अजून खूप काही करायचं आहे...

अजून खूप काही करायचं आहे...
(मुलाखत -- दै. सकाळ, दि. 14.3.2009
शब्दांकन ः वैशाली चिटणीस vaishali chitnis
धन्यवाद, वैशाली)
...........................
लीना मेहेंदळे
...........................
देशातलं प्रशासन बिघडत चाललंय असं त्यावेळी आम्हाला वाटे. प्रशासनात इतका भ्रष्टाचार आहे तर तिथं जाऊन तुम्ही काय करणार, असा प्रश्‍न विचारला जाई. आमचं उत्तर असे, की निदान एवढं तरी समाधान असेल की एक तरी अधिकारी भ्रष्ट नसेल. आजही आयएएस अधिका्-याची प्रतिमा देशाला धोरणं देणारा, देशाच्या प्रगतीची जबाबदारी पार पाडणारा, देशाच्या प्रगतीत ज्याचा वाटा आहे अशीच आहे.
----------------------------
माझे वडील बिहारमध्ये दरभंगा इथं संस्कृत आणि फिलॉसॉफीचे प्राध्यापक होते. त्यामुळे मी वाढले तिथं. महाराष्ट्रातले आयएएस अधिकारी तिथं आले, की त्यांचं हमखास वडिलांकडे येणं-जाणं असे. त्यामुळे आपणही प्रशासकीय सेवेत जावं, त्यासाठीची परीक्षा द्यावी, असं मला वाटायला लागलं. खरं तर माझा अगदी बेसिक इंटरेस्ट होता तो फिजिक्‍समध्ये. त्यातच एम.एस्सी. करून मी पीएच.डी.साठी रजिस्ट्रेशनही केलं होतं. शिवाय कॉलेजमधे शिकवतही होते. तो माझा खरोखरंच आवडता विषयच आहे. त्यातले सिद्धांत वाचायला, समजून घ्यायला मला फार आवडत. आणि मग असंही वाटायचं, की हे सिद्धांत समजून घेणंच मला इतकं आवडतं तर ते मूळ ज्यांनी मांडले त्यांना या सिद्धांतांनी किती आनंद दिला असेल!
पीएच.डी.साठी मी रजिस्ट्रेशन केलं होतं ते याच भावनेतून. पण तरीही वळले प्रशासनाकडे. त्यामागचं कारण होतं त्या काळातली परिस्थिती. 1962 चे चीनबरोबरचं युद्ध आपण अनुभवलं होतं. 1971 चं पाकिस्तानबरोबरचं युद्ध आपण जिंकलो होतो. या दहा वर्षांच्या काळात बरीच स्थित्यंतरं झाली होती. देशातलं प्रशासन बिघडत चाललंय असं त्यावेळी आम्हाला वाटे. प्रशासनात इतका भ्रष्टाचार आहे तर तिथं जाऊन तुम्ही काय करणार, असा प्रश्‍न विचारला जाई. आमचं उत्तर असे, की निदान एवढं तरी समाधान असेल की एक तरी अधिकारी भ्रष्ट नसेल. आजही आयएएस अधिकाऱ्याची प्रतिमा देशाला धोरणं देणारा, देशाच्या प्रगतीची जबाबदारी पार पाडणारा, देशाच्या प्रगतीत ज्याचा वाटा आहे अशीच आहे.
इथे या क्षेत्रात आल्यावरही माझी फिजिक्‍सची आवड कमी झालेली नाही. उलट फिजिक्‍सचा तत्त्वं इथे प्रशासनातही लागू पडतात, हे मला इथं काम करताना जाणवायला लागलं आणि फिजिक्‍समधला माझा इंटरेस्ट आणखी वाढला. आता याचं उदाहरणच द्यायचं तर एक विशिष्ट उदाहरण देता येईल. इलेक्ट्रॉनिक्‍समध्ये ट्रायोड नावाचं उपकरण असतं. त्याला एक इनपुट असतो; एक आऊटपुट असतो. त्याच्या आऊटपुट पैकी एक छोटा सिग्नल इनपुटला दिला की त्याची कार्यक्षमता वाढते. त्या छोट्या सिग्नलला फीडबॅक म्हणतात. हेच तत्त्व प्रशासनातही लागू पडतं. आम्ही योजना राबवितो. त्या राबवीत असताना त्यासाठी लोकांकडून फीडबॅक घेतला तर त्याचा चांगला परिणाम होतो. हा फीडबॅक इनपुटच असतो. त्यामुळे मी कोणतीही योजना राबविते, तेव्हा माझ्यासाठी लोकांचा फीडबॅक खूप महत्त्वाचा असतो. तो मला मिळत रहावा यावर माझा कटाक्ष असतो आणी गरज असेल तर मी माझे मासिक अहवाल असे दुरुस्त करून घेते जेणेकरून मला नेमका फीडबॅक मिळावा. त्यानुसार त्या योजनेत काय बदल करायचा, ती कशी राबवायची हे मला ठरवता येतं.
मी वाढले बिहारमध्ये. महाराष्ट्रात येणं-जाणंही व्हायचं. साहजिकचं या दोन राज्यांची तुलना होणंही स्वाभाविक आहे. मला तरी असं वाटतं, की महाराष्ट्राचं आहे त्यापेक्षा जास्त उठावदार चित्र रंगवलं जातं आणि बिहारचं आहे त्यापेक्षा जास्त काळंकुट्ट! बिहार हे एक वाईट राज्य आहे, असं म्हणण्यापेक्षा बिहार हे एक वेगळं राज्य आहे, असं मी म्हणेन. बिहार म्हणजे एकेकाळचा मगध. चाणक्‍य, समुद्रगुप्त यांची परंपरा असलेला हा मगध देश. त्याकाळी असं म्हटलं जायचं, की आज मगध जे करील ते उद्या देश करील. आजही तसंच आहे; पण दुर्दैवाने वाईट गोष्टींच्या बाबतीत. बिहार आज जे करील ते देश उद्या करील.
बिहारमधली अत्यंत चांगली जमीन ही त्यांच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट ठरली आहे, असं मी म्हणेन. अत्यंत सुपीक जमीन, भरपूर खनिज संपत्ती असूनही बिहारचा विकासच झाला नाही. बिहार हा कोळसा, शिसं, अभ्रक, ऍल्युमिनियम अशा खनिजांची खाण आहे. पण तिथं औद्यागिक विकासच होऊ शकला नाही. त्यामुळे तिथली अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. महाराष्ट्राला आहे, तसा शैक्षणिक वारसाही बिहारला लाभला नाही. महाराष्ट्रात जशा सामाजिक सुधारणा झाल्या, लोकमान्य टिळक, कॉम्रेड डांगे, अच्युतराव पटवर्धन, विनोबा भावे, सावरकर अशा दिग्गजांनी लोकांचं राजकीय शिक्षण केलं, तसं बिहारच्या बाबतीत झालं नाही. तिथलं आपल्याला माहीत असलेलं राजकीय सामाजिक क्षेत्रातलं मोठं नाव एकच. ते म्हणजे डॉ. राजेंद्रप्रसाद. महाराष्ट्रात राजकीय व्यक्तींबरोबरच महात्मा फुले, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे अशी सामाजिक क्षेत्रातल्या विचारवंतांची फौज उभी राहिली. तसं बिहारमध्ये झालं नाही.
महाराष्ट्रासारखीच बिहारला संतपरंपरा मात्र लाभली आहे. बिहारवर कबीर, सूरदास, मीरा यांचा चांगलाच प्रभाव आहे. पूर्वी बिहारमधून जे लोक पोटासाठी मॉरिशस, त्रिनिदाद अशा देशांमध्ये गेले, त्यांनी आपल्याबरोबर काय नेलं, तर तुलसीरामायण. त्यांच्यासाठी आजही तुलसीरामायणाची पॉकेट आवृत्ती छापली जाते, तिला "गुटखा' असं म्हणतात. या संतांचा बिहारी माणसावर फार प्रभाव आहे. पण त्याला सामाजिक-राजकीय सुधारणांची जशी जोड महाराष्ट्राला, बंगालला मिळाली तशी बिहारला मिळाली नाही. राजेंद्रप्रसाद आणि जयप्रकाश नारायण वगळता राजकीय सामाजिक क्षेत्रातलं नेतृत्वच बिहारला मिळालं नाही. त्यामुळे शिक्षणाचा अभाव, घोर दारिद्य्र हाच बिहारचा चेहरा आहे. हेच "भांडवल' घेऊन तिथली माणसं पोटासाठी देशभर फिरतात तेव्हा बिहारचं चित्र आणखीनच भेसूर दिसतं.
बिहारमध्ये वाढल्यामुळे मला हिंदी चांगलं यायला लागलं. बिहारमुळेच बंगालीही बोलता येतं, समजतं. घरचं वातावरण मराठी आणि वडील संस्कृतचे प्राध्यापक असल्यामुळे संस्कृतची आवड निर्माण झाली आणि इंग्रजी तर आवश्‍यकच होतं. पण त्यामुळे माझी सगळी विचारप्रक्रिया हिंदी, मराठी या भाषांमधून होत असते. भाषेच्या या पूर्वसंचिताचा मला माझ्या कामात चांगलाच उपयोग होतो. मुळात ही सगळी प्रक्रिया मी एन्जॉय करीत असते. मला आठवतं, मी ब्रॅडफोर्डला ट्रेनिंगसाठी गेले होते, तेव्हा आमच्याबरोबर श्रीलंकेचा एक मुलगा होता. आम्ही सिंहली भाषेवर चर्चा करीत होतो. याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात वगैरे सुरू होतं. विषय भाज्यांवर आला. त्यातही कारल्यावर. त्यानं सिंहली भाषेतली एक म्हण सांगितली. तिचे शब्द मला आता आठवत नाहीत; पण त्याचा हिंदीत शब्दशः अर्थ होता तो एका हिंदी म्हणीशी तंतोतंत जुळणारा. "करेला तो करेला उपर से नीमचढा"... अगदी हीच म्हण अशीच सिंहली भाषेत होती. हे असं काहीतरी सापडतं तेव्हा मला खूप आनंद होतो. माझं सगळंच काम मला असं काहीतरी सापडत जातं म्हणून मी एन्जॉय करीत आले आहे.
मी पेट्रोलियम खात्यात असताना रेडिओ; तसंच दूरदर्शनवर आम्ही आठवड्यातून एकदा ऊर्जा-बचतीवर कार्यक्रम करायचो. ऊर्जाबचत का करायची, कशी करायची, असा तो कार्यक्रम होता. त्याच दरम्यान मी पुणे जिल्ह्यात एका आश्रमशाळेत गेले होते; तर तिथल्या मुलांनी मला सांगितलं, की आम्ही तुमचा हा कार्यक्रम बघतो आणि तो आम्हाला फार आवडतो. आपण जे काही करतो ते लोकांपर्यंत पोहोचतं आणि ते त्यातून काहीतरी घेत असतात हे दिसलं, की केल्याचं सार्थक वाटतं. आणखी काही करायचा उत्साह वाढतो. हा उत्साह, टेक्‍नॉलॉजीशी वाटणारी जवळीक यातूनच मी वेगवेगळ्या गोष्टी करून बघितल्या आहेत. मला आणखी एका अनुभवाबद्दल सांगायचंय. मी नाशिकला होते तेव्हाची गोष्ट आहे.
आपण मधमाशा पाळाव्यात, असं माझ्या मुलाला वाटलं. माधमाशा पालनाच्या त्या संस्थेमधल्या माणसानं आम्हाला सांगितलं, की त्यासाठी मधमाशांना तुमच्याशी मैत्री करावीशी वाटली पाहिजे. त्यासाठी मधमाशांना तुमच्याशी खेळू द्या, तुमच्या अंगाचा वास घेऊ द्या. त्याची सवय होऊ द्या. पाळलेल्या मधमाशा चावत नसतात. ती तुमच्या अंगावर येऊन बसेल तेव्हा तुम्ही मनातल्या मनात असं म्हणायचं, की आपण मैत्रिणी आहोत. तुम्ही असं म्हणाल तेव्हा त्यांनाही एक सकारात्मक संदेश जाईल आणि त्या तुमच्याशी मैत्री करतील. माझा मुलगा म्हणायला लागला की आपण करू या हा प्रयोग. आम्ही केला. आम्ही नाशिकला असेपर्यंत त्या मधमाशा आमच्याकडेच होत्या. त्या मधमाशा आमच्याकडे सगळ्या अंगभर येऊन बसायच्या. मधमाशा पालनाच्या या अनुभवाचं माझ्या मुलाला फार महत्त्व वाटायचं; कारण त्याच्या वयाच्या त्याच्या सगळ्या मित्रांमध्ये त्यानं एकट्यानंच हा अनुभव घेतला होता.
ब्लॉगवरचं लिखाण हा एक असाच अनुभव. हिंदी, मराठी, इंग्रजी अशा सगळ्या भाषांमध्ये मी ब्लॉगवर लिखाण केलं आहे. मला असं विचारलं जातं, की काही करायचं राहून गेलं आहे असं वाटतं का?
त्यावर माझं उत्तर असतं, की बरंच! अजून खूप काही करायचं आहे. फिजिक्‍सवरची पुस्तकं लिहायची आहेत. पुढे-मागे शिक्षणविषयक टीव्ही प्रोग्रॅम बनवायचे आहेत. संगणकाचा वापर करणाऱ्या मराठी माणसांनी देवनागरी लिपीचा वापर करावा, संगणकावर मराठीत व्यवहार करावेत यासाठी सोप्या पद्धतीनं मराठी टायपिंग करायला कसं शिकता येईल हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. करायचं आहे असं खूप काही आहे...
शब्दांकन ः वैशाली चिटणीस
------------------------------------------------------------

Comments

HAREKRISHNAJI said…
खर म्हणजे आपण आधीच खुप काही करत आहात.

आतापर्यंत एकाद्या आयएएस अधिका्-यांना हे सारे करतांना पाहिले नव्हते.
न्यूटन ने म्हटले होते -- मी सागरतीरी एखद्या बालकाप्रमाणे वाळूचे कण फक्त उचलू शकलो आहे. ज्ञानकणांचा अफाट वाळूरूप सागर माझ्यासमोर अजून तसाच आहे.
HAREKRISHNAJI said…
Nothing new ?
Prashant said…
लीनाजी,
बिहारबद्दल आपुलकीने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. अधिकाधिक लोकांनी (बिहारी लोकांनी देखिल) आपले विचार वाचले पाहिजे.

---
काही लिखातील दुरुस्ती सुचवत आहे.
अधिका्-याची : अधिकार्‍याची
---
वैशालीस धन्यवाद. तसेच आपण येथे सामील व्हाल तर देवनागरी लेखनाबाबत अधिक महिती मिळू शकेल. : http://www.orkut.co.in/Main#Community.aspx?cmm=90016191

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट