विज्ञान आणि अज्ञान --नवप्रभा मधील माझा लेख
http://www.navprabha.com/?p=7469
http://www.navprabha.com/?p=7484
- लीना मेहेंदळे
(पूर्वार्ध )
आपला देश सध्या तरी विज्ञान विषयात इतर प्रगत देशांच्या मानाने खूप मागे आहे आणि याचसाठी लोकांमध्ये विज्ञानाचे कुतूहल आणि वैज्ञानिक दृष्टीकोन बाणवण्याची संधी आपण सोडता कामा नये. पण त्याआधी वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय त्याचा थोडा उहापोह या घटनेच्या माध्यमातून करूया.
कॉलेज जीवनात खूप जणांचे स्वप्न असते रीसर्चचे…. पण रीसर्च अथवा संशोधन कसे करायचे ही शिकवण फारशी दिली जात नाही. आपल्या देशात खूप चांगल्या पद्धतीची संशोधनेही होत नाहीत. विज्ञान विषयात इतर प्रगत देशांच्या मानाने आपण खूपच मागे आहोत. आपल्याला मोठे संशोधन करायला मिळेल किंवा न मिळेल, पण वैज्ञानिक दृष्टीकोन असेल तर छोट्या प्रसंगातूनही काहीतरी साध्य करता येते. हा दृष्टीकोन लहान मुलांत आणि सामान्य माणसांत देखील आला पाहिजे. याचसाठी लोकांमध्ये विज्ञानाचे कुतूहल आणि वैज्ञानिक दृष्टीकोन बाणवण्याची संधी आपण सोडता कामा नये. पण त्याआधी वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय याचा थोडा उहापोह.
घटना विचार करण्याजोगी आहे… मजेशीर म्हणूया हवीतर. त्यातून आपल्याला किती पल्ला गाठायचा आहे त्याची कल्पना येते. १९९४-९५मध्ये मी नाशिक येथे महसूल आयुक्त असताना घडलेली ही सत्यघटना आहे. १९९५ मध्ये नाशिक विभाग दुष्काळग्रस्त होता. सर्वच तालुक्यांमध्ये पर्जन्यमान कमी झाले. पिके जळाली. मोठे नुकसान झाले. रब्बीचे पीक बरे आल्यामुळे वर्ष अखेरीला लोकांना दिलासा मिळाला, पण दुष्काळाची भयछाया लोकांच्या मनावर राहून गेली. त्यात एकूण पाऊस कमी झाल्याने विहीरींचे पाणी आटले होते. त्यामुळे पुढच्या वर्षी नव्या विहिरी खणण्याची गरज निर्माण झाली.
आपल्याकडे जीएसडीए म्हणजे ग्राऊंड वॉटर सर्व्हे ऑथोरिटी या नावाचे एक सरकारी खाते असते. त्यांच्यामार्फत दरवर्शी बर्याच विहिरी खोदल्या जातात. त्यातील सुमारे ८० टक्के सरकारी खर्चाने असतात. त्यामुळे त्यांनी पाण्याची शक्यता पडताळली, विहिरी खणल्या आणि त्यांना पाणी लागले नाही तर त्याचे फारसे वैषम्य कुणाला वाटत नाही. कित्येकदा त्याची माहिती कुणाला मिळत नाही. खुद्द त्या खात्याकडे अभ्यासकाच्या दृष्टीने ही सर्व माहिती मांडून त्यांचे यशस्वी-अयशस्वी हे गणित मांडले जाते का, हा वेगळा प्रश्न आहे. पण जरी तसे होत असले तरी, त्याची माहिती लोकांपर्यंत नसते. म्हणून लोकांचा ठोकताळा असा की, त्यांनी पडताळा करून पाणी आहे असे सांगितलेल्या जागांपैकी पन्नास टक्के विहिरीच यशस्वी होतात. त्या विभागाची सांख्यिकी माहिती जाहीर करण्याने देखील वैज्ञानिक दृष्टीकोन येईल. असो.
पण जेव्हा शेतकर्यांना स्वतःच्या खर्चाने विहिर खणायची असते तेव्हा मात्र त्यांना यापेक्षा जास्त मोठी गॅरंटी हवी असते. अशावेळी ते एखादा पानाडा गाठतात. पानाडे, बैदू, ज्योतिषी या सर्वांना आपण एकाच तराजूत टाकतो. त्यांना आपण एकच बिल्ला लावतो. अंधविश्वास. आपण म्हणजे असा सुशिक्षित समाज, ज्याला वाटते की ज्ञान हे फक्त शाळेच्या सर्टिफिकेटमध्येच असते. पण माझे मत थोडे वेगळे आहे. जेव्हा जीएसडीए नव्हते तेव्हा कोण होते? हे पानाडेच तेव्हा शेतकर्याला पाण्याची जागा सुचवत. त्यांचे सल्लेही खूपदा चुकत. फरक असा असतो, की असे पानाडे प्रयोगशील नसतात. त्यांनी काय पाहिले आणि एखाद्या जागेत पाणी असल्याचा निष्कर्ष का काढला, ते कोणाला सांगू इच्छित नाहीत कारण ते ज्ञान गुप्त राहण्यानेच त्यांचा व्यवसाय चालणार असतो. त्याचबरोबर त्यांचा अंदाज कुठे कुठे चुकला त्यावर चर्चा करायला ते तयार नसतात, कारण त्यामुळे त्यांचे गिर्हाईक दूर जाईल व व्यवसाय मारला जाईल, अशी त्यांना भीती असते. ही भीती घालवून त्यांच्या कामातील चांगले निष्कर्ष शिकून घेणे हे समाजाला जमत नाही. कारण सगळेच पानाडे काही खरेपणाची कांस धरत नाहीत. गिर्हाईक टिकवण्यासाठी ते खूपसे फोल दावे करीत असतात. या तिढा जरी असला तरी शेतकर्यांच्या दृष्टीने विचार केला तर जीएसडीए कडून पाणी शोधून घेण्यासाठी येणारा खर्च आणि लागणारा वेळ (व तरीही यशाची पूर्ण हमी नाहीच) बघता तो पानाडाच जास्त परवडतो. शिवाय यातला खरा खर्च हा जीएसडीए किंवा पानाड्याच्या फीचा नसून खरा खर्च हा प्रत्यक्ष विहीर खणण्याचा असतो. त्यासाठी शेतकरी जर पानाड्यावर जास्त भरवसा ठेवत असेल तर त्यातले चांगले काय हे नक्कीच शोधायला हवे.
असो, तर या सर्व कारणांनी १९९६ मध्ये शेतकर्यांकडून पानाड्यांना मोठी मागणी होती. धुळे जिल्ह्यातील एक पानाडा जास्त यशस्वी होता. त्याला अहमदनगर जिल्ह्यात बरीच मागणी येऊन तो या भागात फिरत होता. इतर विहिरींनाही बघत असे. त्याने पाहिले की विहिरीचे पाणी आटले आहे. खरे तर कुणीही हेच पाहील, कारण उन्हाळ्यामुळे मार्च-एप्रिल महिन्यात सर्वच विहिरींचे पाणी आटते. पण याने सांगायला सुरवात केली की, ज्या ‘पॅटर्न’ने या संगमनेर तालुक्यातील पाणी आटले आहे, त्याच ‘पॅटर्न’ने पाच वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्यातील विहिरींचे पाणी आटले होते व म्हणून मला अशी धोक्याची सूचना दिसते की, मे महिन्यात इथेही भूकंप येणार आहे.
आता पाणी आटण्याचा ‘पॅटर्न’ म्हणजे काय? त्याला नेमके काय म्हणायचे होते? पण असा सुसंवाद घडू शकत नाही. कारण प्रत्येक सुशिक्षित माणूस त्याला अंधश्रद्धा, बोगस असेच विशेषण लावणार व त्यामुळे सुसंवाद टळणार. बरे त्यानेही हे प्रसिद्धीसाठी केले नसेल कशावरून? त्याने खरंच काही ‘पॅटर्न’ ओळखला होता की थापा मारत होता? त्याच्याशी सुसंवाद होत नाही तोपर्यंत हे कसे कळणार होते?
तर दोन-तीन गावांमधून हळूच बातमी आली की, पानाड्याच्या निदानावरून मे महिन्यात सुमारे तेवीस तारखेस भूकंप येणार. या बातमीने हळूहळू वेग घ्यायला सुरवात केली. जे शेतकरी नव्हते, गांवकरी नव्हते- शहरात होते-सुशिक्षित होते – सुरक्षित आहोत असे ज्यांना वाटत होते त्यांनी म्हटले- अफवा आहेत झालं.- मूर्खासारखा त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पण एवढ्या ‘तुच्छते’च्या शेर्यांनी गावकर्यांचे समाधान होत नव्हते. बातम्यांनी जोर धरला. बरेच लोक तीन-चार महिन्यांसाठी गांव सोडून जायचे ठरवू लागले, तर काही विमा कंपन्यांनी ‘भूकंप येऊन नुकसान झाल्यास’ या पद्धतीने विमा उतरवायला सुरवात केली.
मग एक दिवस त्या भागातील डीआयजी भुजंगराव मोहिते माझ्याकडे चर्चेला आले. त्यांचे म्हणणे होते – आपण शासनाकडून जादा पोलिस फोर्स मागवून ठेवू. खरोखरच भूकंप आला तर आपल्याला मदतकार्याला माणसे लागतील. त्यांचे दुसरे मत होते की त्या पानाड्याविरुद्ध अफवा पसरवल्याचा गुन्हा दाखल करून त्याला कैदेत टाकायचे. पण चर्चेअंती हे दोन्ही उपाय निरर्थक असल्याचे ठरले. पानाड्याला अटक केली आणि खरेच भूकंप आला तर? शिवाय जर त्याला खरेच काही ‘दिसले’ असेल तर लोकांना धोक्याची सूचना देणे हे चूक नाही. सच्चेपणाने जाणवलेल्या धोक्याची सूचना देणे आणि अफवा पसरविणे यात किती थोडा फरक असतो. तरीही त्याला बोलावून त्याला खरोखरच काय ‘दिसले’ ते विचारायला हवे होते. त्याचा शोध घेतला तेव्हा आता पोलीस कैद करतील या भीतीने तो गाव सोडून गेला होता व त्याचा ठावठिकाणा कोणालाच माहीत नव्हता. त्यामुळे ते समजून घेण्याचा मार्गही खुंटला. एव्हाना अफवा जोरात होत्या आणि वर्तमानपत्रातील बातम्या वाढत होत्या.
(उत्तरार्ध)
या सर्व अज्ञानावर काही वैज्ञानिक उपाय असू शकतो का? केंद्र शासनाअंतर्गत भूवैज्ञानिकी या विभागाकडे पृथ्वीच्या पोटातील हालचाली, भूकंपाची शक्यता, इत्यादी ‘सेस्मोलॉजिकल’ माहितीचा वेध घेणारी शाखा आहे. त्यांच्या डायरेक्टरांना फोन करून मी समस्या सांगितली की, या अफवेमुळे व विशेषतः मागे येऊन गेलेल्या लातूर भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे व त्याचे निराकरण व्हावे. त्यांची पहिली प्रतिक्रिया होती की ही सर्व माहिती गुप्त असते (का?) कारण याचा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी संबंध आहे. पण इथे कायदा-सुरक्षेचा प्रश्न असल्याने ते रिपोर्ट आम्हाला पाठवायला तयार झाले की, त्याचे एक छोटेसे सेंटर देवळाली येथे आहे व तिथले निष्कर्ष आम्हास सांगण्यात येतील. असे दोन-तीन ‘रिपोर्टस’ पाहून आमच्या ध्यानात आले की, गोळा केली जाणारी माहिती देवळालीच्या अगदी जवळपास मर्यादित होती, संगमनेरपर्यंत त्या मशीनची रेंज नव्हती. शिवाय त्या मशीनने गोळा केलेले सिग्नल दिल्लीला पाठवले जात व तिथून दोन केंद्रांच्या माहितीबरोबर जुळवून निष्कर्ष काढला जात असे आणि या सर्व प्रक्रियेला तीन-चार दिवस वेळ लागत असे.
मी पुन्हा डायरेक्टरना फोन केला की आम्हाला याचा उपयोग नाही. आधी त्यांनी नकारात्मकच उत्तरे बोलून दाखवली. पहिला मुद्दा – ‘ही सर्व माहिती गुप्त असते.’ मी कबूल केलं. ‘आम्ही कुणालाही माहिती सांगत नाही.’ – मी म्हटले नाकबूल, इथे एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या घाबरण्याचा प्रश्न आहे. शेवटी ते कबूल झाले की, त्यांचे एक मोठे यंत्र संगमनेर गावात बसवले जाईल व डेटा गोळा केला जाईल. ‘पण यंत्राच्या सुरक्षेची काय व्यवस्था?’
त्यावर मी त्यांना एका शाळेची इमारत मिळवून देण्याचे कबूल केले व खुद्द आमदार बाळासाहेब थोरात (जे नंतर मंत्री झाले) यांच्या शाळेची जागा दाखविली. या नव्या यंत्रामध्ये तीन वेगवेगळ्या व दूरगदूरच्या जागांचे भूगर्भातील धक्के नोंदवून त्यांचा तिथल्या तिथले निष्कर्ष काढून ग्राफवर प्लॉट करायची सोय होती. ते मशीन आले, बसवले, चालू केले. तेव्हा मी पाहायला गेलो. पण त्यांनी मला व चार-सहा मोजक्या व्यक्तींना आत येण्याची ‘परवानगी’ देऊन मशीनचा कारभार, त्यामध्ये निघणारे ग्राफ व त्यावरून पृथ्वीच्या पोटातील लहान-मोठ्या झटक्यासंबंधी काढावयाचा निष्कर्ष हे सर्व दाखवले व आतापर्यंतचे सर्व निष्कर्ष ‘नॉर्मल’ आहे, असेही आश्वासन दिले. मग पुन्हा एकदा माझा डायरेक्टरांशी संवाद झाला. तुम्ही ती खोली ‘टॉप सिक्युरिटी सिक्रेट झोन’ ठेवू नका हा माझा आग्रह होता. येऊन जाऊन एक महिन्याचा प्रश्न होता. मे अखेर किंवा जून मध्यापर्यंत भूकंप आला नाही तर सगळी भीती आणि अफवा बाजूला ठेवून सगळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागणार होते. त्यामुळे तेवढा एक महिना त्या एका सेंटरचा डाटा जाहीर झाल्याने देशाच्या सुरक्षेला कोणताही धोका नव्हता. एखादा विचित्र ‘पॅटर्न’ दिसला तर तो ‘सिक्रेट’ करण्याची मुभा तिथल्या वैज्ञानिकांना द्या, पण एरव्हीचा डाटा सर्वांना मोकळेपणाने पाहू द्या. विशेषतः शाळेच्या मुलांना तर हे मशीन काय आहे – कसे असते वगैरे सर्व पाहू द्या, असा मी आग्रह धरला. नाहीतर तिथे ड्युटीवर असलेल्या वैज्ञानिकांना तासन् तास मशीन मधून सरकत निघणार्या व इसीजी प्रमाणे दिसणार्या त्या ग्राफकडे बघत राहण्यापलीकडे दुसरे काय काम होते? त्यापेक्षा शाळेतील उत्साही मुलांना भूगर्भशास्त्राची तोंडओळख करून देण्याची ही कितीतरी चांगली संधी हाती आली होती. शेवटी या सगळ्यांना ते डायरेक्टर कबूल झाले आणि तेव्हापासून पुढे महिनाभर त्या मशीनला किती शाळकरी मुलांनी भेट दिली त्याची गणतीच नको. मला नंतर किस्सा ऐकण्यात मिळाला की या घटनेच्या शेवटी जेव्हा मशीन काढून नेत होते तेव्हा काही मुले चक्क रडली होती, असो.
मशीन बसले, त्याचे काम, निघणारे ग्राफ हेही सर्वसामान्य माणसाने स्वतः बघण्याची व्यवस्था झाली. ते सर्व ग्राफ नॉर्मल आहेत हे कळल्यामुळे भीतीचे वातावरण हळूहळू कमी होत होते. त्या एका महिन्यात या मशीनबद्दल व भूगर्भशास्त्राबद्दलही वर्तमानपत्रातून लेख लिहिले गेले. पण दुसरीकडे त्या पानाड्याने वर्तवलेली तारीखही जवळ येत होती. त्यामुळे मधूनच भीती पुन्हा वाढत होती. अशात पुन्हा एक बातमी आली की, एका गावातील एक भला मोठा वृक्ष ‘जमिनीत खचला’. एक माणूस रोज पहाटे त्या वृक्षाखालून शौचास जात असे. त्या दिवशी वृक्षाची एक फांदी त्याच्या डोक्यास आदळली, म्हणून वृक्ष खचल्याचे सिद्ध होते, अशी ती बातमी होती. तो वृक्ष खचतच चाललाय असी बातमी दुसर्या दिवशीही पसरली. याचे निराकरण अगत्याचे होते. म्हणूनच मी तहसिलदारांना फोन केला- साहजिकच त्यांच्याकडे वृक्ष खचला की नाही हे समजण्याचे साधन नव्हते. मी त्यांना सुचवले की,‘वृक्षाच्या बुंध्यावर रंग द्या. अगदी जमिनीलगत फुटपट्टीने मोजून ६ इंच चुन्याचा पांढरा रंग, त्याच्यावर गेरूचा रंग ६ इंच, त्यावर पुन्हा चुन्याचे ६ इंच असे त्या झाडावर पट्टे पट्टे रंगवा म्हणजे झाड खचले अगर न खचले ते सर्वांनाच लगेच समजेल.’ त्याप्रमाणे तहसिलदारांनी लगेच त्या दिवशीच झाडालगतचा झाडोरा साफ करून घेतला, जमीनपण शक्यतो साफ केली आणि बुंध्यावर चुना व गेरूने आलटून पलटून पट्टे ओढले. दुसर्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रांनी ती बातमी पण छापली. पुढील तीन-चार दिवसांत जेव्हा झाड खचत नसल्याची खात्री झाली तेव्हा मी अहमदनगर जिल्हाधिकारी यांना सूचना दिली की त्यांनी आकाशवाणीवरून संदेश द्यावा की या सर्व अफवा आहेत. संगमनेरमधले सेस्मिक व्हायब्रेशन मोजणारे मशीन आणि हे न खचलेले झाड हेच दाखवते, तरीही काही दुर्घटना झाल्यास शासन सज्ज आहे वगैरे. मेधा गाडगीळ त्यावेळी जिल्हाधिकारी होत्या. त्यांनी हा संदेश दिला. ते झाड खचत नाही, म्हटल्यावर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला होता.
या सर्व प्रकारांतून मला जाणवते की अज्ञानाचे मूळ कशात आहे. माहिती एकमेकांपर्यंत न पोहचू देणे, असलेल्या माहितीची चिकित्सक बुद्धीने परीक्षा न घेणे म्हणजेच अज्ञान. त्याविरुद्ध विज्ञान म्हणजे लोकांना माहिती देत राहणे व त्यांच्या शंका घालवणे. जर सेस्मॉलॉजी खात्याने त्यांच्या संगमनेरमध्ये बसविलेल्या यंत्राचे ग्राफ सर्वांना खुले ठेवले नसते तर एवढे मोठे उत्तम यंत्र जवळ असूनही त्यांनी अज्ञानच पसरू दिले असे मी म्हटले असते. त्यांचा सर्व डाटा बहुतेक प्रसंगी ‘सिक्रेट’ ठेवणे हे जरी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असले तरी त्याबाबतचे विज्ञान लोकांपर्यंत मधूनमधून पोचले पाहिजे. तरच ते विज्ञान. नाहीतर त्यात आणि अंधश्रद्धेत काय फरक? मला वाटते ज्ञान या शब्दांचे व्यवहारिक रुपांतर अज्ञानात होऊ द्यायचे की विज्ञानात करायचे हे आपण ठरवायचे आणि त्याप्रमाणे धोरण आखायला हवे. तसेच त्या धोरणांत प्रसंगानुसार लवचिकता देखील असली पाहिजे. मला आठवते की कॉलेजात असताना आमचा एक खास ग्रुप प्रवास करून पटना येथून मुंबईला आला व तुर्भे येथील अणुऊर्जा केंद्र आणि अप्सरा अणुऊर्जा प्रकल्प आम्हाला दाखविण्यात आला होता. का, तर कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन यावा हा पंतप्रधान नेहरूंचा आग्रह होता. मात्र हे धोरण म्हणून जाहीरपणे, प्रत्येक संस्थेत व्हायला हवेे. गेल्या वर्षी अमेरिकेत बर्कले युनिव्हर्सिटीत मित्राला भेटायला गेले तर तिथे सुमारे दोन-अडीचशे लहान मुलाचा गट- वय ६-१२ आलेला होता आणि युनिव्हर्सिटीची काही मुले त्यांच्याबरोबर दिवस घालवणार होती. त्यांना प्रयोगशाळा दाखवणार होती, खेळणार होती. शिक्षण म्हणजे काय आणि कशाला, या गप्पा करणार होती. आणि असे बहुतेक प्रत्येक संस्थेत होते. भावी पिढी कशी निर्माण करतात हे ते चित्र दिसत होते. असे चित्र आपल्या देशातही वारंवार दिसावे. तथास्तु!
Comments