श्री भूवलय -- जैन मुनि आचार्य कुमुदेंदू विरचित अद्भुत ग्रंथ
आपल्या भारताच्या ज्ञानभांडारात इतक्या जबरदस्त आणि चमत्कारिक गोष्टी लपलेल्या आहेत की त्या बघून मन अक्षरशः थक्क होतं..! ‘हे ज्ञान आपल्या जवळ आलंच कुठून’ अश्या प्रश्नात आपण गुरफटले जातो. मग, ‘त्या काळात हे असलं भारी ज्ञानभांडार आपल्या जवळ होतं, मग आता कां नाही..? कुठं गेलं हे ज्ञान..?’ हे प्रश्न आपल्याला सतावत राहतात…! याच श्रेणीतला असा अद्भुत ग्रंथ आहे – ‘सिरी भूवलय’. किंवा श्री भूवलय. जैन मुनि आचार्य कुमुदेंदू ह्यांनी रचलेला. कर्नाटकात जेंव्हा राष्ट्रकुटांचं शासन होतं, मुस्लिम आक्रमक यायला बरीच वर्ष होती आणि सम्राट अमोघवर्ष नृपतुंग (प्रथम) हे जेंव्हा राज्य करत होते, त्या काळातला हा ग्रंथ. अर्थातच सन ८२० ते ८४० च्या काळात केंव्हा तरी लिहिला गेलेला..! मात्र मागील हजार वर्षे हा ग्रंथ गायब होता. कुठे कुठे याचा उल्लेख यायचा. पण ग्रंथ मात्र विलुप्तावस्थेतच होता. हा ग्रंथ मिळाला कसा, याचीही मजेदार गोष्ट आहे – राष्ट्रकुटांच्या काळात कोण्या मल्लीकब्बेजी या बाईने या ग्रंथाची एक प्रत नकलून घेतली आणि आपले गुरु माघनंदिनीजी यांना शास्त्रदान केली. या ग्रंथाची प्रत, हस्ते परहस्ते सुप्रसिध्द आयुर्वेद...