शिव आणि राम - आराध्य म्हणूया की मायथोलॉजिकल वॉरियर
शिव आणि राम - आराध्य म्हणूया की मायथोलॉजिकल वॉरियर भारतीय वाङ्मयात एक चुकीचा शब्द शिरला आहे - मायथोलॉजी , मिथक ज्याचा इंग्रजी शब्दकोषातील अर्थ मिथ्या या शब्दाच्या अगदी जवळपास पोचतो . आणि हा शब्द भारतीय इतिहासासाठी धडाक्याने वापरण्याची एक प्रणालीही स्वातंत्र्योत्तर काळांत अस्तित्वात आली होतीच . भारतीय प्राचीन इतिहास कपोलकल्पित आहे असे सांगणारे दोन प्रदीर्घ वर्षांचे कोर्सही आपल्या विद्यापीठांमधून आधी इण्डोलॉजी व अलीकडे मायथॉलॉजी या नावाने सुरू झालेले होते . पण त्यामधे सामान्य माणूस गुंतून पडलेला नव्हता . त्याला अजूनही उपासनेसाठी राम , शिव , ही सगुण प्रतीके आवडत होती व त्यांच्या प्राचीन अस्तित्वाच्या इतिहासात्मक सत्यतेबाबतही सामान्यजन निःशंक होता . आता मात्र क्रॅश कोर्सेसच्या माध्यमातून भारतीय मिथ्या वाङ्मय ही परिकल्पना जनामनात रुजविण्याचे काम सर्व विद्यापीठांनी सुरू केले आहे . क्रॅश कोर्स हे हल्ली झटपट पैसे मिळवण्याचे माध्यम झाल्यामुळे विद्यापीठाबाहेरील संस्था देखील हा मार्ग चोखाळत आहेत . त्यांना इंडियन मायथोलॉजी ही सोन्याची खाणच सापडली आहे असं म्हणता येईल . आता त्यांनी रुद्र , ...