जुहू शेम नंतर - आता तरी
जुहू शेम नंतर - आता तरी लीना मेहेंदळे 15/1/2008 (जुहू शेम'नंतर तरी कायदे सुधारा! म. टा. 21 Jan 2008) नव वर्षाच्या पहिल्याच रात्री जुहू मधील मरियट होटेल समोर दोन महिलांबरोबर दुर्व्यवहार घडला. त्यानंतर अशा घटनांची जणू मालिकाच चालू आहे. त्यामुळे स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रश्नावर आपली सामाजिक, प्रशासनिक आणि न्यायिक बाजू किती तोकडी, किती अपुरी आहे हेच पुन्हा एकदा समोर आले आहे. आता तरी याबाबतचे कायदे आपण सुधारले पाहिजेत. त्याचप्रमाणे निव्वळ कायदे सुधारुन किंवा कडक करुन पुरेसे नसते हे लक्षात घेतले पाहिजे. आपल्याला फक्त पुस्तकांतील कडक कायदे उपयोगाचे नाहीत. त्यासोबत एक जलदगतीची न्याय प्रक्रिया, तत्परतेने गुन्हयांचा छढा लावू शकणारी पोलीस यंत्रणा, कायद्यांत दुरुस्तीची दिशा दाखवू शकणारे कायदे पंडित, कोर्टात पीडित स्त्रियांच्या प्रश्नांवर पीआयएल करु शकणारे वकील आणि विचार करणारा संवेदनशील समाज हे सर्वच घटक आज तातडीने उपलब्ध होण्याची गरज आहे. जुहूच्या घटनेकडे फक्त विनयभंगाचे प्रकरण म्हणून पहावे की बलात्कारासाठी संगनमत (कान्स्पिरसी) व बलात्काराचा प्रयत्न म्हणून पहावे ? घटनास्थ...