my first blog आणि नवीन लेखन

Tuesday, September 18, 2018

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

निमित्त- 49 वा स्मृतीदिन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हा मराठीचा मौलिक ठेवा-प्रा.हरी नरके

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 49 वी पुण्यतिथी. आपल्या सकस लेखणीद्वारे व शाहीरीद्वारे ज्यांनी उच्च दर्जाचे प्रबोधन केले असा हा महान कलावंत-साहित्यिक.
अण्णाभाऊंचे मूळ नाव तुकाराम. अण्णा हे त्यांचे टोपण नाव.

१ ऑगस्ट १९२० रोजी त्यांचा वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे जन्म झाला. १८ जुलै १९६९ रोजी वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी ते गेले. त्यांचे वडील भाऊराव साठे यांची घरची अतिशय गरिबी होती. अण्णाभाऊंचे औपचारिक शिक्षण फारसे झालेले नव्हते. प्रतिभेचा झरा होता मूळचाच खरा. त्यांनी ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचे १५ कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी 11 नाटकं व लोकनाट्यं लिहिली. त्यांचे प्रवास वर्णन, रशियातील भ्रमंती, खूप गाजले. त्यांच्या १२ चित्रपटांच्या पटकथा पडद्यावर आल्या. त्यांनी शेकडो पोवाडे व गाणी लिहिली. त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य पुरस्कार मिळालेला होता. तिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स.खांडेकर यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे.
त्यांच्या साहित्याचा अनुवाद तीसेक भाषांमध्ये झालेला आहे.

"जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव!
गुलामगिरीच्या या चिखलात रूतून बसला का ऎरावत,
अंग झाडूनी निघ बाहेरी, घे बिनीवरती धाव,
धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले,
मगराने जणू माणिक गिळले, चोर जाहले साव,
ठरवून आम्हा हीन कलंकित, जन्मोजन्मी करुनी अंकित,
जिणे लादूनी वर अवमानित, निर्मुन हा भेदभाव,
एकजुटीच्या या रथावरती, आरूढ होऊनी चल बा पुढती,
नव महाराष्ट्रा निर्मुन जगती,करी प्रगट निज नांव!"

हे एकच गीत जरी त्यांनी लिहिले असते तरी त्यांचे नाव अजरामर झाले असते. त्यांनी तर शेकडो गितं लिहिली.
रवि आला लावुनि तुरा, माझी मैना गावावर राहिली, मुंबईची लावणी यांनी महाराष्ट्राला वेड लावले.

"पानापानात नाचे हा वारा, भूप रागाच्या छेडीत तारा, हासे कोकीळ मनी, मोर नाचे वणी, सप्तरंगाचा फुलवून पिसारा!" अशी देखणी शब्दशिल्पं त्यांनी कोरली.
वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी हा त्यांच्या लेखणाचा गाभा होता. त्यांनी कम्युनिष्ट पार्टीसाठी अनेक वर्षे काम केले.
गिरणी कामगार आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यासाठी ते लढले.

तिकीटाला पैसे नाहीत म्हणून लहाणपणी ते कासेगाव ते मुंबई हे अंतर पायी चालत गेले. त्यांची ही वणवण मात्र आयुष्यभर चालूच राहिली.
" दलित कंगाल दिसला, एका झाडाखाली तीन दगडाच्या चुलीवर त्याचा संसार असला तरी संसार करण्याची त्याची इच्छा पवित्र आहे. काव्यमय शब्दात सांगायचे तर, हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलिताच्या तळहातावर तरलेली आहे," हे त्यांचे उद्गार कसे विसरता येतील.
अण्णाभाऊ शेवटपर्यंत मुंबईच्या झोपडपट्टीत राहत.

ते 18 जुलैला गेले तेव्हा तीनचार दिवसांचे कुपोषण त्यांना झालेले होते. त्या अठवड्यात ते मंत्रालयातल्या एका उपसचिवाला जाऊन भेटले. म्हणाले, तुम्ही मला लेखक-कलावंत म्हणून मानधन देता पण ते महिना अखेरीला मिळते. तुम्ही ते मला दर आठवड्याला देऊ शकणार नाही का? माझी चूल गेले चार दिवस पेटलेली नाही." उपसचिवने त्यांच्याकडून तसा अर्ज घेतला, पुढे पाठवला. पण सरकारी निर्णय व्हायच्या आत कुपोषणाने अण्णाभाऊंचा बळी घेतलेला होता.

ते गेल्याची बातमी तत्कालीन समाज कल्याण मंत्री बाबूराव भारस्करांना कळताच ते अण्णाभाऊंच्या झोपडीकडे धावले. अंत्यविधीचे सामान आणायला पैसे नव्हते.
भारस्करांनी दोघा कार्यकर्त्यांना बोलावले, पाचशे रूपये दिले. सामान लवकर घेऊन या असे त्यांना सांगितले.
ते कार्यकर्ते पैसे घेऊन जे गेले ते परत आलेच नाहीत!

अण्णाभाऊंच्या अंत्ययात्रेची परवड झाली. या अंत्ययात्रेला अवघे साताठ लोक उपस्थित होते. आज त्यांचे असंख्य पुतळे उभे राहात आहेत, पण त्यांच्या विचारांचे काय? ते कोण पेरणार? जपणार? संवर्धित करणार? आपण ते काम करूयात.

प्रेमचंदांची कफन ही कथा तुम्हाला आठवतेय का?

अण्णाभाऊंसारख्या प्रतिभावंताला कुपोषणात जगवणारी, पोसणारी यंत्रणा चळवळीकडे ४९ वर्षांपुर्वी नव्हती. आज तरी आहे का?
- प्रा. हरी नरके

0 Comments:

Post a Comment

<< Home