खादी... एक विचार अनेक आचार साप्ताहिक विवेक 16-Mar-2017


खादी... एक विचार अनेक आचार

साप्ताहिक विवेक  मराठी  16-Mar-2017
, भारतीय व युरोपीय वस्त्रोद्योग, भारताची कृषी व वस्त्र संस्कृती, उद्योगक्रांती येण्याआधीच्या युरोपातील लोकर-आधारित वस्त्रसंस्कृती, अमेरिकेत गुलामांच्या घामातून साकारलेला कापूस-आधारित वस्त्रोद्योग, भारताची विकेंद्रित अर्थव्यवस्था व त्यातून ग्राम-स्वावलंबनावर आधारलेली संस्कृती या सर्वांविषयी टप्प्याटप्प्याने विचारमंथन सुरू झाले. या नवीन दृष्टीमुळे आचरणांत खादी आणली गेली. बिहारच्या प्रचंड उन्हाळयात सुती साडया, हँडलूम साडया आणि खादीचे सलवार कुर्ते पसंत पडू लागले आणि इतर कपडे तेवढे भावेनात.
मी खादी-भक्त आहे. त्याच्या अनेक कारणांपैकी सर्वात महत्त्वाचे कारण हे की खादीचा स्पर्श आपल्या अंगाला सुखकारक असतो आणि सिंथेटिक कापडासारखा अपायकारक तर मुळीच नसतो. तसे पाहिले, तर मिलमधील सुती कापडदेखील अंगाला अपायकारक नसते. पण त्याचा खादीच्या स्पर्शाइतका सुखद स्पर्श नसतो - खादीसारखा समशीतोष्ण म्हणजे थंडीत ऊब देणारा व उष्म्यात थंडावा देणारा असा नसतो.
म्हणूनच जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी खादीबद्दल बोलायला सुरुवात केली, तेव्हा मला सुखद आश्चर्य वाटले. तसे पाहिले तर कित्येक दशकांचे काँग्रेसचे सरकार जाऊन भाजपाचे सरकार केंद्रात आणि राज्यात आले असले, तरी नवीन विचारसरणीत खादी ही काही मोठी प्राथमिकता वाटत नसेल. मोदींखेरीज इतर कोणीही खादीबद्दल बोललेलेदेखील नाही. पण मोदींच्या उल्लेखामुळे कदाचित हा विषय पुढे जाईल. याच कारणासाठी खादीच्या कॅलेंडरवर मोदी झळकावेत याचाही मला आनंद झाला होता.
मला खादीबद्दल आकर्षण निर्माण झाले ते किशोरवयात वाचलेल्या एका कादंबरीमुळे. भारतीय स्वातंत्र्यालढयाच्या पार्श्वभूमीवर तसेच बिहारमधील सामाजिक स्थिती दाखवणारी ही कादंबरी. नायक क़्रांतिवादी, तर त्याची आई गांधीवादी. अल्पशिक्षित असूनही खादीच्या कामाला वाहून घेतलेली. एक दिवस तापाने फणफणत असतानाही ती आपले गाठोडे बांधून निघते, तेव्हा पोलिसांचा डोळा चुकवून चारच दिवसांसाठी घरी आलेला नायक तिला थांबवायचा प्रयत्न करतो - एक दिवस नाही गेलीस तर काय होईल?
आई उत्तर देते, ''अरे, माझे वार ठरलेले आहेत. एका गावाला आठवडयातून एकदाच जाणे होते. आता मी ज्या गावाला जाणार, तिथल्या बायका वाट बघत असतील. मी जाऊन त्यांना आठवडाभर लागणारे पेळू देणार, त्यांनी मागल्या आठवडयात कातलेले सूत वजन करून, तपासणी करून घेणार, त्यावर त्यांची मजुरी देणार, तेव्हा कुठे त्यांच्या घरांत चूल पेटेल. आज गेले नाही, तर पुढचे आठ-दहा दिवस त्यांची पोरंबाळं उपाशी राहतील!''
माझ्या बालपणी बिहारमधील जी आर्थिक विपन्नता मी पाहिली आहे, त्याचे प्रतिबिंब या संभाषणात होते, पण उपायही इथेच दिसत होता. तेव्हापासून खादी, भारतीय व युरोपीय वस्त्रोद्योग, भारताची कृषी व वस्त्र संस्कृती, उद्योगक्रांती येण्याआधीच्या युरोपातील लोकर-आधारित वस्त्रसंस्कृती, अमेरिकेत गुलामांच्या घामातून साकारलेला कापूस-आधारित वस्त्रोद्योग, भारताची विकेंद्रित अर्थव्यवस्था व त्यातून ग्राम-स्वावलंबनावर आधारलेली संस्कृती या सर्वांविषयी टप्प्याटप्प्याने विचारमंथन सुरू झाले. या नवीन दृष्टीमुळे आचरणांत खादी आणली गेली. बिहारच्या प्रचंड उन्हाळयात सुती साडया, हँडलूम साडया आणि खादीचे सलवार कुर्ते पसंत पडू लागले आणि इतर कपडे तेवढे भावेनात. हा फरक कायमस्वरूपी झाला.
पुढे 1984-88 या काळात व माझी सरकारी पोस्ट म्हणजे सांगली-जिल्हाधिकारी व पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाची कार्यकारी निर्देशक असताना आम्ही देवदासींसाठी आर्थिक पुनर्वसन प्रकल्प राबवायला घेतला. त्यात त्यांना कौशल्य प्रशिक्षण आणि पुढे उद्योजक म्हणून काम करण्याच्या सोयी करून देणे हे स्वरूप होते. एका गटाला आम्ही रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण दिले. त्यामधे रीलिंग म्हणजे कोषातून धागा काढणे, त्याला डबलिंग व टि्वस्टिंग या प्रक्रियेतून मजबूती आणणे, आडव्या बीम भरणे आणि प्रत्यक्ष रेशीम वस्त्र विणणे एवढया प्रकारांचे प्रशिक्षण होते. त्यानिमित्त मी देशभर फिरले आणि रेशीम उद्योगासोबतच सूत-उद्योगाचाही अभ्यास केला. व्याप्ती पाहू गेल्यास भारतात सूत-उद्योगाची व्यप्ती ही रेशीम उद्योगापेक्षा लाख पटींनी जास्त आहे. पण त्या तुलनेत खादीचा वाटा अत्यल्प असा आहे.
या माझ्या अभ्यासाच्या काळात दोन अफलातून गोष्टी झाल्या. आम्ही सुट्टीवर आसाममध्ये फिरायला गेलो, तेव्हा तेथील रेशीम उद्योगही पाहिला. आसाममध्ये सोमसाल या जंगलात वाढणाऱ्या वृक्षांवर वेगळया जातीचे रेशीम किडे पोसले जातात. त्यांना मोगा असे नाव आहे. त्यापासून धागा तयार करून मोगा सिल्कची वस्त्रे तसेच सुती वस्त्रे विणण्यासाठी घरोघरी छोटे हातमाग आहेत. नवीन मूल जन्माला आले की त्याला आयुष्यभर पुरेल एवढे कापड विणण्याचा संकल्प सोडला जातो. मूल मोठे होत जाते, कौशल्य शिकत जाते, तसे त्याचाही सहभाग या कामात वाढत जातो.   
त्यातील एक महत्त्वाचे काम होते शाळेत येता-जाता टकळीवर सूत काढून देणे. चड्डीच्या एका खिशात गडूमध्ये ठेवलेली टकळी आणि शर्टाच्या वरच्या खिशात पेळू. मित्रांसमवेत गप्पा करत सूतकताई करत ही मुले जायची. मला खूप आश्चर्य वाटले. असे चालता चालता टकळीवर सूत कातायला आपणही शिकायचेच, असे ठरले.
साधारण याच सुमारास, सत्तरी उलटून गेलेल्या माझ्या वडिलांनी धरणगाव (खानदेश) ते पंढरपूर अशा पायी वारीत सामील होण्याचे ठरवले. त्यांनी मनात घेतले की परावृत्त करणे अशक्यच. पण मी पंढरपूरला तुम्हाला घेण्यास येते असे त्यांना ठासून सांगितले.
वारी संपल्यावर, आपला अनुभव कसा होता ते त्यांनी खूप उत्साहाने ऐकवले. सुमारे 8-10 लाख लोक ठिकठिकाणच्या गावांमधून पायी चालत सुमारे 15-20 दिवसांचा प्रवास करून पंढरीला येतात. साधी, देवभोळी, कष्टकरी माणसे. हरिनामाचा जप चालू असतो. मग आम्ही बोलत बसलो - यांना चालता चालता टकळी वापरायला शिकवली, तर?
मग कित्येक वर्षे लोटली आणि एक दिवस ती भन्नाट कल्पना अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष प्रकाश बोधले महाराजांना आवडली. एक दिवस त्यांच्या हरिनाम सप्ताहाच्या उत्सवात त्यानी मला आवर्जून परभणीला बोलावले. तिथे कीर्तन ऐकायला आलेल्या स्त्रियांसमोर आम्ही दोघांनी ही कल्पना मांडली. त्यांचे सचिव शेडगे यांनी परभणी येथेच खादी बोर्डातून निवृत्त झालेले ज्ञानेश्वर मुंडे यांना शोधून आणले व त्यांनीही या कामासाठी सूत्रधार म्हणून काम पाहायचे कबूल केले. त्यांनी टकळीवर सूतकताई शिकवणाऱ्या दादाराव शिंदे गुरुजींनाही या कामात ओढले. शिंदे गुरुजींनी टकळीसोबत पेटीचरख्याची कल्पनाही मांडली. हा पेटीचरखा पेटीसारखा उघड-मीट करता येतो. बंद केल्यावर खादी कर्ुत्याच्या खिशात मावेल एवढा आकार असतो. ते सर्व पाहून मी मुंबईला परत आले.
मग विचारचक्र सुरू झाले. मुंढेंनी चालवलेल्या बालभवन सार्वजनिक वाचनालयाच्या एका खोलीत सुमारे 20 स्त्रिया प्रशिक्षणाला बसू शकतील. पण त्यांना टकळी, पेटी-चरखे, पेळू इत्यादी लागेल. शिवाय चालत जाताना टकळीवर सूतकताईचे काय? हे सर्व काही आपण स्वत: शिकून न घेता इतरांना भरीला घालणे योग्य आहे का? वगैरे वगैरे!
सुदैवाने पक्के गांधीवादी व खादीभक्त आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आदरणीय चंद्रशेखर धर्माधिकारी यांची ओळख होती. त्यांच्याकडे हा विषय मांडला. ते अगदी भारावून गेले आणि उत्साहातही आले. लगेच त्यांनी मुंबई, वर्धा व परभणीला मुंढे यांना फोन लावले. मुंबईच्या खादी ग्रामोद्योग केंद्रातील एक कार्यकर्ता मला टकळी व पेटीचरख्यावर सूत कातायला शिकवेल, ही व्यवस्था झाली. मुंढेंबरोबर पूर्ण चर्चा करून त्यांची जबाबदारी, अडचणी इत्यादी बाबी ठरल्या. वर्ध्याला सेवाग्राममध्ये फोन करून 20 पेटीचरखे परभणीला पाठवायची सोय झाली. पुढे मला टकळी येऊ लागल्यावर स्वत:कडील एक छोटा गडू भेट म्हणून दिला. मी त्यामध्ये टकळीला स्थिरावून कारने, बसने किंवा रेल्वेने प्रवास करताना सूत काढू लागले. चालता चालता सूतकताईचा सरावदेखील करून झाला. मुंढे व शिंदे यांना त्यांच्या कामापोटी बारा हजार रुपये धर्माधिकारी यांनी आपणहून पाठवले. शिवाय खादी उद्योगातील कोणत्याही अडचणी आल्या तर त्यांचा फोन फिरेल हा आधारही मिळाला.
अशा रितीने परभणी येथे 15 महिला टकळीचे व पेटीचरख्याचे प्रशिक्षण घेऊ लागल्या. एव्हाना आषाढी एकादशी जवळ येऊ लागली होती. या प्रशिक्षणात तयार झालेले सूत पंढरपुरी श्री विठ्ठलाला अर्पण करायचे अशी एक भावनिक योजना होती. शिकाऊ महिलांनी बरेच सूत कातून झाले होते. मुंढेंनी कल्पना मांडली की सुताऐवजी वस्त्र तयार करून ते विठ्ठलाला अर्पण करावे. तसे केल्याने आषाढी एकादशीचा मुहूर्त गाठता आला नसता. मग कार्तिकी एकादशीचा मुहूर्त ठरला. मात्र त्या आधी पंढरपूरच्या वारीत बोधले महाराजांच्या दिंडीसोबत मीदेखील पुणे-सासवड असा प्रवास केला. सासवड मुक्कामी परभणीच्या गोटातील सहा महिला आल्या होत्या. त्यांनी रात्री खूप मोठया वारकरी समुदायासमोर पेटीचरख्याचे प्रात्यक्षिक केले. मीदेखील चालताना टकळी वापरण्याचे प्रात्याक्षिक दाखवले. कित्येक वारकऱ्यांनी यात रस दाखवला. पण वारीत त्यांच्याकडे असणाऱ्या एकूण ओझ्याचा विचार करता त्यांना टकळीवर सूतकताई जमेल का ही मलाच शंका आली. त्यावर निदान मुक्कामाच्या ठिकाणी भजन-कीर्तन ऐकताना तरी ते टकळीने किंवा चरख्याने सूतकताई करू शकतील असे त्यापैकी काहींनी सुचवले. त्याच मुक्कामी वर्ध्याहून काही मंडळी हातकरघे घेऊन प्रात्याक्षिके दाखवायला आली होती.

हे छोटे हातकरघे घरगुती वापरासाठी असतात व त्यावर 2 फूट रुंदीचे कापड विणले जाऊ शकते. म्हणजे ज्या घरांत सूत काढले जाईल, तिथेच ते विणून वस्त्रदेखील तयार होऊ शकते. पण त्यांमधून पंचे, टेबल मॅट्स असे छोटेखानी काम होऊ शकते, रुंद पन्हा निघू सकत नाही.
असो. अशा प्रकारे, तऱ्हेतऱ्हेच्या शक्यतांचा विचार करत सासवड मुक्कामाची रात्र संपली आणि दुरऱ्या दिवशी दिंडी पुढे निघाली. मी पुण्याला परत आले.
परभणीच्या महिला गटाने काढलेल्या सुताचे वस्त्र करण्यासाठी मुंढेंना बराच त्रास झाला व नवीन गोष्टी कळल्या. काही वर्षांपूर्वीपर्यंत खादी ग्रामोद्योग बोर्डातर्फे असे काढलेले सूत घेऊन त्याबदल्यात वस्त्र दिले जायचे, ती पध्दत बंद झाली होती. वर्धा, नांदेड अशा खादीचे गड म्हणवल्या जाणाऱ्या ठिकाणी पूर्वी सूत विकत घेतले जायचे तेही आता बंद झाले होते. मग परभणीच्या प्रशिक्षित महिला गटाने वर्षभर चरख्याचे काम करायचे म्हटले, तर त्यांना विक्रीची व्यवस्था काय, हा मुंढेंना प्रश्न पडला होता. त्यांच्या ओळखीमुळे आणि वारीबरोबर संबंध जोडला गेल्याने या वेळेपुरते तुमच्या सुताच्या समतुल्य कापड देतो असा वर्धा केंद्राकडून त्यांना दिलासा मिळाला. त्याप्रमाणे सुमारे 13 मीटर लांब व मोठया पन्ह्याचे कापड मिळाले. मग कार्तिकी एकादशीला आळंदी येथे माउलींच्या समाधीवर त्या वस्त्राचा अर्पण सोहळा झाला. त्या वेळी मा. धर्माधिकारी, बोधले महाराज, मी, तसेच उल्हास पवार, मुंढे, शेंडगे इत्यादी मंडळी हजर होते.
तसे पाहिले, तर मी, बोधले महाराज, धर्माधिकारी व मुंढे वेगवेगळया गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करीत होतो. पण चारी गोष्टीसाठी खादी ग्रामोद्योग बोर्डाच्या सहभागाची गरज होती. ती असेल तर चारी उद्दिष्टांची एकत्र पूर्तता होऊ शकत होती. मला आषाढी एकादशीसाठी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांची ऊर्जा सूत काढणे या तात्कालिक कार्यासाठी वापरली जावी असे वाटत होते. बोधले महाराजांना यातून अध्यात्माकडे एक पाऊल पुढे टाकलेले पाहायचे होते. मुंढेंना यातून एखादे खादीचे उत्पादन केंद्र उभे राहावे असे वाटत होते, तर धर्माधिकारी यांना खादीचा प्रचार व अधिक वापर अपेक्षित होता.
आमच्या प्रयत्नांना यश आले की नाही, किती टक्के यश किंवा अपयश मिळाले, ही चर्चा मला आता तरी फारशी करायची नाही. पण एका वेगळया दिशेने वाटचाल करण्यासाठी चार वेगळे चिंतन करणाऱ्या व्यक्ती एकत्र येतात आणि एक प्रयोग करून पाहतात, ही प्रयोगशीलता हाच आपल्या समाजाचा एक अमूल्य ठेवा आहे. यशाचा रस्ता त्यातूनच सुरू होतो.
9869039054
leena.mehendale@gmail.com

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

एक शहर मेले त्याची गोष्ट

उद्धव गीता भाग १ -- भांडारकर व्याख्यान दि. १२ जून २०१९