सुभाष कोण ते ठावकीच नाही
सुभाष कोण ते ठावकीच नाही
एक छोटासाच प्रश्न, पण त्याने भला मोठा अंधार उजेडात आणला. हा अंधार आहे अज्ञानाचा अस कुणाला वाटेल. पण छे, छे. हा अंधार आहे कृतघ्नतेचा. हा अंधार आहे बेदरकारपणाचा. हा आहे मूल्यशून्यतेचा. निरुत्साहाचा, शिकणार नाही, सुधारणार नाही या वृत्तीचा. ग्लोबलायझेशनच्या जमान्यांत राष्ट्रमूल्य हरवून बसलेल्यांचा.
की ही पराकोटीची सत्यवदिता म्हणायची? ठावकी नव्हते ना - मग सांगून टाकले की ठावकी नाही म्हणून. फायली पाहिल्या - त्यांत दिसले नाही. मग सांगून टाकले की दिसत नाही. तर त्यांत कांय चूक?
आपल्याकडे टोचणी, बोचणी, असा कांही प्रकार असतो कां हो ? कांही गोष्टी अशा आहेत की ज्या फायलीत नसल्या तरी त्या नाहीत हे लिहितांना पेन गळून पडले पाहिजे.
करोडपतिमध्ये प्रश्न विचारा - बिडी जलायले कुणी लिहिले - लाखो लोकांच्या कंठातून चालीवर नाचत - थिरकत उत्तर मिळेल. पुढचा प्रश्न विचारा - एक कोटी रुपयांसाठी - 'जय हिंद' चा नारा या देशांत कुणी आणला? एकजात सगळे करोडपतिच्या स्क्रीन वरून पळ काढतील. होय ना? मग फायलींचा कांय दोष ? जे केबीसीला ठावकी नाही ते फायलींना कसे ठावकी असणार?
कांही जुन्या पठडीतील लोक आहेत. त्यांच्या ज्ञानानुभावासहित असलेल्या हेकेखोरपणाला हिणवण्यासाठी हिंदीत शब्द आहे - बूढा उल्लू, तर इंग्रजीत आहे बँडीकूट ! अशा कांही लोकांनी कान टवकारले, मान उंचावली, डोळयांच्या पापण्यांची उघडमीट केली आणि आपल्या म्हाता-या घोग-या आवाजात सांगून टाकले - ते होते ना ! आधी आयसीएस् ची परिक्षा पास होऊनही त्या नोकरीला झटकून टाकून देशासाठी देशांत परत आले होते.
ते होते ना ! कलकत्ता म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये आधी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि १९३१ मेयर झाले. तोवर त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती.
ते होते ना ! कांग्रेसचे ऍक्टिव्ह सदस्य तर होतेच - पण स्वातंत्र्यलढा जोर धरु लागला तेंव्हा झालेल्या १९३७ च्या इंडियन नॅशनल कांग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनांत जवाहरलाल नेहरुंच्या खांद्याला खांदा लावून मिरवणूकीच्या अग्रभागी होते. त्या भव्य मिरवणुकीचे आयोजकही तेच होते. आणि नंतर १९३८ मधे इंडियन नॅशनल कांग्रेसचे अध्यक्ष निवडले गेले.
ते होते ना ! आमच्या इतिहासाच्या पुस्तकांत ते होते. त्यांना १९३९ मध्ये ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. तिथे केलेल्या उपोषणांत प्रकृति खालावली तेंव्हा ब्रिटीशांनी त्यांना सोडून दिले. पण हाऊस ऍरेस्ट मध्ये टाकले होते - त्यांनी आजारपणाचे सोंग घेऊन दाढी वाढवली - मग पठाणाचा वेष घेऊन पळ काढला. देशांतून निघून जाऊन - देशाला पारखे होऊन - पख्खुनिस्तान, काबुल मार्गे यूरोप गाठला. आणि स्वातंत्र्यलढयाची ध्वजा रोवली.
त्या तुरुंगवास व हाऊस ऍरेस्टचे कागदपत्र डी क्लास मध्ये टाकून दिले असतील ( किरकोळ फायली - म्हणजे ज्या एका वर्षानंतर नष्ट कराव्या असा फतवा आहे, त्यांना डी क्लासमधे टाकतात ) असे मला वाटत नाही. कारण ब्रिटिश राजवटीत तर नाहीच नाही, पण स्वातंत्र्यानंतरही १९६०-७० पर्यंत तरी त्या फायलींना डी करण्याची कुणाची हिंमत झाली नसणार. नंतर त्या फायली इतर गठ्ठयांखाली खोल खोल गाडल्या गेल्या असणार. त्यामुळे त्या नष्ट झाल्या असण्याची शक्यता फार कमी.
ते होते ना ! अंदमान मधील रॉस आयलंड वर जेथे ते जपानी सैन्य घेऊन भारतीय स्वातंत्र्य लढयाचे विजयी सेनापति बनून आले आणि तिरंगा फडकावला, ती जागा स्मारक म्हणून जपली आहे - ते ही फायलींमध्ये आहे.
ते होते ना ! 'चलो दिल्ली' म्हणत त्यांनी हिंदुस्तान्यांची आझाद हिंद फौज (मराठी भाषांतर - हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणारी फौज) बर्मा मार्गे नागालँड मधील कोहिमा पर्यंत आणली. तिथे त्या लढाईत जे ब्रिटिश सैनिक मारले गेले त्यांचे स्मारक ब्रिटिशांनी उभारले - मग त्या स्मारकाच्या फायलीत कुठेतरी ते असतीलच ना !
ब्रिटिशांनी आझाद हिंद सेनेत लढणा-यांच्या विरुध्द खटले लावले तेंव्हा त्यांचे वकीलपत्र पंडित जवाहरलाल नेहरुंनी घेतले होते. त्याचे 'ब्रीफ' त्यांनी तयार केले असेलच ना ! त्यांत कांय युक्तिवाद मांडला होता - की ही आझाद हिंद सेना म्हणजे हिंदुस्तानला लुटायला आलेल्या चोर डाकू लुटारुंची टोळी होती ? कांय मुद्दे घेऊन केस चालवणार होते पंडितजी ? ज्यांनी देशासाठी प्राण तळहाती घेतले आहेत अशा वीरांची ही आझाद हिंद फौज आहे - हिंदुस्थान हे त्यांचे वतन आहे - अशा हिंदुस्तानाला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र करण्यासाठी लढणे हा प्रत्येक हिंदी माणसाचा जन्मसिध्द अधिकार आहे - म्हणून त्यांचा लढा हा स्वातंत्र्यलढा आहे - म्हणून ते सर्व स्वातंत्र्यसैनिक आहेत - असा पंडितजींचा युक्तिवाद नव्हता कां ? हाही प्रश्न माहितीच्या अधिकाराखाली विचारता येईल.
फायलींना हे कांहीच ठावकी नाही. म्हणूनच सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्य सैनिक होते का या माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाला - 'तसा कोणताही पुरावा किंवा उल्लेख आमच्या फायलींमध्ये नाही' असे उत्तर देण्यांत आले. म्हणून करोडपतिला प्रश्न - लाहोर कांग्रेसमध्ये 'संपूर्ण स्वराज्य' चा नारा कुणी दिला ? उत्तर - पंडित जवाहरलाल नेहरुंनी ! म्हणजेच पंडितजींना ब्रिटिशांचे राज्य मंजूर नव्हते तर ! म्हणजेच त्याविरुध्द आजाद हिंद सेनेची स्थापना करणारे स्वातंत्र्य सैनिकच ठरतात.
देशाची स्वतःची अशी जी शाळा साखळी - म्हणजे केंद्रीय विद्यालये आहेत - त्यांनी मान्य करुन देशभर लागू केलेले - एनसीआरटीने आठवी - नववी - दहावी साठी लिहून, छापून काढलेले बालभारती - वाचा. त्यांत एक कविता घातलीय्. तिच्या या दोन ओळी -
आजानुबाहू उंची करके वे बोले
रक्त मुझे देना
इसके बदले में भारत की
आजादी तुम मुझसे लेना
मग आता फायली पुस्तकांना फतवा काढणार की पुस्तके फायलींना ?
पण त्या आधी जास्त महत्वाचा प्रश्न ! सुओ मोटो (suo motu) नोंद घेणे म्हणजे कांय ते फायलींना ठावकी आहे कां? नसेल. पण त्यामागील माणसांना ?की ती माणसेही फाइलीच झाली आहेत ?
---------------------------------------
Comments