झाडू आणि झुरळे - लीना मेहेंदळे (ज्येष्ठ सनदी अधिकारी) 06-01-2013 सामान्य माणसांचा प्रतिनिधी असलेला, ‘वेन्सडे’ या सिनेमाचा कथानायक मुर्दाड व्यवस्था आणि राजकीय नेत्यांना उद्देशून म्हणतो, ‘माझ्या घरात झालेल्या झुरळांनी मला अगदीच जीव नकोसा केला म्हणून नाईलाजाने मी झाडू घेऊन मैदानात उतरलो आहे. पण झुरळे मारणे हे काम मी रोजच्या रोज करू शकत नाही. त्यासाठी मी तुम्हाला नेमले आहे आणि निवडून दिले आहे.’ ---------------------------------------------------------------------------------- मी सांगलीची जिल्हाधिकारी असतानाची गोष्ट. एकदा ऑफिसमध्ये एक तातडीची समस्या तयार झाली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत आम्ही त्या विषयाशी झगडत होतो. समाधानकारक तोडगा हाताशी येईना तेव्हा मी माझ्या अधिकार्यांना म्हटले, उद्या सकाळी घरी या. आपण थोडावेळ बसू. रविवारी सकाळी संबंधित अधिकारी कागदपत्रे घेऊन माझ्या घरी जमले. विचार झाला होता. प्रश्न सोडवण्याचा आता केवळ एकच मार्ग आहे, हे सार्यांना जाणवत होते; पण तरीही आम्ही अडकलो होतो. - कारण सर्वानुमते ‘योग्य’ असलेला एकमेव पर्याय ‘सिस्ट...