विपश्यना – मला समजलेली

विपश्यना – मला समजलेली
--- लीना मेहेंदळे
बघता बघता तिस-या सहस्रकाचे आणि एकविसाव्या शतकाचे पहिले दशकही संपत आले. या काळात वेगाने आलेले जागतिकीकरण, आर्थिक तेजी आणि आता आर्थिक मंदी आपण पाहिली. जगातील बहुतेक व्यवहार याच वाटेने पुढे जात राहणार आहेत. यामधे जीवनावरील आपली पकड हरवत आहे का असा प्रश्न पडतो.
नुकताच माझ्या मोठ्या मुलाबरोबर मोटिव्हेशन च्या मुद्दावर संवाद चालू होता. अशा वेळी तो पटकन्‌ विद्यार्थ्याच्या भूमिकेत येतो - गंभीरपणे चर्चा ऐकतो आणि फारच मूलभूत प्रश्न विचारतो. मी विचारले - माणसाने स्वत:चे मोटिव्हेशन कसे करावे, इतरांचे कसे करावे, कसे टिकवावे याबद्दल खूप वाचायला मिळते. पण माणूस दुस-याला मोटिव्हेट का करतो किंवा का करू पाहतो याचा उहापोह कोणी करत नाही. मी केला आहे, पण मला बघायचं आहे की तू कांही कारणे सांगू शकशील कां ? यावर मिनिटभर विचार करून तो म्हणाला - नाही सांगू शकणार, कारण या प्रश्नाच्या उत्तराच्या आधी माणूस का जगतो या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे असे मला वाटते.
मी म्हटले - ठीक आहे, त्याचे उत्तर सांग - तो म्हणाला - तेही मला नीट सांगता येणार नाही. पण ढोबळ मानाने असे म्हणेन की आपला वंश, आपली प्रजा, निर्माण होत रहावी आणि पुढे चालत रहावी ही ऊर्मी सर्व जिवंत प्राण्यांमधे असते. सर्व प्राणीमात्र त्यासाठी जगतात. पण ही झाली नव्वद टक्के प्रेरणा, नव्व्याण्णव म्हणू हवं तर ! आणि ही प्रेरणा, यच्चयावत प्राणीमात्रांमधे असते. मात्र कांहीतरी इतर प्रेरणा आहे - ती एक टक्का असेल, दहा टक्के असेल, पण त्या प्रेरणेमुळेच माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा वागतो. एवढ मला कळतं. ती प्रेरणा नेमकी कांय असते हे माहीत नाही, आता तू सांग !
याबाबत मला जे कळते ते मी सांगितले. कुठेतरी वाचले होते की संस्कृतात एक असे सांगितले आहे की सर्वात प्रबळ धातु म्हणजे भव (असणे) कुरू (करणे) व पश्य (पहाणे). माणसाने असावं (जगावं), कर्म करत रहावं आणि पहावं. पण हे पहाणं कसं ? तर विशेष रूपाने पहावं. विचारपूर्वक पहाव, प्रज्ञेन पश्य असं जे पहाणं ते विपश्यना. कर्म करणं आणी विचारपूर्वक त्याची फळे पहाणं, त्यांचा शोध घेणं ही माणसाच्या जगण्यामागील एक मोठी प्रेरणा असते.
मी यशदामधे डायरेक्टर असतांना सर्वप्रथम माननीय गोयंका गुरूजी यांची विपश्यना विषयावर एक चित्रफीत पाहिली होती, त्यानंतर नाशिकला विभागीय आयुक्त असल्यामुळे इगतपुरी येथील विपश्यना केंद्राची माहिती झाली. ते विचार कांही काळ मनांत रूजल्यानंतर मी विपश्यनेचा दहा दिवसांचा अभ्यासवर्ग पूर्ण करण्याचे ठरवले. एकदा केल्यानंतर मला त्याची उपयुक्तता आणि प्रासंगिकता एवढी पटली की विदेशी जाऊ घातलेल्या धाकट्या मुलाला इमर्जन्सीची शिदोरी म्हणजे विपश्यनाच असे वाटले व त्याला उत्साहवर्धन म्हणून त्याच्या सोबतीसाठी मी दुस-यांदा पुन्हा हा अभ्यासवर्ग पार पाडला. आता मी पुढील मोठ्या कालावधीच्या अभ्यास वर्गासाठी तयार आहे. त्याच बरोबर अगदी छोट्या कालावधीसाठी - (म्हणजे 1 ते 2 तास) एकटे बसून विपश्यना ध्यान करावे असे गुरूजी सांगतात. ते मी क्वचितच करते, पण केल्यावर तत्काळ त्याचे लाभ मिळतात, हे मी अनुभवातून सांगू शकते.
कित्येकांना ढोबळमानाने हे माहित आहे की विपश्यना ही एक ध्यानाची पद्घती आहे व भगवान बुद्घांनी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी ही पद्घती लोकांसमोर आणली. आताच्या काळात गोयंका गुरूजींनी भारतात व जगभर याचा प्रचार केला आहे. या ध्यानाचा लाभ कांय याचे उत्तरही ढोबळ मानाने सर्वांना माहीत आहे - मन:शांती मिळते, तणाव कमी होतात - स्वास्थ्य लाभ होतो.
याबाबत माझे दोन वैयक्तिक अनुभव सांगण्यासारखे आहेत. एकदा अचानकपणे मी एका कडाक्याचा थंड जागेत अडकले - अंगावर साधेच कपडे होते. कांही वेळ त्रास काढल्यावर मी थोडा काळ विपश्यना ध्यान केले - त्याने माझा थंडी वाजण्याचा त्रास तत्काळ थांबून पुढचे दोन - तीन तास मी कांही त्रास न होता काढू शकले. याच प्रमाणे एकदा माझे दोन्ही गुडघे खूप दुखू लागले. दोन तीन महिने तात्पुरते गोळ्या औषध घेऊन उपयोग झाला नाही. त्याच काळांत पंतप्रधान असलेल्या अटलजींच्या दुख-या गुडघ्यांवर ऑपरेशन झालेले होते. ती वेळ माझ्यावर येणार कांय म्हणून मी घाबरले होते. पण एका भल्या पहाटे जाग आली, विपश्यना करावी अशी अंत:प्रेरणा झाली. आधी तीन तास आणि मग पुन्हा वाटले म्हणून पुन्हा एक तास अशी विपश्यना केल्यावर मला जाणवले की गुडघे दुखी संपलेली आहे - ती आजपर्यंत पुन्हा उपटली नाही. त्यामुळे विपश्यनेचा सर्वात पहिला फायदा म्हणजे स्वास्थ्य लाभ.
या पेक्षा खोलात गेलो तर आपल्याला वेगळी आणि जास्त महत्त्वाची उत्तरे सापडतात. पण त्या आधी विपश्यना ध्यान कसे करतात ते समजून घेऊ या.
या ध्यानाचे दोन टप्पे आहेत - आनापान - हा तयारीचा टप्पा आणि विपश्यना - हा प्रत्यक्ष ध्यानाचा टप्पा. यापैकी आनापान ही पुढील विपश्यनेसाठी लागणारी शिदोरी असते. जास्त काळ विपश्यना करायची असेल तर त्याची पूर्वतयारी म्हणून जास्त काळ आनापान.
आनापान म्हणजे येणारा श्वास आणि जाणारा श्वास यांना पाहणे - संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करणे - त्यावेळी दुस-या कशाचाही विचार न करणे. आनापान करीत असतांना आपण खालील गोष्टी टप्प्याटप्प्याने शिकत जातो -
1. येणा-या व जाणा-या श्वासावर ध्यान केंद्रित करणे, फक्त त्याचाच विचार करणे.
2. आपला येणारा व जाणारा श्वास कसा आहे ते मन:चक्षूंनी पहाणे - उष्ण की शीतल, उथळ की दीर्घ, कोरडा की ओलावा घेऊन? अशा प्रकारे त्याची क्षणोक्षणी त्याची दखल घेणे.
3. या श्वास व उच्छवासामुळे दोन्ही नाकपुड्यांच्या टोकाला कांय संवेदना होतात त्यांची दखल घेणे.
4. दोन्हीं नाकपुड्यांच्या आत दोन्ही डोळ्यांच्या मध्यबिंदुपर्यंत, तसेच नाकपुड्या व खालचा ओठ यांच्या मधील भागावर कांय कांय संवेदना होतात - रूक्षता वाटते की ओलावा वाटतो, हुळहुळण्याची संवेदना होते की खाजविण्याची, जडपणा जाणवतो की हलकेपणा - या सारख्या होणा-या सर्व प्रकारच्या संवेदना तपासणे.
या प्रकारे संपूर्ण लक्ष देऊन संवेदनांची जाणीव करून घेणे, त्यांची स्वभाव - प्रकृती ओळखणे व दरक्षणाला ती ओळख करून घेत रहाणे हीच आनापानाची क्रिया दीर्घकाळ सतत चालू ठेवल्याने मनांत प्रचंड स्थैर्य येते, श्वासाला एक लय मिळते व ती टिकून राहू लागते.
इगतपुरीला दहा दिवसांचा अभ्यासवर्ग असेल तर तीन दिवस आनापान आणि तीस दिवसांचा अभ्यासवर्ग असेल तर 10 दिवस आनापान करवून घेतात. घरी बसून 1 तास विपश्यना करायची असेल तर पहिली दहा - पंधरा मिनिटे आनापान करावे लागते. तसेच अभ्यासवर्गाच्या संपूर्ण कालावधीत (झोप व विश्रांतीच्या काळात सुध्दा) संपूर्ण मौन, मिताहार, कोणतेही लेखन - वाचन - संगीत - कला असे इतर कांहीही करायचे नाही. शिकवणा-यांच्या प्रती कृतज्ञता भाव बाळगायचा हे सर्व प्रारंभिक धडे सांगितलेले असतात.
आनापान करण्यामुळे शिबिरातील रूटीनची आपल्याला सवय होऊन जाते. सकाळी चार वाजता घंटेच्या मेघगंभीर नादाने सर्वांना जाग येते मग पंधरा-वीस मिनिटात ध्यानाच्या हॉल मधे आपल्या जागेवर जाऊन डोळे मिटून आनापानाची सुरूवात करायची ती दोन तास. पुढे नाश्ता, आंघोळ इत्यादी नंतर आठ वाजता पुन्हा ध्यानाला सुरूवात ती जेवणापर्यंत. जेवण विश्रांतीनंतर पुन्हा रात्री नऊ वाजेपर्यंत. मधे मधे दर दीड-दोन तासांनी दहा पंधरा मिनिटांची सुट्टी मिळते, ती सुध्दा कोणाशी बोलण्यासाठी नाही. रात्री दहा वाजता सर्व दिवे बंद - सर्वांना विश्रांती सक्तीची कारण दुस-या दिवशी पुन्हा चार वाजता उठायचे असते.
हे वर्णन वाचताना कठीण वाटतं पण सुरूवात केल्यानंतर ते सोपं होऊ लागतं.
दुस-या टप्प्यांत आपण प्रत्यक्ष विपश्यना ध्यानाची पद्घत शिकतो. गोयंका गुरूजींचे शब्द वापरायचे तर शील, प्रज्ञा आणि समाधी यापैकी प्रज्ञेचा टप्पा सुरू होतो. यामधे आपण श्वासोच्छासावरून लक्ष विचलीत न करता पण त्याच्याबरोबरच डोक्याच्या मध्यभागी उद्भवणा-या संवेदनांची जाणीव करून घ्यायची. या भागाला ब्रह्मरंध्र किंवा ख-मस्तिष्क अशी नावे आपल्या ऋषिमुनींनी सांगून ठेवली आहेत.
एक पूर्ण दिवस ब्रह्मरंध्रावर उत्पन्न होणा-या संवेदनासाठी दिल्यावर पुढील तीन दिवस आपण एकेक करून शरीराच्या इतर भागातील संवेदनांचा परिचय करून घेतो.
गुरूजी दुर्बीणीचे एक छान उदाहरण देतात. आपण एकदा का दुर्बीणीची लेन्स फोकस करायला शिकलो की पाहू ती गोष्ट आपल्याला जास्त स्पष्टपणे बघता येते. श्वासोच्छासावर ध्यान केंद्रित करणे हे दुर्बीणीच्या लेन्ससारखे आहे. त्याच्या सोबतीने आपण शरीरातील इतर संवेदनांचा मागोवा घेतो तेव्हा आपल्याला सूक्ष्मातील सूक्ष्म संवेदना ओळखू येतात -दिसू लागतात.
पण विपश्यना नावाचे पाहणे इथे संपत नाही. याच काळात आपल्याला अजून एक गोष्ट अनुभवायची असते. ती म्हणजे या संवेदनांची नश्वरता - त्यांची क्षणिकता. संवेदना येतात आणि जातात. मागच्या क्षणात जी संवेदना जाणवली आणि विरली तिची अनुभूती याक्षणी आपण घेऊ शकणार नाही. याक्षणी दुसरी एखादी संवेदना आपल्याला जाणवेल. म्हणूनच त्या संवेदनाच्या मोहात पडायचे नाही, त्यांच्याबाबत अनुराग किंवा तिटकारा ठेवायचा नाही. ही संवेदना मला हवीशी आहे, आणी ती नकोशी आहे असा भाव मनात ठेवायचा नाही. उद्भवला तरी काढून टाकून मनाला समजावयाचे की तू फक्त पहा - द्रष्टा बन -तेवढीच भूमिका ठेव- साक्षीभाव ठेव- ‘मी उपभोक्ता’ हा भाव ठेऊ नकोस. मला हे हवे, ते नको असं फक्त उपभोक्ताच म्हणेल, साक्षीभावाने पहाणारा असं म्हणणार नाही.
आणखीन एक गोष्ट शिकायची असते. आपल्या या संवेदना कुठून येतात? भगवान बुध्दांनी उत्तर दिले- संस्कारातून येतात. जन्माला आल्यापासून आपण जे जे काही ज्ञान किंवा अनुभूती ग्रहण केल्या असतील त्यांच्यावर आपले मन एक एक लेबल चिकटवत जाते -- हे प्रिय आहे आणि हे अप्रिय आहे. मग जे जे प्रिय त्यासाठी मनात एक अभिलाषा आणि अप्रियासाठी एक विद्बेष निर्माण होतो, हे अभिलाषा आणि विद्बेष आपल्या मेंदूत कुठेतरी कोरून ठेवले जातात. हेच संस्कार.
आधुनिक काळातील मनोविज्ञानाचे शिक्षण म्हणतील - हे संस्कार म्हणजेच आपल्याला पुढे नेणारे, जगण्याला प्रवृत्त करणारे प्रवर्तक आहेत - मोटिव्हेटर आहेत. माणसामध्ये सुखोपभोग, संपत्ती, यश, किर्ती, समृध्दी यांची अभिलाषा यातूनच निर्माण होते. पण या तृष्णेमुळे माणूस कसा वागतो याचे छान वर्णन भगवद्बगीतेच्या सोळाव्या अध्यायात आहे –
इदमद्य मया लब्धं - आज मी हे मिळविले आहे.
इदं प्राप्स्ये मनोरथम्‌ - पुढे मी माझे ते मनोरथ प्राप्त करून घेणार आहे.
इदमस्तीदमपि मे- आज माझ्याकडे इतकी धनसंपत्ती आहे.
भविष्यति पुनर्धनम्‌ - मग माझ्याकडे इतके धन येईल.
ईश्वरोSहम् - मी ईश्वरच आहे.
कोन्योSस्ति सदृशो मया- माझ्यासारखं या जगात कोण आहे?
अशा प्रकारे अभिलाषेच्या मोहजालात सापडून माणूस भ्रमित होतो.
भगवान बुध्द म्हणताता - हे अभिलाषा व विद्बेषाचे संस्कार आपल्या मेंदूवर कोरले जाऊन थांबत नाहीत, तर ते आपल्या नकळत आपल्या शरीरात संवेदना निर्माण करतात - सुखद आणि दुःखद. आपल्या नकळत त्या आपल्याला हव्याशा किंवा नकोशा वाटत राहतात आणि या वाटण्यामुळे मूळ संस्कार अधिक गडद होत जातात. गडद खोलवर रुतलेल्या संस्कारातून निर्माण होणा-या कित्येक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे रोग.
पण विपश्यना ध्यानाच्या माध्यमातून आपण जागरूकपणाने या संवेदनांकडे पाहू लागलो आणि त्यांच्याकडे केवळ साक्षीभावाने पहायचे, त्यांच्याबद्दल हवीशी आणि नकोशी हा भाव उत्पन्न न होऊ देता पहायचे - हे आपण शिकलो, तर मूळ संस्कार विरळ होत जातात. मग आपल्या मनाला हवं तस भरकटत ठेवण्याची त्यांची क्षमता संपून जाते. सर्व राग, लोभ, द्बेष, क्रोध, तृष्णा संपून जातात. रोगांचीही निवृत्ती होते. साक्षीभावाने संवेदनांच्या माध्यमातून अनुभूत केलेले सर्व संस्कार विरू लागतात, त्यांचा प्रत्येक ओरखडा पुसला जातो - मन आरशाप्रमाणे चकचकीत स्वच्छ होऊन जाते - त्यामध्ये आपण आपले स्वत्व पाहू लागतो. हीच बोधी अवस्था - मुक्ततेची आणि निर्मळतेची, मग त्यातून उठणारे आनंदाचे तरंग हाच बोधीसत्वाचा स्थायीभाव बनून राहतो.
अशा प्रसन्नवदन व्यक्तीकडे सर्वजण आकृष्ट होतात. तो समाजात सत्याची, अहिंसेची, शांतीची, समतेची आणि एकजुटीची प्रस्थापना करतो. वादाच्या प्रसंगी सुसंवाद आणि समरसता निर्माण करण्यासाठी लोक त्याच्याकडे आशेने पाहू लागतात. अशावेळी त्या अनंतबोधी प्राप्त झालेल्या महात्म्याने काहीही न केले तरी त्याचे काय नुकसान? पण तसे होत नाही - बोधी प्राप्त महात्म्याच्या मनात अपार मैत्री, करुणा, विश्वबंधुत्व वास करू लागतात आणि आपोआप त्याच्या तोंडून शब्द निघतात – “बहुजन हिताय बहुजन सुखाय।”
हीच बोधीसत्वाची खूण. स्वत: अनंत प्रज्ञावान होऊनसुध्दा तो इतरांच्या हितासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी झटतो. त्यांना देखील बोधीमार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करतो. माणूस दुस-याला मोटिव्हेट कां करू पहातो? मला वाटतं याचं मोठं कारण की त्याला इतरांची प्रतिभा दिसते तेंव्हा त्याबद्दल जळफळाट न वाटता एक प्रकारचा आनंद वाटून त्याची ती प्रतिभा बहरावी असं ज्याला वाटतं तोच खरा मोटिव्हेटर होऊ शकतो. यासाठी अपार मैत्रीभाव हवा, जो विपश्यनेने मिळतो. बोधीमार्गावर जातांना जे जे कोणी त्यामार्गाने जेवढी वाट चालू शकतील, तेवढे त्यांची तृष्णा, रागद्बेष, रोग-क्षोभ, तणाव कमी होतील. मन याचं निर्मळ, शांत, आनंदमय होईल. त्यांच्याकडून इतरांचे कल्याण होईल. सर्वाचे मंगल होईल. सर्वाचे मंगल होवो - याच प्रार्थनेने विपश्यनेची सांगता होते - दर दिवसाची आणि दर ध्यानसमाधीची.
भवतु सब्ब मंगलम्‌ । भवतु सब्ब मंगलम्‌ । भवतु सब्ब मंगलम्‌।
----------------------------------------------------------
म.टा. प्रतिक्रिया
खूप 'ऊर्जा' वाचेल
' गेस्टरूम'मधील (दि. ८ जून) लीना मेहेंदळे यांचा लेख वाचनात आला. बोधिसत्व, विपश्यना, अध्यात्म व विज्ञानातले दाखले देत सत्यनिष्ठाच भारतीय समाजाला तारून नेईल असे त्यांनी म्हटले आहे. शासनदरबारातील एक उच्चपदस्थाकडील ही जाणीव सर्वच नागरिकांपर्यंत पोचण्याची गरज आहे. खूप 'ऊर्जा' वाचेल. कामामध्ये 'सहज'पणा येईल.
शेखर छत्रे, काळाचौकी
------------------------------------

Comments

sujay said…
mi punyala observation home madhe jat asatana tithehi vipashyanecha chan upayog hoto asa tethil madamni sangitala.

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

एक शहर मेले त्याची गोष्ट

उद्धव गीता भाग १ -- भांडारकर व्याख्यान दि. १२ जून २०१९