलास नाहीत. आपले त्यांचे नाते आहे. ते आपल्या सामाजिक जीवनात भागीदार आहेत. याचमुळे भारतात सगुणप्रतीकांची रेलचेल आहे. गंगा, नर्मदा, गंडकी सारख्या नद्या शिव आणि विष्णुच्या माध्यमातून निर्गुण साधनेची प्रतीके आहेत. साक्षात मृत्यूची देवता यम ही नचिकेताला परब्रह्माचे ज्ञान देतो. जगातील इतर कोणत्याही संस्कृतीत प्रज्ञानं ब्रह्मः किंवा अहं ब्रह्मास्मि सारखे वाक्य ऐकायला मिळणार नाही कारण साधनेच्या वा कोणत्याही मार्गाने परमेश्वरात्मक सर्वज्ञता मिळू शकते हे तत्वज्ञान त्यांच्या कल्पनेपलीकडील आहे. एकेकाळी अति विकसित असलेल्या इजिप्शियन किंवा ग्रीक संस्कृतीतही साधना आणि परब्रहाम सारख्या संकल्पना आढळून येत नाहीत.
ज्ञान आणि मोक्ष यांच्या प्राप्तिनंतर साधकाचे समाजकार्य सुरू होते. राजपुत्र सिध्दार्थ गौतमाला जेंव्हा बोधिप्राप्ति होते तेंव्हा सारनाथमध्ये जो उपदेश दिला जातो त्याचे उद्दिष्ट असते -- बहुजन हिताय बहुजन सुखाय. महाराष्ट्राचे संत शिरोमणि तुकाराम म्हणतात - आता उरलो उपकारापुरता - आता विठ्ठलाची प्राप्ति झाली आहे तर आता समाजाच्या उपकारासाठी उरलो आहे. अवधूत दत्तात्रेय सगळ्या प्रकारे सिद्धि मिळवल्यानंतर समाज प्रबोधनासाठी अविरत विचरण करतात. संपूर्ण संन्यास परंपरा समाजाच्या समुपदेशासाठी बनली आहे व अशा संन्यासांच्या जीवितार्थ अन्नव्यवस्थेची जबाबदारी गृहस्थाश्रमात असणाऱ्यांवर टाकली आहे अशाप्रकारची प्रश्नोत्तरे महाभारतातील यक्षप्रश्नाच्या प्रसंगात आहेत.
या एकूण उपासनेमधे ज्या परब्रह्माला मिळवण्यासाठी साधना करायची ते निर्गुण आणि निराकार तर आहे पण त्याचा सगुण रूपातील आविष्कारही प्रमाण आहे. भक्तीमार्गावर जाणाऱ्या सामान्यजनांसाठी निर्गुण उपासनेऐवजी सगुण उपासना देखील तेवढीच फलदायिनी सांगितली आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीचे दुसरे वैशिष्ट्य असे आहे कि यामध्ये साधनेसाठी क्रियाेचा क्रम सांगतला आहे व एकेक क्रिया करता करता मनुष्य क्रमशः परब्रह्माच्या जवळ जात असतो. कोण किती दूरवर पोहोचणार ते त्याच्या साधनेवर अवलंबून आहे. वेगवेगळ्या टप्प्यांप्रत ही साधना पोहोचवते. आरंभिक साधनेत सगुणाचे महत्व आहे पण तीच सगुण उपासना साधकाला निर्गुणापर्यत पोहचवते. संतांनी वर्णन केले आहे कि तिथे पोचल्यावर सगुण – निर्गुण हा भेदच शिल्लक रहात नाही. याच कारणाने जशी निर्गुणाची तशीच सगुण उपास्यांची देखील आराधना केली जाऊ शकते, केली जाते..
अशा आराधनेचे फळ समाजाच्या धारणेसाठी कामी येणाऱ्या महाज्ञानाची प्राप्तिरूपाने मिळते. अन्यथा तोच शिव ज्याच्या प्रसन्नतेसाठी तपस्या करणाऱ्यांपैकी महातपस्वी नावे आहेत भस्मासुर आणि रावणाची. या भस्मासुराला वरदानाच्या सामर्थ्यातून सृष्टीला भस्म करण्याची इच्छा आहे तर रावणसारखा महाज्ञानी आणि अद्भुत असे शिवतांडव स्तोत्र रचणारा तपस्वी समाजासाठी नव्हे तर स्वतःसाठी शिवाच्या कैलास महापर्वताला उचलूूूून लंकेला घेऊन जाण्याची इच्छा धरतो. अशी फलेच्छा बाळगणारे अन्ततः धर्मरक्षणाला उपयोगी रहात नसून उलट त्याच हेतुसाठी वध्य ठरतात. पंरतु जे ज्ञानप्रसारासाठी संसारात वावरतात ते समाजधारणा करणारे ऋषी असतात. ते द्रष्टा होऊन जातात आणि ज्ञानभंडाराचे मूर्तरूप जे वेद ते ही स्वयमेव त्यांच्यासमोर प्रकट होतात.
सारांश काय तर हिदूसकट भारतात उगम पावलेल्या सर्व धर्म वा पंथांची तीन वैशिष्ट्ये आहेत ज्यांना आपण केवळ भारताचीच संस्कृती असे म्हणू शकतो. जगातील इतर धर्म वा पंथांमध्ये ती नाहीत.
  • मनुष्याला उपासनेतून परमात्म्याची प्राप्ति होऊ शकते. त्याकरिता ठराविक विधि आहेत आणि उपास्य देवताही आहेत.
  • या उपासनेमध्ये निसर्गाचे मोठे महत्व आहे. निसर्गसुद्धा उपास्य आहे, तसेच सूर्यं, चंद्र, हिमालय, गंगा, वृक्ष, पर्जन्य, समुद्र, इत्यादि उपास्य आहेत, आदरणीय आहेत.
  • उपासनेमुळे ज्ञानप्राप्ति होते व ते ज्ञान समाजामध्ये प्रसारित केल्याने त्यांतून समाज धारणा व उत्कर्ष साध्य केले जातात.
एक चौथी विशेषता म्हणजे ज्ञानसाधना आणि ईश्वरप्रणिधानात निमग्न राहणाऱ्या ऋषिंचे पालनपोषण गृहस्थ धर्मी व्यक्तींनी करायचे. या हेतुने एकीकडे दानाची महत्ता सांगितली आहे तर दुसरीकडे अशा ऋषिंसाठी अपरिग्रहाचे विधान आहे.
सहस्रों वर्षापूर्वी या भारतीय संस्कृतीची प्रतिध्वनी जगातील इतर संस्कृतींमधे झिरपलेली होती. या तत्वज्ञानाने प्रभावित झालेल्या ग्रीक इत्यादी संस्कृतींनी हे पूर्ण तत्त्वदर्शन नाही ओळखल तरी निसर्गपूजनेचे सूत्र अंत्यतिक भावनेने आपलस केलं. अशा प्रकारे ग्रीकांच्या साहित्यामध्ये सूूर्य, चंद्र, वरूण, पृथ्वी, वीज, पर्जन्य इत्यादि चरित्रनायक आहेत. तथापि निसर्ग पूजेच्यापुढे जात उपासना व त्यातून ज्ञानसाधना हा पायरी पायरीने करण्याचा प्रवास ग्रीकांनी नाही केला.
यूरोपीय देशाचे व ग्रीकांचे संबंध होते. त्यातूच ग्रीको-रोमन भाषा उदय पावल्या. ग्रीकांमधे सगुणप्रीती होती आणि त्या प्रतीकांबाबत कल्पनाविलासाने त्यांनी काव्य, नाटके, कथा असे सुंदर साहित्य रचले.त्याचीच पुनरावृत्ति आज आपण हॅरी पॉटर, स्टार वॉर्स, हॉबिट इत्यादि कथानकांमधे पहातो. स्वतः ग्रीकांनीच त्यांच्या साहित्याला मायथॉलॉजी a collection of Myths असे म्हटले आहे.
ग्रीक व रोमनांची युद्धे होत राहिली. कालांतराने ईपू ३०० ते ईपू १०० या काळात ग्रीकांचे सतत वैरी जे रोमन त्यांनी ग्रीकांवर संपूर्ण विजय मिळवला. पुढे जसा रोमन साम्राज्याचाही ऱ्हास होत गेला तसे त्यांना एका आयकॉनची गरज भासली ज्या आयकॉनच्या नावावर रोमनांना पुन्हा एकत्र आणता येईल. ईपू ३०० च्या जवळपास त्यांचा राजा काँन्स्टण्टाईन याने येेशूच्या शिकवणींना स्वीकारून हा ख्रिश्चन धर्म सर्वांनी स्वीकारावा अशी घोषणा केली. संपूर्ण रोमन साम्राज्य ईसाई बनले आणि ज्यांनी विरोध केला त्यांना नष्ट करण्यासाठी युद्धे झाली. ही युद्धे यूरोपमध्ये त्या काळात असणाऱ्या अप्रगत जमातींसोबतही लढली गेली. तिथेही मोठ्या प्रमाणात निसर्ग पूजक होते. त्यांना पागान असे क्षुद्रताबोधक नाव देऊन पागानिझमला नष्ट केलं व त्यांनााही ख्रिश्चन धर्मात ओढल. त्यांच्या चालीरीती, रूढी इत्यादी नष्ट केल्या गेल्या. मजेची गोष्ट म्हणजे या जमातींमध्ये अति थंडीच्या दिवसात बर्फांने आच्छादलेल्या झाडांवर कुठे चमकणारी वस्तु तर कुठे दिवे अडकवण्याचा सण असे. तो रोमनांनी चालू राहू दिला. तोच आताचा ख्रिसमस.
अशा प्रकारे ग्रीकसहित संपूर्ण युरोपमधून निसर्गपूजक पागान संस्कृति नष्ट केली गेली. सुमारे दोनशे वर्ष चाललेल्या या संस्कृति विध्वंसक युद्धांमध्ये रोमनांनी ग्रीकांचे साहित्य मात्र नष्ट केले नाही. उलट ते जपून ठेवले कारण ते कल्पनाविलासातून निर्माण झालेले उच्च कोटीचे साहित्य होते. त्याचा अभ्यास किंवा नाटकांचे मंचन होण्याला विरोध नव्हता. ते साहित्य निसर्गातील देवांना मानवी रूपात कल्पून लिहिलेले होते. निसर्ग देव – जसे सूर्य, समुद्र, चंद्र, चांदणे इत्यादींमधे मानवी भावना जसे प्रेम, लोभ, शौर्य, सत्तालालसा, षड्यंत्र, यांना आरोपित करून युद्ध, जय विजय याने नटलेले, भावनांमध्ये बुडालेले साहित्य होते. रोमनांनी ते खूप आपुलकीने स्वीकारले. त्याच्या मायथोलॉजी या नावासकट स्वीकारले. त्या शब्दाचा अर्थच मुळी मिथ्या असा होतो.
ग्रीक निसर्गपूजक असले व कल्पनारम्य साहित्यनिर्मिती करू शकत असले तरी पण उपास्य–उपासनेची संकल्पना त्यांच्याकडे नव्हती. भारतीय पद्धतिमध्ये उपास्याचा आलंबन घेऊन परमात्मप्राप्ति, व मोक्षाचे लक्ष्य होते. तशी ऊर्जितावस्था ग्रीकांच्या निसर्गपूजेत नव्हती. त्यांची मायथोलाँजी केवळ मनोरंजनाचे साधन राहिली होती. किंवा असेही शक्य आहे कि तिथेही उपास्य–उपासनेची परंपरा अस्तित्वात होती पण रोमनांद्वारे तिचा विरोध झाल्यावर पुढील हजार दीडहजार वर्षात ती परंपरा पूर्णपणे समाप्त होऊन गेली व त्यातील मिथ्याभावना तेवढी शिल्लक राहिली.
युरोपमध्ये ख्रिश्चनधर्माच्या विस्ताराच्या सुमारे दीड हजार वर्षानंतर वेगवेगळ्या युरोपीय देशांनी आशिया व आफ्रिका खंडात आपापला साम्राज्यविस्तार केला. त्यामधे भारतासोबत श्रीलंका, इडोनेशिया, फिलिपीन्स इत्यादीवर विजय मिळवला. चीन जपानवर विजय तर नाही मिळवला पण विसाव्या शतकाच्या प्रभावातून ते पण सुटले नाहीत. विशेष उल्लेखनीय म्हणजे सम्राट् अशोकाच्या प्रेरणेने भारताच्या पूर्वेकडील सगळे देश बौद्ध धर्मीय झाले होते. बुद्धाने मूर्तीपूजा नाकारली होती पण बोधि प्राप्तिचे महान लक्ष्य बौद्ध परंपरेतही आहेच. मुस्लिम वा ख्रिश्चन धर्मात मात्र परमेश्वर हा अप्राप्यच मानलेला आहे.
अठराव्या शतकात भारतामध्ये आलेल्या इंग्रजांसमोर निसर्गपूजक, मूर्तीपूजक हिंदू होते, त्यांचे अफाट अप्रतिम साहित्य होते आणि आराध्याची आराधना करण्याची परंपरा होती. ग्रीकांच्या उदाहरणाने प्रभावित इंग्रजांनी भारतीय साहित्याची मायथोलॉजीला अशी संभावना केली व त्याला इतिहास म्हणून अमान्य केले. पुढे त्यांनी आणलेल्या शिक्षण प्रणालीत भारतीय वाङ्मयाची ऐतिहासिकता हा एक चेष्टेचा विषय बनून राहिला. ते सर्व साहित्य मिथक ठरवले गेले व भारतियांनी तसे मान्य केले. इंग्रजांच्या शिक्षणाची चकाकी आजतागायत आपल्याला आंधळं बनवून ही मान्यता कायम ठेवायला समर्थ ठरली. एवढेच नाही तर आपली शिक्षणनीती या मान्यतेसाठी कायमपणे इंग्रजांची अनुगृहीत आहे.
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारत जरी स्वतंत्र झाला असला तरी शिक्षणतंत्रात ब्रिटिशांनी रुजवलेल्या कल्पनाच आधुनिकतेचे व प्रगतीचे लक्षण बनून राहिल्या. जनमानसात मात्र भारतीय इतिहास, शंकर, राम, कृष्ण इत्यादि तथ्यात्मक मानले जात होते. म्हणजेच समाजात एक विरोधाभास होता – एकीकडे बहुमतातील अल्पशिक्षित जो स्वतःसाठी गांवंढळ, अंधविश्वासी, रूढीवादी, यासारख्या विशेषणांना विरोध करत नव्हता पण रामायण इत्यादींना प्रत्यक्ष इतिहास मानत होता. दुसरीकडे अल्पमतातील उच्चशिक्षित ज्यांच्या दृष्टीने सर्व भारतीय परंपरा हेय आणि सर्व इतिहास हा मायथोलॉजी होता. या दोन पक्षांमधे एकप्रकारचे संतुलन तयार झाले होते.
पण ऐंशीच्या दशकात आधुनिक चकाकीला एक नवा आयाम मिळाला जो भारतीय शिक्षणात ब्रिटिश कल्पनांच्या असण्या किंवा नसण्यावर अवलंबून नव्हता. टेलिव्हिजन नामक नव्या तंत्रज्ञानाचा हा नवा आयाम होता. हे नवे जग सर्वस्वी झगमगाटाचेच जग आहे. आणि हा झगमगाट उत्पन्न करणाऱ्या तंत्राचे एकाधिपत्य सध्या अमेरिकेकडे चालले आहे. यापुढे अमेझॉन, नेटफ्लिक्स सारख्या दोन ते चारच मोठ्या कंपन्या उरतील ज्यांच्याकडे हा झगमगाट उत्पन्न करण्यासाठी पैशाचे मोठे भांडवल व लागत असल्यास बाहुबलही आहे.
पण या साम्राज्याचे रॉ मटेरियल काय आहे ते समजून घ्यायला हवे. ते आहे जनसामान्याच्या मनात आणि संस्कृतीत घर करून राहिलेले साहित्य. अशा जनसाहित्याचा भारताएवढा एवढा मोठा साहित्यसाठा अजून कुठे मिळणार? पण एक अडचण आहे. भारतीय साहित्यातील देवता निव्वळ हीरो नाहीत, तर उपास्य आहेत आराध्य आहेत. त्यांचे देवत्व बाजूला काढायचे असेल तर पागान ही टर्मिनॉलॉजी आजच्या युगात अपुरी आहे. आज नवा शब्द पाहिजे.
ही अडचण सोडवण्यासाठी सरळसोपा मार्ग आहे जो भारतीय शिक्षणप्रणालीत सापडेल. इथल्या शिक्षाविदांना हे काम सोपवा -- त्यांनी भारतीय देवतांना हीरो राहू द्यावे, त्यांची हीरो-इमेज अजून चमकदार करावी पण त्यांची उपास्यता बाहेर काढून टाकावी. असे करण्यासाठी वाढीव झगमगाट पाहिजे असेल तर आम्ही त्यासाठीच तर आहोत.
व्यक्त किंवा अव्यक्त स्वरूपात हा संदेश भारताच्या विद्यापीठांमध्ये पोचला., त्यांनी तो शिरसावंद्य मानला. तसे करण्याने प्रथितयश अमेरिकन विद्यापीठांची पार्टनरशिपही मिळत होती – त्याचाही झगमगाट सर्वदूर पसरणार होता. तर अमेरिकन सिलेबसला आदर्श मानून आपल्या विद्यापीठांनीही मायथोलॉजी विषयाचे क्रॅश कोर्सेस चालू केले. तीन किंवा सहा महिन्यात झटपट सर्टिफिकेट देण्याची आणि ढोल ताशांच्या घोषात उत्साहाने जनसामान्यांपुढे रुद्र, गणेश, हनुमान, दत्तात्रेय, काली, वैष्णोदेवी यासारख्या मायथोलॉजिकल हीरोे हीरोइनींची पखरण करण्याची तयारी चरम उत्कर्षाला पोहचली आहे. त्यांना ग्रीक मायथोलॉजी किंवा स्टारवॉर्सच्या स्टाइलने पेश करणारे योग्य ते सिलेबस आता मायथोलॉजीच्या इंडियन सेक्शनमधे दाखल झाले आहे. हे कोर्सेस करणाऱ्यांसाठी भविष्यात परदेशी चॅनेल्समधून पटकथा, संवाद, मंच, नेपथ्य यासारखी करीयर्स उपलब्ध होणार आहेत. फक्त एकच अट. या हीरोंमधून उपास्यतेचे तत्व काढून टाका. ते झाले की आपल्या विद्यापीठांनादेखील गळ्यात सेक्यूलॅरिझमचा आणि सॅनेटाइज्ड हिंदूइझमचा बिल्ला मिरवता येतो.
तर भारतियांनो, या. बघूयात नव्या सीरीयल्स अमेझॉन किंवा नेटफ्लिक्सवर किंवा आपल्याच भारतीय चैनलांवर. पहा हा आपला हीरो - रूद्र. पहा कसा हृष्टपुष्ट आणि शूरवीर आहे, काय काय करामती करतो, काय काय लढाया लढतो. खरं सांगायच तर काय उत्तम मनोरंजन करतो. आणि तो पहा आपला दुसरा हीरो गणेश, आणि तो राम. तिकडे तो हनुमान- तो तर सगळ्यात जास्त मनोरंजक आहे. तसा विष्णूही आहे. आणि हो, हीरोइन्सही हव्याच. तर आता सादर करत आहोत काली, दुर्गा, लक्ष्मी -----.
फक्त या भारतियांना सांगा कि त्यांनी आपल्या हीरोंचे हीरोपण पहावे. एरवी स्मरणात ठेवावे कि उपासना नावाची कोणतीही वस्तु असत नाही. असतो निव्वळ व्यापार. तुमच्या साहित्यातील हीरोंचे महत्व तेवढ्यापुरतेच आहे.
म्हणूनच मनात प्रश्न उमटतो – हे संकट ओळखण्याचे, त्याच्याशी भिडण्याचे आणि त्याला थोपवण्याचे सामर्थ्य भारतीय चेतनेमधे आहे का? इतकी वर्षे आपल्या विद्यापीठांमधे दीर्घकालीन कोर्सेससाठी येणारे मोजकेच विद्यार्थी या संकटाशी संबंधित होते. आता क्रॅश व इन्स्टण्ट कोर्सेसचा जमाना आहे, सामान्य माणसाला सहजसाध्य. जोडीला परदेशी विद्यापीठांचे अॅफिलिएशन किंवा कृपादृष्टी असणारे सर्टिफिकेटही असणार.त्याच मोह सर्वांना पडला तर त्यात नवल ते काय? भारतातील उपासना-संस्कृतिवरील हे संकट आधीच्या शैक्षणिक पद्धतीमुळे आलेल्या संकटापेक्षा जास्त मोठे असणार आहे.
याचसाठी आता आपल्या शब्दकोषांमधून नायथॉलॉजी, मिथक हे शब्द काढून टाकून आमचे वाङ्मय मिथक नसून इतिहास आहे असे ठामपणे सांगण्याची वेळ आली आहे.
------------------------------------------------------------

Comments

Maayboli Dhwaj said…
POURANIC YODDHA,
KARAN BARYACH JAGI PURAWE MILTAAT,
PAN KAHI JAGCHE STAL KAAL AKALAN HOT NAAHEE,
UDAHARNARTH SUVARN MRUG SHIKAR,MAHARASHTRA ANI ANDHRACHYA PARYATAN PUSTEEKANMADHE
SAMBHRAM NIRMAN KATE.

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट