यक्षप्रश्न -- मराठी

वाचन या सदरासाठी शब्दांकन - लीना मेहंदळे  सकाळ साठी शब्दांकन -- राधिका कुंटे

 लहानपणी आपण जे वाचतो, ऐकतो नि पाहतो ते आपल्या स्मृतीमध्ये स्कॅन केल्यासारखं राहतं. त्यातील एखाद्या भावलेल्या गोष्टीसंबंधी विचार आपल्या नकळत चालू राहतात. माझे वडील संस्कृतचे प्राध्यापक होते. त्यांच्या पुस्तकाच्या संग्रहातून मी महाभारत काढून वाचलं होतं. `यक्षप्रश्ना`चा भाग खास करून त्यातील दोन प्रश्नांची उत्तरं माझ्या मनात ठाण मांडून बसली होती. याच विषयावरील एक पुस्तक हाती लागलं ते म्हणजे- आचार्य निशांतकेतूलिखित `सनातन यक्षप्रश्न` हे हिंदीतील पुस्तक. या पुस्तकात महाभारतातल्या याच संदर्भाचे विवेचन आहे. द्युतात राज्य हरून पांडव वनवासी होतात. एक दिवस त्यांच्याकडं एक ऋषि येतात. `यज्ञाच्या तयारीत एक हरीण वारंवार येऊन अडथळा आणतंय. त्या हरीणाचा बंदोबस्त करा, अशी विनंती ऋषिवर्य करतात. हरीणाचा पाठलाग करता करता या पाच भावंडांना तहान लागते. पाण्याच्या शोधार्थ सहदेवास पाठवलं जातं. तो येत नाही, म्हणून पाठोपाठ नकुल, अर्जुन, भीमास पाठवलं जातं. अखेरीस युधिष्ठिरच त्यांचा शोध घेत घेत एका तळ्यापाशी पाणी प्यायला जातो. तिथं हे चारहीजण मृतप्राय अवस्थेत पडलेले दिसतात. त्यांचा विचार करता करता तो तळ्यापाशी पाणी प्यायला जातो. तेवढ्यात यक्षाचा आवाज येतो की, `माझ्या प्रस्नांची योग्य उत्तरं दिल्याखेरीज पाणी पिता येणार नाही. तसं केलंस तर तुझ्या भावांसारखीच तुझी स्थिती होईल.` हे ऐकल्यावर युधिष्ठिर नम्रपणं म्हणाला की, `मी तुमच्या प्रश्नांना माझ्या ज्ञानानुसार जमतील तशी उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन.` यक्षाने युधिष्ठिराला विचारलेल्या एकेका प्रश्नात 2-3 उपप्रश्नांचा समावेश होता. असे एकूण 36 मुख्य प्रश्न विचारण्यात आले. प्रश्नांची समर्पक उत्तरं मिळाल्याने यक्ष प्रसन्न झाला. `शेवटच्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित दिलंस तर पाणी प्यायला देईन,` असं तो म्हणाला. या शेवटच्या प्रश्नातही काही उपप्रश्न होतेच. `माणसाने जावी अशी चांगली वाट कोणती?` यावर `ज्या रस्त्याने पूर्वीची आदर्श माणसं गेली ती वाट चोखाळावी,` हे युधिष्ठिराचं उत्तर `महाजनो येन गत: स पंथ:` अजूनही प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न होता- `जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं?` याचं उत्तर होतं की, `रोजच्या रोज माणसं मरताना समोर दिसत असूनही माणूस संपत्ती साठवायच्या मागे असतो.` यावर यक्ष खुश झाला आणि पाणी प्यायची परवानगी देऊन शिवाय चारपैकी एका भावाला जिवंत करण्याचा वरही त्यानं दिला. युधिष्ठिराने नकुलाला जिवंत करण्यास सांगितलं, तेव्हा यक्षालाही आश्चयर्य वाटलं. त्यानं `भीमार्जुनासारख्या बलाढ्य भावांऐवजी नकुल कशाला?` असा प्रश्न विचारला. यावर युधिष्ठिराने, `माझी न्यायबुद्धी सतत जागरूक रहावी, माझ्या दोन आई कुंती आणि माद्री मला सारख्याच आहेत. कुंतीपुत्र मी, तसाच माद्रीपुत्र नकुलही जिवंत रहावा, असं माझी न्यायबुद्धी मला सांगते,` असं सांगितलं. यावर संतुष्ट होऊन यक्षाने चारही भावांना जिवंत केलं. आपली न्यायबुद्धी जागरूक असेल तर त्याचं फळ लगेच मिळतं, हेच यातून दिसतं. या गोष्टीतून युधिष्ठिराचे न्यायप्रियता, सत्यवादी असे गुण सामोरे येतात. महाभारतातल्या टॉपटेन प्रसंगांपैकी हा एक प्रसंग म्हणावा लागेल. वाचायला सोपं आणि सहज असणा-या या पुस्तकात शब्दांचे अर्थ आणि मीमांसाही करण्यात आली आहे. या पुस्तकाची चांगली 2-3 वेळा पारायणं करायचेत... तरच त्यातल्या गहन अर्थाचे कण तरी हाताशी गवसतील.

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

एक शहर मेले त्याची गोष्ट

उद्धव गीता भाग १ -- भांडारकर व्याख्यान दि. १२ जून २०१९