बदलती जीवनशैली व कुटुंबपध्दती --- लीना मेहेंदळे ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवनाची व समाजाची जीवनशैली बदलते हे सत्य आपल्या जाणीवेत असते. पण मुख्य मुद्दा असतो तो हा की ज्या वेगाने हे बदल होतात ते आपल्याला झेपतात कां ? समाजाची उलथापालथ होऊन जाते की समाज अशा बदलांना पचवू शकतो ? विज्ञान तंत्रज्ञानाचे एक वेगवान वळण म्हणजे 1765 साली जेम्स वॉटने स्टीम इंजिनचा शोध लावणे. यामुळे दळणवळण क्षेत्र वेगवान झाले. या आधीची माल वाहतूक व दळणवळण घोडयांमार्फत होत असे. जोडीला खेचर, गाढव, बैल, उंट असेही प्राणी असत. पण स्टीम इंजिनमुळे सर्वप्रथम प्राणी विरहीत - यांत्रिक दळणवळणाला सुरुवात झाली. दुस-या टप्प्यांत स्टीम इंजिनमुळे उद्योग क्रान्ति - इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आले. त्या आधीची यंत्रसामुग्री हाताने तयार व्हायची प्रत्येक कारागिराच्या कसबाप्रमाणे व स्पीडप्रमाणे त्याला वेळ लागत असे. पण यंत्रनिर्मितीचे यांत्रिकीकरण झाले आणि यंत्र निर्मितीचा वेग झपाटयाने वाढला -- त्याचबरोबर पक्क्या मालाचा तयार होण्याचा वेगही वाढला. त्याला मोठ्या प्माणांत मजूरांची आणी बाजारपेठेचीही गरज भास...