बदलती जीवनशैली व कुटुंबपध्दती

बदलती जीवनशैली व कुटुंबपध्दती
--- लीना मेहेंदळे
ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवनाची व समाजाची जीवनशैली बदलते हे सत्य आपल्या जाणीवेत असते. पण मुख्य मुद्दा असतो तो हा की ज्या वेगाने हे बदल होतात ते आपल्याला झेपतात कां ? समाजाची उलथापालथ होऊन जाते की समाज अशा बदलांना पचवू शकतो ?
विज्ञान तंत्रज्ञानाचे एक वेगवान वळण म्हणजे 1765 साली जेम्स वॉटने स्टीम इंजिनचा शोध लावणे. यामुळे दळणवळण क्षेत्र वेगवान झाले. या आधीची माल वाहतूक व दळणवळण घोडयांमार्फत होत असे. जोडीला खेचर, गाढव, बैल, उंट असेही प्राणी असत. पण स्टीम इंजिनमुळे सर्वप्रथम प्राणी विरहीत - यांत्रिक दळणवळणाला सुरुवात झाली.
दुस-या टप्प्यांत स्टीम इंजिनमुळे उद्योग क्रान्ति - इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आले. त्या आधीची यंत्रसामुग्री हाताने तयार व्हायची प्रत्येक कारागिराच्या कसबाप्रमाणे व स्पीडप्रमाणे त्याला वेळ लागत असे. पण यंत्रनिर्मितीचे यांत्रिकीकरण झाले आणि यंत्र निर्मितीचा वेग झपाटयाने वाढला -- त्याचबरोबर पक्क्या मालाचा तयार होण्याचा वेगही वाढला. त्याला मोठ्या प्माणांत मजूरांची आणी बाजारपेठेचीही गरज भासू लागली. त्यामुळे समाजाची समीकरणे देखील वेगाने पालटू लागली.
मागील शतकातील दोन ठळक उदाहरणे मला आठवतात. 1922-25 च्या दरम्यान टोकियो शहराचे काढलेले चित्र त्या चित्रातील लांबवर पसरलेल्या गिरण्या, त्यांच्या चिमनीमधून निघणारा काळा धूर आकाशांत गच्च दाटलेला आणि खाली वाक्य - हा काळा धूर टोकियोचे भूषण आहे ! कारण सुमारे 100 वर्षापूर्वीच्या त्या काळात तो काळा धूर उद्योगधंद्याच्या वाढीचे प्रतीक होते. (आजही टोकियो मधील गिरण्या कारखाने चालू आहेत पण त्यांनी त्यांची एनर्जी एफिशियन्सी एवढी वाढवली आहे की आज त्यांचे आकाश स्वच्छ आहे - असो.)
दुसरे उदाहरण सानेगुरुजींच्या एका कथेचे आहे - 1940-50 च्या दरम्यानांत लिहिलेली कथा - त्या काळाचे चित्रण दाखवणारी. कथेत एक कोकणातले घर आहे व एक वृध्द विधवा आई आहे. तिची तीन मुले - पैकी मोठी दोन्ही मुले मुंबईच्या कापड गिरणीत कामाला लागलेली - तिथेच रमलेली - गावाकडे न जाऊ शकणारी - न जाऊ इच्छिणारी. तिसरा धाकटा मुलगा - आई मुंबईला जाऊ शकत नाही म्हणून कोकणांतच राहिलेला. मिळकतीचे साधन अत्यंत तोकडे. त्या ओढाताणीच्या परिस्थितीत आई मरण पावते. पण जाताना म्हणते - सुटलास रे तू, आता तू पण जाऊन राहू शकशील मुंबईला.
कुटुंब संस्था विस्कळीत होऊ लागली त्या अगदी सुरुवातीच्या काळातले हे चित्रण.
गेल्या वीस वर्षात मुंबई - पुण्याकडे अशी कित्येक कुटुंब दिसू लागली. जिथे घरात फक्त वृध्द आई - बापच. मुले परदेशांत मग घरकामाला येणारी अनोळखी मंडळीच कुटुंबाप्रमाणे वागवावी लागतात. त्यांच्या सचोटीवर अवलंबून रहावे लागते - आणि अधून मधून अशा घरांमध्ये चोरी, दरोडा, खून असे ही प्रकार दिसतात.
थोडया फार फरकाने ही स्थिती इतर मोठया शहरातही दिसू लागली आहे. पन्नास साठ वर्षापूर्वी परदेशी जाणारी मुले इकडे आईबापांना फारसा पैसा पाठवू शकत नव्हती. आता जाणारी मुले पाठवतात हा एक फरक तसेच ब-याच प्रमाणांत परदेशस्थ मंडळी पुन्हा पुन्हा भारतभेटीसाठी - गावभेटीसाठी येऊ लागली आहेत हे दोन दृश्य बदल ही झालेत. मात्र वृध्द आईबाप एकटे हे चित्र अजूनही वाढतच चालले आहे.
1950 ते 1975 हा एक टप्पा आणी 1975 ते 2000 असे दोन ठळक टप्पे पाडले तर पहिल्या पंचवीस वर्षात एकत्र कुटुंब पध्दती झपाटयाने मोडीत निघालेली दिसून येते. चौकोनी कुटुंब हा आदर्श निर्माण झाला. त्यामध्ये वृध्द आई बाप, बहीण भाऊ इत्यादींना जागा उरली नाही. पुढच्या पंचवीस वर्षात स्त्रिया झपाटयाने घराबाहेर पडल्या - नोकरी करु लागल्या. पुरुषांइतकीच धावपळ करु लागल्या आणि कुटुंब पध्दतीत पुन्हा चलबिचल होऊ लागली. घरातील लहान मुलं सांभाळण्यासाठी पुन्हा आई वडीलांची गरज पडू लागली, पण त्यांच्याशी सूर तर तुटलेले. म्हणून पुन: सूर जुळवण्याची धडपड - धुसफूस. कांही प्रसंगी वडीलधारी मंडळी उपलब्ध नाहीत. मग मुलांच्या भावनिक विश्वाकडे दुर्लक्ष. त्यांतून आईबापांच्या मनाचा कोंडमारा - अपराधीपणाची जाणीव. हे ही चित्र मुंबईपासून ते छोटया शहरांपर्यंत दिसते. मात्र एक बाब बदलली नाही - अजूनही घरांतील पुरुषमंडळी घरकामांत वाटा उचलत नाहीत. घरांतली रोज रोज दमवणारी पण अटळ अशी कामे अजूनही बायकांनाच करावी लागतात - त्यांना ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळावे लागते.
छोटया शहरांमध्ये अजूनही मोठया प्रमाणांत स्त्रियांनी पूर्णवेळ घरकामच सांभाळलेले आहे. तिथे मला अजून एक प्रश्न निर्माण होतांना दिसतो. स्त्रीचे वय पंचेचाळीस ते पंचावन्न या दरम्यान असते. मुलीमुलांचे शिक्षण संपून त्यांनी बाहेर लांब कुठेतरी नोकरी पत्करलेली आणि स्त्रीच्या जीवनात अचानक एक पोकळी निर्माण होते. नव-याचे ऑफिस अजूनही चालूच असते. घरकामाची वेळ निम्म्याहूनही कमी झालेली. फावला वेळ खूप पण करायचे कांय ? अशा स्त्रियांना दोन - तीन तासांचे एखादे काम असेल, आठवडयांतून दोन - तीन दिवसांचे काम असेल, हजेरी लावण्याची दगदग नसेल तर तेवढे काम हवे असते. पण तशी सोय अजूनही आपल्याकडे निर्माण झालेली नाही. वेगवान तंत्रज्ञानामुळे ग्लोबलायझेशन झाले, तरुणांना नव्या जगांत, नव्या प्रांतात जाणा-या संधी निर्माण झाल्या. पण मध्यमवयीन स्त्रियांच्या जीवनांत अशीही एक पोकळी निर्माण झाली. त्यावर सध्याचा तोडगा म्हणजे टी.व्ही वरचे कार्यक्रम मग ते कसे कां असेनात !
कुटुंबातील घटक कमी होण्याची प्रक्रिया अजूनही चालू आहेच. एकत्र कुटुंब पध्दतीतून छोटे कुटुंब आले. मग ते चौकोनी आणि त्रिकोणी (एकच मूल) झाले. पुढे त्याहून छोटे म्हणजे फक्त दोन प्रौढ किंवा वृध्द आई-वडील असे राहिले. दुसरीकडे सिंगल पॅरेंट चाइल्ड म्हणजे एकटेच मूल आणि त्याचे एकटेच आई किंवा वडील (बहुधा आईच) अशीही व्याख्या झाली. या वृध्द जोडप्यापैकी एक जण आयुर्मर्यादा संपवून अनंतात विलीन झाल्यावर - मग एका कुटुंबात एकच व्यक्ती इतकी खालावलेली व्याप्ती पहायला मिळते. अशा एकट्या वृद्धांची व्यवस्था कांय याचे उत्तर विज्ञानाच्या प्रगतीत किंवा ग्लोबलायझेशनच्या धबडग्यांत सापडणार नाही.
नुकतेच लंडन मधे एक उदाहरण पाहिले. एक वृध्द माणूस डिपार्टमेंटल शॉप मधे एकटयानेच शॉपिंग करीत होता. मान लटलट कापत होती. ट्रॉली होती म्हणून तिला धरुन धरुन तो शॉपिंग उरकत होता. त्या वयांतही त्याला आपले व्यक्ती स्वातंत्र्य प्रिय होते म्हणून त्याने एकटे रहाणे स्वीकारले होते की, काळजी घेणारा कोणी नातेवाईक न उरल्याने नाइलाजाने त्याला तसे जगावे लागत होते ? कोण जाणे - पण त्याने खरोखरी पुन: एकदा विस्तृत कुटुंब पध्दतीत जायचे म्हटले तर परतीची वाट जवळ जवळ अशक्य आहे. पुढील निदान वीस-तीस वर्षे, त्यालाच नाही तर त्याच्या सारख्या असंख्य लोकांना.
आपल्या भारतात आपणही परतीच्या सर्व वाटा बंद होईपर्यंत कुटुंब विभाजन होत राहू द्यायचे कां ? की एकत्र व विभक्त दोन्ही पध्दतींबाबत सातत्याने चर्चा करीत राहून दोघांमधले फायदे कसे एकत्र आणता येतील व तोटे कसे संपवता येतील याचा विचार करायचा ? मला वाटते समाजशास्त्रज्ञांनी हा एक मोठा विषय हाती घेऊन समाज प्रबोधनासाठी पुढे यायला हवे आहे.
---------------------------------------
दि. 20.7.08
लीना मेहेंदळे, 15 सुनीती, जगन्नाथ भोसले मार्ग, मुंबई 21
वेबसाईट www.leenamehendale.com
published Jalgaon Sakal dt. ... August 08
mangal, pdf and doc files kept at http://www.geocities.com/son_denare_pakshi

Comments

Popular posts from this blog

मी केलेले अनुवाद -- My Translations

शासकीय कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या- मार्गदर्शक तत्वे

एक शहर मेले त्याची गोष्ट