अराजकाची नांदी! शनिवार, २९ जानेवारी २०११ महाराष्ट्राचा गेल्या काही वर्षांत किती झपाटय़ाने ऱ्हास झाला आहे याचा जळजळीत पुरावाच नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जाळून मारणाऱ्यांनी दिला आहे. नाशिक जिल्ह्य़ातल्या या इंधनमाफियांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याची शिफारस १९९५-९६मध्ये नाशिकच्या तेव्हाच्या विभागीय आयुक्त लीना मेहेंदळे यांनी सरकारकडे केली होती. मनमाड, मालेगाव, पानेवाडी भागातल्या माफियांची नावे त्यांनी आपल्या अहवालात दिली होती, पण त्यांच्याविरुद्ध कारवाई होऊ शकलेली नाही; कारण हे सर्व टोळभैरव कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते. गेल्या काही वर्षांपासून राजकारणाला लागलेली ही कीड महाराष्ट्र जोपासतो आहे. भारतीय जनता पक्षाचे विनोद तावडे आता मोठय़ा आविर्भावात गौप्यस्फोट करत आहेत आणि कोणत्या ‘जीआर’साठी कुणी किती पैसे दिले याची आपल्याजवळ बित्तंबातमी असल्याचे सांगत आहेत, पण त्यांच्या पक्षाचे युती सरकार महाराष्ट्रात सत्तेवर असतानाच या भेसळ प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. याच विषयावर काल लिहिलेल्या ‘हे राज्य माफियांचे’ या अग्रलेखात आम्ही म्हटले होते, की हा ...